अजित पवार आक्रमक, तरीही सत्ता दूरच

अजित पवार आक्रमक, तरीही सत्ता दूरच

Published on

पिंपरी, ता. १७ : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनपेक्षितपणे चांगली कामगिरी केली असली, तरी सत्ता मात्र हातातून निसटली. शहर पातळीवर लढा उभा करू शकणाऱ्या स्थानिक नेतृत्वाचा अभाव आणि अनेक प्रभावी नेत्यांची शांत भूमिका या कारणांमुळे राष्ट्रवादी कमी पडल्याचे राजकीय चित्र समोर आले आहे. सत्ता दूर राहिली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आक्रमक प्रचारामुळे पक्षाला जे यश मिळाले, त्याचेही शहरात कौतुक होताना दिसत आहे.
या निवडणुकीत पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे चार आमदार आणि युतीतील शिवसेनेचा एक खासदार सत्तेसाठी मैदानात उतरले होते. सुरवातीला भाजप एकहाती सत्ता मिळवेल, असे स्पष्ट चित्र होते. अजित पवार यांची पहिली पत्रकार परिषद होईपर्यंत राष्ट्रवादी पिछाडीवरच असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता. त्यानंतर मात्र अजित पवार यांनी प्रचाराची सूत्रे स्वतः हातात घेत आक्रमक भाषणांची मालिकाच सुरू केली. स्थानिक भ्रष्टाचाराचे मुद्दे, भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर थेट हल्लाबोल आणि विरोधकांवर रोखठोक टीका यामुळे भाजप व राष्ट्रवादीमध्ये तगडी लढत निर्माण झाली.
प्रचाराच्या मध्य टप्प्यात भाजपचे संदीप वाघेरे, शिवसेनेचे प्रमोद कुटे यांच्यासारखे माजी नगरसेवक, काही पदाधिकारी राष्ट्रवादीत दाखल झाल्याने पक्षाचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर भाजपनेही राष्ट्रवादीतील काही नेत्यांचे पक्षप्रवेश घडवून आणत प्रत्युत्तर दिले. या राजकीय खेळ्यांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी सातत्याने आक्रमक भूमिका ठेवत कार्यकर्ते आणि उमेदवारांमध्ये उत्साह निर्माण केला. सुरवातीला २० पेक्षा कमी नगरसेवक निवडून येतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात हा आकडा ५५ पेक्षा जादा जागांपर्यंत जाऊ शकतो, असे सकारात्मक वातावरण त्यांनी तयार केले.
तरीही प्रत्यक्ष निकालानंतर राष्ट्रवादीला सत्तेपासून दूरच राहावे लागले. राजकीय जाणकारांच्या मते, स्थानिक नेतृत्व कमी पडल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर येत आहेत. उमेदवारी निवडीत सुरवातीपासूनच ठोस धोरण राबवणे गरजेचे होते. अनेक महत्त्वाच्या आणि अनुभवी नेत्यांनी निवडणुकीत साथ सोडली. त्यामुळे पक्षाने मोजके जुने आणि मोठ्या प्रमाणात नवखे उमेदवार मैदानात उतरवले. जे अनुभवी होते तेही आपापल्या प्रभागात प्रचारात अडकले. या परिस्थितीत अजित पवार यांनी स्वतः आघाडी घेत सत्ता काळात भाजपने महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचारावर जोरदार हल्लाबोल केला. अनेक सभा, भाषणे घेत त्यांनी ‘सत्ता येणारच’ असा विश्वास व्यक्त केला. काही प्रभागांमध्ये याचा फायदा झाला, मात्र तो संपूर्ण शहरात सत्ता मिळवण्यासाठी अपुरा ठरला.

राष्ट्रवादी पराभवाची प्रमुख कारणे
- स्थानिक पातळीवरील महत्त्वाचे नेते पक्ष सोडून गेल्याचा मोठा फटका
- अनेक उमेदवार नवखे असल्याने संघटनात्मक ताकद कमी पडली
- स्थानिक अनुभवी नेतृत्व प्रभागांपुरते मर्यादित राहिले
- शहर पातळीवर दिशा देणारे, आक्रमक प्रचाराची धुरा वाहणारे नेते नव्हते
- स्थानिक नेत्यांकडून अपेक्षित आक्रमक प्रचार न झाल्याचाही परिणाम
- उमेदवारी निवडीवेळी संभ्रम योग्य वेळी दूर झाला नाही
- दोन्‍ही राष्ट्रवादी एकमेकांसमोर मैत्रीपूर्ण लढल्‍याने फटका

बलाढ्यांना अपयश
या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या काही बलाढ्य नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. मोरेश्वर भोंडवे आणि त्यांची पत्नी जयश्री भोंडवे, माजी स्थायी समिती सदस्य सीमा साळवे, वसंत बोराटे, ज्‍येष्ठ नगरसेवक नाना काटे यांच्‍या पत्‍नी शीतल काटे हे पराभूत झाले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com