आता ‘ग्राउंड मॅनेजमेंट’ची व्यूहरचना

आता ‘ग्राउंड मॅनेजमेंट’ची व्यूहरचना

Published on

पिंपरी, ता. १५ ः गेल्या दहा दिवसांपासून शहराच्या कानाकोपऱ्यात उडालेला प्रचाराचा धुरळा मंगळवारी (ता. १३) सायंकाळी शांत झाला. यानंतर राजकीय नेत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. प्रचार थांबल्यानंतर पडद्यामागच्या हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीत ‘बूथ मॅनेजमेंट’ आणि मतदानाचे प्रमाण महत्त्वाचे असल्याने प्रत्येक पक्षाने ‘ग्राउंड मॅनेजमेंट’ची व्यूहरचना आखण्यास सुरवात केली आहे.
अनेक महिला उमेदवार मतदारांना ‘मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत गुरुवारी (ता.१५) मतदान करण्‍याचे साकडे घातले जात होते. भाजप, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम या प्रमुख पक्षांबरोबर अन्य पक्षांनीही व्यूहरचना आखली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने इतर पक्षांमधील नाराजांना आणि प्रभागातील प्रभावशाली व्यक्तींना आपल्याकडे वळवण्यावर भर दिला आहे. भाजपनेही याच रणनितीचा अवलंब केला आहे. वंचितने हायटेक यंत्रणेऐवजी आपल्या कडव्या कार्यकर्त्यांना गल्लोगल्ली उतरवले आहे. हे कार्यकर्ते कॉलनी, सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन भेटी घेत आहेत. काँग्रेस पक्षाने हक्काची ‘व्होट बँक’ सावरण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. अनेक बालेकिल्ल्यांमधील मतदार विभागले गेल्याने त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचे आव्हान आहे. काँग्रेसचे उमेदवार चित्रफितीवरून माहिती देत आहेत.

भाजपची त्रिस्तरीय रचना
भाजपने ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ अभियानांतर्गत पद्धतशीर नियोजन केले आहे. यामध्ये भाजपचे बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख आणि मंडळ प्रमुख अशी त्रिस्तरीय रचना आहे. बूथ प्रमुखाकडे एका पानाची मर्यादित जबाबदारी असल्याने मतदानाच्या दिवशी सकाळी सातपासून संबंधित मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्याचे नियोजन आहे.

शिवसेना घरोघरी जाणार

शिवसेनेने प्रत्येक प्रभागात गटप्रमुख सक्रिय केले आहेत. केवळ लाडकी बहीण योजनेवर अवलंबून न राहता, मतदारांना घरातून आणण्यासाठी वाहनांची सोय आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मतदानासाठी विशेष स्वयंसेवक तैनात केले आहेत.


उद्धवसेनेची भिस्त निष्ठावंतांवर
उद्धवसेनेसमोर पक्षाची पडझड रोखण्याचे मोठे आव्हान आहे. मतदारांच्या मनात आदराची आणि सहानुभूतीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न शेवटच्या काही तासांत केला जात आहे. ‘डोअर-टू-डोअर’ प्रचार आणि भावनिक साद घालण्यात येत आहे.
--
टक्का वाढवण्याचे आव्हान
भाजपचे बूथ प्रमुख, शिवसेनेचे गटप्रमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे केडर यापैकी कुणाचे ‘ग्राउंड मॅनेजमेंट’ यशस्वी ठरते, यावरच विजयाचे समीकरण अवलंबून आहे. काही प्रभागात हिंदू, मुस्लिम आणि मागासवर्गीय या मतदानात मोठे विभाजन आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढवण्यास प्रयत्न करावे लागतील.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com