बनावट औषधे, भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर आता ‘रामबाण उपाय’
पिंपरी, ता. १४ : मोशी येथे उभारण्यात येत असलेली अन्न व औषधे प्रशासनाची (एफडीए)ची सुसज्ज प्रयोगशाळा राज्यासाठी दिलासादायक ठरणार आहे. या प्रयोगशाळेचे काम सध्या प्रगतीपथावर असून येत्या काही महिन्यांत ती कार्यान्वित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाला वाढत्या बनावट औषधे आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथे अन्न व औषधे प्रशासनाचे कार्यालय आहे. शहरातील बनावट, कालबाह्य औषधांची तपासणी या कार्यालयामार्फत केली जाते. सध्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा पुणे विभागात समावेश आहे. मात्र, या संपूर्ण विभागात औषध निरीक्षकांच्या ४१ मंजूर पदांपैकी केवळ ९ निरीक्षक सध्या कार्यरत आहेत. सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र औषध निरीक्षकच नसल्याने पुण्यातील अधिकाऱ्यांनाच या जिल्ह्यांत जाऊन कारवाई करण्याची परिस्थिती ओढावत आहे. त्यामुळे तपासणी व कारवाईच्या प्रक्रियेला मर्यादा येत आहेत. याशिवाय, अन्न व औषधांचे नमुने तपासणीसाठी पुणे विभागातून मुंबई, नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळांकडे पाठवावे लागण्याची वेळ यायची. मुंबईतील ‘एफडीए’ प्रयोगशाळेवर राज्यभरातील नमुन्यांचा मोठा ताण असल्याने पुणे विभागातील तपासणी अहवाल मिळण्यास मोठा विलंब होत आहे. सध्या नमुना तपासणीचे अहवाल मिळण्यासाठी दोन महिन्यांहून अधिक कालावधी लागत असल्याचे वास्तव आहे. यामुळे संबंधितांवर तातडीची कारवाई करणे कठीण होत असून दोषींना अप्रत्यक्षपणे फायदा मिळत आहे.
ही स्थिती बदलण्यासाठी मोशी येथे अत्याधुनिक एफडीए प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे.
प्रयोगशाळेवर एक दृष्टिक्षेप
- सध्या मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे प्रयोगशाळा कार्यरत.
- मोशीतील प्रयोगशाळेसाठी आवश्यक उपकरणांच्या खरेदीसाठी २३ कोटी ५५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता.
- अन्न व औषधांच्या घटकांची अचूक तपासणी करण्यासाठी ३८ अत्याधुनिक उपकरणे बसविली जाणार.
- या प्रयोगशाळेमुळे पुणे विभागातील अन्न व औषध नमुन्यांची तपासणी स्थानिक पातळीवर होणार.
- संबंधित अहवाल मिळण्याचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा.
मोशी येथे प्रयोगशाळा झाल्यामुळे औषधांच्या नमुन्यांची संख्या वाढतील. तसेच त्याची तपासणी करण्याची गती देखील वाढेल. प्रयोगशाळेचे काम पूर्ण झाल्यावर ती सुरू करण्याबाबतचा निर्णय मुंबई कार्यालयाकडून केला जाईल.
- गिरीश हुकरे, सहायक आयुक्त, अन्न व औषधे प्रशासन, पुणे

