अटातटीच्या लढतींमध्ये निर्णायक विजय

अटातटीच्या लढतींमध्ये निर्णायक विजय

Published on

पिंपरी, ता. १६ : ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय मतमोजणी केंद्रांतून निकाल जाहीर होत असतानाच चारही प्रभागांमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या मुकाबल्यात पिंपळे निलख येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, ताथवडे येथील माजी नगरसेविका यमुना पवार यांच्या सूनबाई चित्रा पवार, तसेच पिंपळे सौदागर येथील राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांच्या पत्नी व माजी नगरसेविका शीतल काटे यांना पराभव स्वीकारावा लागला. शीतल काटे आणि भाजपच्या अनिता काटे यांच्यातील लढत शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीची ठरली.
महापालिका प्रभाग क्रमांक २५ मध्ये चित्रा पवार यांनी पहिल्या फेरीपासूनच भाजपच्या श्रृती वाकडकर यांना लढत दिली. आठव्या फेरीत वाकडकर यांनी ३६३ मतांची आघाडी घेतली. ती पुढील सर्व फेऱ्यांमध्ये कायम ठेवत विजय मिळवला. अखेरीस तब्बल १० हजार ८१४ मतांच्या फरकाने पवार यांचा पराभव झाला. या प्रभागातील भाजपचे उमेदवार माजी नगरसेवक राहुल कलाटे, रेश्मा भुजबळ तसेच रिपाइंचे, मात्र भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले कुणाल वाव्हळकर हे तिघेही पहिल्या फेरीपासूनच मताधिक्य राखत विजयी झाले.

प्रभाग क्रमांक २६ मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मातब्बर उमेदवार व माजी नगरसेवक तुषार कामठे हे पहिल्याच फेरीत १ हजार ५५ मतांनी पिछाडीवर पडले. माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांचे आव्हान पेलण्यात त्यांना अपयश आले. परिणामी कस्पटे यांनी वस्ती भागांसह कामठे यांचा बालेकिल्ला पिंपळे निलख गावठाणातही मताधिक्य मिळवले. कस्पटे यांच्यासह भाजपचे माजी नगरसेवक विनायक गायकवाड, आरती चोंधे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी राखत यश मिळवले. तर, भाजपच्याच स्नेहा कलाटे यांनी १४ हजार ३४९ च्या मताधिक्याने पहिल्याच टर्ममध्ये विजय मिळवला.

प्रभाग क्रमांक २८ मध्ये राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका शीतल काटे आणि भाजपच्या उमेदवार अनिता काटे यांच्यात सोळाव्या फेरीपर्यंत अत्यंत चुरशीची लढत झाली. चौदाव्या फेरीपासून अनिता काटे यांनी अल्प मताधिक्याने आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरू केली. ही आघाडी कायम राखत अखेरीस अनिता काटे या १ हजार ५२४ मतांच्या फरकाने विजयी ठरल्या. या प्रभागात भाजपचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, कुंदा भिसे तसेच राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना काटे हे चांगल्या मतांनी विजयी झाले.

प्रभाग क्रमांक २९ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार तानाजी जवळकर यांनी भाजपचे श्याम जगताप यांना सुरुवातीपासूनच आव्हान दिले होते. सहाव्या फेरीअखेर त्यांनी एक हजार मतांची आघाडी घेत जगताप यांना पिछाडीवर टाकले. अकराव्या फेरीत चित्र पालटले आणि भाजपचे श्याम जगताप यांनी १०८ मतांची आघाडी घेत जवळकर यांना मागे टाकले. चौदाव्या फेरीत जगताप यांनी दोन हजार मतांची आघाडी मिळवत विजयाकडे वाटचाल केली. अखेरच्या फेरीअखेर त्यांनी ४ हजार ३३१ मतांची आघाडी राखत विजय निश्चित केला. या प्रभागात भाजपच्या उमेदवार रविना आंघोळकर, माजी महापौर शकुंतला धराडे आणि माजी नगरसेवक शशिकांत कदम यांनीही सुरुवातीपासूनच आघाडी राखत विजयश्री मिळवली.

क्षणचित्रे
- कुंदा भिसे, अनिता काटे, स्नेहा कलाटे, श्रुती वाकडकर, शाम जगताप पहिल्याच प्रयत्नात विजयी
- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांचा दारुण परभाव
- शकुंतला धराडे, राहूल कलाटे, शत्रुघ्न काटे, संदीप कस्पटे, आरती चोंधे, नाना काटे, विनायक गायकवाड, शशिकांत कदम हे माजी ठरले आजी
- पक्षांतर केलेल्या उमेदवारांचाही विजय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com