भाजपने राखली पिंपरी चिंचवड महापालिका

भाजपने राखली पिंपरी चिंचवड महापालिका

Published on

पिंपरी, ता. १५ : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी (ता.१६) घोषित झाला. त्यात भारतीय जनता पक्षाने सत्ता राखली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, सर्वांत मोठा फटका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बसल्याचे दिसून आले. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची २००२ पासून २०१७ पर्यंत अशी सलग पंधरा वर्षे सत्ता होती. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः महापालिकेच्या कामकाजात लक्ष घातले. मात्र, त्यांची सत्ता उलथवून टाकत २०१७ मध्ये भाजपने १२८ पैकी ७७ जागा जिंकून महापालिका एकहाती ताब्यात घेतली. आताही सत्ता राखण्यात त्यांना यश आले आहे. मात्र, त्यांच्या नेत्यांनी विशेषतः भाजप आमदार शंकर जगताप यांनी दिलेला ‘१२५ पार’चा नारा हवेतच विरला. त्यांच्या या मनसुब्यांवर अजित पवार यांनी पाणी फिरवल्याचे स्पष्ट झाले. कारण, पवार यांनी प्रचारादरम्यान भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर विशेषतः २०१७ ते २०२२ या काळातील सत्ताकाळात आणि २०२२ पासून प्रशासकीय काळातील महापालिकेत केलेल्या हस्तक्षेपाबाबत वारंवार टीकास्र सोडले होते. पवार आणि आमदार महेश लांडगे यांनी अनेक सभांमध्ये एकमेकांचा एकेरी उल्लेख करत आरोप-प्रत्यारोप केले होते. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सांगतेच्या दिवशी मंगळवारी (ता. १३) केवळ भोसरी परिसरातील प्रभागांवर लक्ष देत प्रचाराची राळ उडवली होती. त्यामुळे येथील निकालांकडे अधिक लक्ष होते.

पवारांचे मनसुबे धुळीस
निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून अजित पवार यांनी जवळपास शहरात ठिय्याच मांडला होता. परंतु, सत्ता पुन्हा ताब्यात घेण्याचे त्यांचे मनसुबे धुळीस मिळाल्याचे निकालातून दिसून आले आणि त्यांच्या पक्षाला पुन्हा विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहण्याची वेळ आली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोबत घेतले होते. त्यांना १८ जागा सोडल्याचे जाहीर केले होते. परंतु, त्यांनी केवळ प्रभाग १४ जागांवर उमेदवार उभे केले होते. तर; पाच ठिकाणी दोन्ही पक्षांचे उमेदवार रिंगणात होते.

शिवसेनेची कमाल
भाजप आणि शिवसेना यांच्यात जागा वाटपावरून एकमत होऊ शकले नव्हते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांची युती तुटली आणि शिवसेनेने ५७ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यांनी सहा जागांवर विजय मिळवला आहे. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचे नऊ उमेदवार विजयी झाले होते. मात्र, पक्षातील फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यात शिवसेना-ठाकरे पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करून ५७ उमेदवार उभे केले होते. त्यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सर्व जागांवर पराभव पत्करावा लागला.

काँग्रेसची झोळी रिकामीच
महापालिका १९८२ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर १९८६ मध्ये पहिली निवडणूक झाली. काँग्रेस पक्ष २००७ पर्यंत महापालिकेत सत्तेत होता. मात्र, १९९९ मध्ये पक्षात फूट पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. फूट पडल्यानंतरही दोन्ही पक्ष सत्तेत होते. २००२ च्या निवडणुकीत १०५ पैकी काँग्रेसला ३२, राष्ट्रवादीला ३६ जागा मिळाल्या होत्या. दोन्ही पक्ष मिळून कारभार पाहिला. मात्र, संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांनीच केले होते. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. आता २०२६ च्या निवडणकीतही त्याची पुनरावृत्ती झाली. त्यामुळे एकेकाळी पंधरा वर्षे एकहाती सत्ता मिळवणारे काँग्रेसचा शहरातील प्रभाव कमी होत चालला आहे.

भ्रष्टाचाराचे आरोप
आषाढी वारीनिमित्त आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला जाणाऱ्या पालखी सोहळ्यांतील दिंडी प्रमुखांना देण्यासाठी विठ्ठल मूर्ती खरेदी केल्या होत्या. त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजपने २०१७ ची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना यश मिळाले होते. तोच धागा पकडत अजित पवार यांनी आताच्या निवडणूक प्रचारात भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र, त्यांच्या आरोपांचा म्हणावा तसा प्रभाव पडला नसल्याचे निवडणूक निकालानंतर दिसते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com