तर्रीदार मिसळ-पाव अन् रेडीमेड बिर्याणी 
उमेदवारांकडून कार्यकर्त्यांसाठी चहा, नाश्ता, जेवणावळी
तर्रीदार मिसळ-पाव अन् रेडीमेड बिर्याणी

तर्रीदार मिसळ-पाव अन् रेडीमेड बिर्याणी उमेदवारांकडून कार्यकर्त्यांसाठी चहा, नाश्ता, जेवणावळी तर्रीदार मिसळ-पाव अन् रेडीमेड बिर्याणी

Published on

पिंपरी, ता. १० ः महापालिका निवडणूक प्रचाराने आता वेग धरला आहे. प्रत्येक पक्षांचे उमेदवार जनसंपर्कावर भर देत आहेत. त्यांच्या दिमतीला कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा आहे. कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी उपनगरांतही शाकाहारी-मांसाहारी पंगती उठत आहेत. काहींनी चांगल्या हॉटेलमध्येही जेवणाची सुविधा पुरवली आहे.
शहरातील ३२ प्रभागांत ६९१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे कार्यकर्ते दिवसभर प्रचार करीत आहेत. त्यांच्या चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था उमेदवारांना करावी लागत आहे. त्याची जबाबदारी विश्‍वासू सहकाऱ्यांवर आहे. त्याचा आढावा घेतला असता, सर्वाधिक पसंती वडापावला दिसते. कारण, पूर्वी दररोज ३०० वडापावची विक्री व्हायची, आता एक हजार ते बाराशे वडापाव विक्री होत असल्याचे पिंपरीगावातील एका विक्रेत्याने सांगितले. तसेच, नेहमीपेक्षा दुप्पट ऑर्डर येत असल्याचे पावभाजी विक्रेत्याने सांगितले. खानावळी, केटरिंग व्यावसायिकांकडेही मागणी नोंदविल्या आहेत.

पोळी-भाजी केंद्राशी ‘टायअप’
सकाळी नाश्त्यासाठी वडापाव, पोह्यांना पसंती दिली जात आहे. दुपारच्या जेवणात बिर्याणीसह शाकाहारी थाळी असते. काही ठिकाणी रात्रीचे जेवणही दिले जात आहे. काही उमेदवारांनी थेट केटरर्स किंवा पोळी-भाजी केंद्राशी ‘टायअप’ केले आहे. या ठिकाणी भाजीपाला, धान्य उमेदवारांकडून पुरवले जाते आणि केवळ स्वयंपाकाचे शुल्क दिले जाते. त्यामुळे कार्यकर्त्यांना दोन वेळा ताजे जेवण मिळते.

घसा बसलेल्यांना ‘औषध’
सायंकाळी मांसाहारी जेवणही काही जण देत आहेत. काही उमेदवार नेहमीच्या केटरर्सकडून जेवण मागवीत आहेत. काहींनी खर्च कमी करण्यासाठी आपले संपर्क कार्यालय वा निवासस्थान परिसरातच स्वयंपाकगृह थाटली आहेत. सकाळी कार्यकर्ते जमले की चहा-नाश्ता, दुपारी जेवण, सायंकाळी चहा-बिस्किटे आणि रात्री जेवण अशी सलग व्यवस्था केली आहे. घोषणा देऊन घसा बसलेल्या कार्यकर्त्यांना बुधवार, शुक्रवार, रविवारच्या दिवशी ‘खास औषध’ दिले जात आहे.

कुपन हॉटेल मालकाकडे
कार्यकर्त्यांची पहिली पसंती मांसाहाराला आहे. त्यामुळे साहजिकच खास कार्यकर्त्यांसाठी मांसाहारी हॉटेल्स आरक्षित केली जात आहेत. कार्यकर्त्यांनी उमेदवारांकडून मिळालेले कुपन हॉटेल मालकाकडे जमा करायचे आणि मांसाहारी जेवणावर मनसोक्तपणे ताव मारायचा अशी स्थिती आहे. शहरात जवळपास ५०० च्या वर छोटी-मोठी हॉटेल्स आहेत. एका हॉटेलमध्ये दररोज सरासरी दोनशे ताटे वाढले जातात, मात्र आता ताटांची संख्या ५०० च्या वर गेली आहे. त्याची व्यवस्था हॉटेल मालकांनी केली आहे. कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे सामान्य ग्राहकांना बसण्यासाठी जागा मिळत नसल्याचे एका हॉटेल मालकाने सांगितले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com