मोहननगर, प्राधिकरणात निकालात चुरस

मोहननगर, प्राधिकरणात निकालात चुरस

Published on

पिंपरी, ता. १६ : कुठे पहिल्या फेरीपासूनच भाजपने मारलेली बाजी, तर कुठे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये चाललेली चुरस तर प्रभाग क्रमांक १९ मध्ये शेवटच्या काही फेऱ्या निर्णायक ठरल्याने रात्री उशिरापर्यंत चाललेली मतमोजणी असे चित्र ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १०, १४, १५, १९ मध्ये बघायला मिळाले. प्रभाग क्रमांक १९ ‘क’ मधील भाजपचे उमेदवार तर १९ ‘ड’ मधील राष्ट्रवादीचे उमेदवार यांनी शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये आक्षेप घेतल्यामुळे चारही प्रभागातील अंतिम निकाल हाती येण्यात विलंब लागला

संभाजीनगर, शाहूनगर, मोरवाडी या भागाचा समावेश असलेल्या मोरवाडी-शशहूनगर प्रभाग क्रमांक १० मध्ये भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण पॅनेलचा विजय झाला. या प्रभागातील ‘ब’ गटातील सुप्रिया चांदगुडे या बिनविरोध निवडून आल्या. तर भाजपच्या उमेदवार अनुराधा गोरखे, तुषार हिंगे हे देखील दुसऱ्यांदा निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. नीलिमा गायकवाड याचा त्यांनी पराभव केला. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये गायकवाड यांनी आघाडी घेतली होती. मात्र, दुपारनंतर गोरखे यांनी आघाडी घेतली. शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये त्यांचा विजय स्पष्ट झाला. तर, तुषार हिंगे यांनी पहिल्यापासूनच आघाडी घेतली होती. ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती. दुसरीकडे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले कुशाग्र कदम व राष्ट्रवादीच्या संदीप चव्हाण यांच्या मतांमध्ये सुरवातीपासूनच फरक होता. जो शेवटी वाढत गेला आणि कुशाग्र शिंदे यांना विजयी घोषित करण्यात आले.

मोहननगर-काळभोरनगर प्रभाग क्रमांक १४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत तीन जागा जिंकल्या. पक्षाचे प्रमोद कुटे, वैशाली काळभोर यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. तर ‘अ’ गटातून राष्ट्रवादीचे विशाल काळभोर व कैलास कुटे यांच्यामध्ये सुरवातीला कडवी लढत पाहायला मिळाली. मात्र, सुरवातीच्या काही फेऱ्यानंतर कैलास कुटे यांनी निर्णायक आघाडी मिळवली. या प्रभागात सर्वाधिक चुरशीची लढत ठरली ती भाजपच्या ऐश्‍वर्या बाबर, राष्ट्रवादीच्या अरुणा लंगोटे व शिवसेनेच्या दीपा काटे यांच्यामध्ये सुरवातीच्या काही फेऱ्यांमध्ये काटे यांनी आघाडी घेतली होती. तेव्हा अरुणा लंगोटे या तिसऱ्या क्रमांकावर होत्या. मात्र, दहा फेऱ्यांनंतर चित्र बदलले यावेळी तीनही उमेदवारांना सारखे मत होते. मात्र लंगोटे यांनी त्यानंतर मुसंडी मारली. दीपा काटे यांची पिछाडी झाली; मात्र बाबर व लंगोटे यांच्यात शेवटच्या फेरीपर्यंत चुरस पाहायला मिळाली. ज्यामध्ये राष्ट्रवादीच्या अरुणा लंगोटे विजयी ठरल्या.
निगडी प्राधिकरण, आकुर्डी यांचा समावेश असलेला या भाग भाजपचा मतदार अधिक असल्याचे बोलले जाते. त्यामुळे पहिल्यापासूनच या भागात भाजपच्या चारही उमेदवारांनी आघाडी घेतली. भाजपचे उमेदवार राजू मिसाळ यांच्यापुढे राष्ट्रवादीच्या धनंजय काळभोर यांचे आव्हान होते. ही लढत चुरशीची ठरली ज्यात मिसाळ विजयी झाले. शैलजा मोरे, शर्मिला बाबर, अमित गावडे यांनी पहिल्या फेरीपासूनच मोठे मताधिक्य मिळवले.

क्षणचित्रे :
- श्रीधरनगर भाटनगर पिंपरी कॅम्प हा भाग असलेल्या विजयनगर-भाटनगर प्रभाग क्रमांक १९ मध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची कडवी चुरस
- ‘ड’ गटात भाजपच्या मंदार देशपांडे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळुराम पवार यांच्यात कडवी झुंज पहायला मिळाली. शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत पुन्हा मतमोजणी करण्याची विनंती. ज्यामध्ये देशपांडे यांचा विजय झाला.
- भाजपच्या जयश्री गावडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सविता आसवानी यांनी केवळ २१ मतांनी पराभव केला.
- शीतल शिंदे व मधुरा शिंदे यांनी भाजपकडे विजयश्री खेचून आणली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com