प्रचाराच्या तोफा थंडावल्या
पिंपरी, ता. १३ ः महापालिका निवडणुकीसाठी गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी (ता. १३) सायंकाळी साडेपाच वाजता थंडावल्या. त्यामुळे गल्लीबोळातून ऐकू येणाऱ्या पक्ष व उमेदवारनिहाय गाण्यांचे स्वर, ध्वनिक्षेपकावरील भाषणे, फटाक्यांची आतषबाजी थांबली. निवडणूक प्रचार साहित्य काढून घेण्यास अनेकांनी सुरवात केली.
महापालिका निवडणुकीसाठी गुरवारी (ता. १५) मतदान होणार आहे. ३२ प्रभागातील १२८ जागांसाठी ६९१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पक्ष, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष, हिंदू राज्य संघ, प्रहार जनशक्ती पक्ष, बहुजन भारत पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, पिंपरी चिंचवड परिवर्तन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन सेना, नॅशनॅलिस्ट रिपब्लिकन पक्ष, सनय छत्रपती शासन, स्वराज्य शक्ती सेना, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया आदी पक्षांसह १६६ अपक्ष उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. मात्र, सर्वाधिक प्रचारसभा, रोड शो, पदयात्रा भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याच निघाल्या. भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्री, राज्यस्तरीय नेते प्रचारासाठी येऊन गेलेत. राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार जवळपास शहरात ठाण मांडून होते. शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मतदारांशी संपर्क साधला होता. मंगळवारी (ता. १३) प्रचाराच्या सांगतेच्या दिवशी जवळपास सर्वच पक्ष, उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपापला परिसर पिंजून काढत मतदारांना मतदानाबाबत आवाहन केले. पवार यांनी सांगवीत रोड शो करून भोसरीत सभा घेतली. दापोडीतील कोपरा सभेने त्यांनी प्रचाराचा समारोप केला.
प्रचार साहित्य हटविणे सुरू
महापालिका निवडणूक प्रचारासाठी विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी विविध ठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. पक्षाचे चिन्ह असलेले ध्वज लावले आहेत. जाहीरसभांचे फलक उभारले आहेत. प्रचाराची मुदत संपल्यानंतर हे सर्व साहित्य आचारसंहिता भंग करणारे ठरते. त्यामुळे प्रचाराची मुदत मंगळवारी संपल्यानंतर उमेदवार, पक्ष यांच्या जाहीर प्रचाराचे बॅनर्स, झेंडे, पोस्टर्स तातडीने हटविण्याचे काम आठही क्षेत्रीय कार्यालयांनी सुरू केले. संबंधित उमेदवार व कार्यकर्त्यांनीही ते हटवावेत, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा निवडणूक विभागाने दिला आहे.
कायदा-सुव्यवस्थेसाठी दक्षता
महापालिका निवडणूक प्रचार कालावधी संपल्यानंतर प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया संपेपर्यंत कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे. कोणताही अनुसूचित प्रकार होऊ नये, याची दक्षता घेतली जात आहे. याकाळात आचारसंहिता कक्षाने प्रभावीपणे एसएसटी, एफएसटी, व्हीएसटी अशी विविध पथके कार्यरत ठेवली आहेत. मतदार चिठ्ठ्या मतदारांपर्यंत वाटप करण्याचे काम वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. ईव्हीएम हाताळणी आणि वाहतुकीचे क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियोजन केले आहे, असे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

