पिंपरी चिंचवडमध्ये मनसेचे इंजिन ''यार्डातच''
पिंपरी, ता. १७ : पक्षनेतृत्वाचे दुर्लक्ष, शहर पातळीवरील पक्षसंघटनेचे मर्यादित जाळे, समोर तगड्या पक्षांचे आव्हान, मतदारांपर्यंत पोहोचताना झालेली दमछाक, यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या महापालिका निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. २०१२ च्या निवडणुकीतील चार व २०१७ मधील एक असे आकडे आता शून्यावर आल्याने मनसेचे इंजिन ''यार्डातच'' राहिल्याचे चित्र आहे.
मनसेची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा २०१२ च्या निवडणुकीत चार नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे त्यावर्षी कार्यकर्त्यांत उत्साह होता. अनेक तरुण मनसेत सहभागी झाले होते. त्यानंतर २०१७ च्या निवडणुकीतही पक्षाला मोठे यश मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, तो पूर्ण चुकला आणि एका नगरसेवकावर पक्षाला समाधान मानावे लागले. सचिन चिखले महापालिका सभागृहात गेले. त्यानंतर तरी पक्षाला काहीशी उभारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. अगोदरच पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मर्यादित संख्या असताना त्यातही गट-तट असल्याने हवे तसे तगडे संघटन उभे राहिले नाही. कार्यकर्त्यांचे मेळावा, आंदोलने वा इतर उपक्रमांतून मनसेची ताकद फार दिसत नाही. अशातच यंदाच्या महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर युती करत नऊ प्रभागांतून १३ उमेदवार रिंगणात उतरविले होते. काही उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मते मिळविली. मात्र, ती विजयात परावर्तित झाले नाही.
जोरदार टक्कर
निगडी-यमुनानगर या भागामधून अश्विनी चिखले व त्यांचे पती सचिन चिखले यांनी २०१२ मध्ये आणि सचिन चिखले यांनी २०१७ मध्ये प्रतिनिधित्व केले होते. यंदाही हे दोघे निगडी-यमुनानगर प्रभाग क्रमांक १३ मधून रिंगणात उतरले होते. दोघांनीही दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. यामध्ये सचिन चिखले यांना भाजपचे उत्तम केंदळे यांच्या विरोधात लढताना तब्बल ६ हजार ४९५ मते पडली तर अश्विनी चिखले या शिवसेनेच्या सुलभा यांच्याविरोधात लढल्या असता त्यांनाही तब्बल ७ हजार ३८३ मते पडली. ही मनसेसाठी दिलासादायक बाब आहे. मात्र, ती मते विजयात परावर्तित झाली नाहीत, हे त्यांच्यासाठी दुर्दैव म्हणावे लागेल. यासह शशिकिरण गवळी, कैलास दुर्गे, हर्षकुमार महाडीक, आदिती चावरिया, स्वाती दानवले, राजू साळवे, अस्मिता माळी, राजू भालेराव, लता शिंदे, तुकाराम शिंदे, रेखा जम यांनाही चांगली मते मिळाली.
---
पक्षनेतृत्वाचे दुर्लक्ष
निवडणूक काळातच नव्हे तर इतर वेळीही मनसेच्या नेत्यांचा शहरात फारसा वावर नसतो. अशातच एवढ्या मोठ्या निवडणुकीत पक्षाचे तब्बल तेरा उमेदवार रिंगणात असताना तरी नेत्यांनी लक्ष घालणे आवश्यक होते. मात्र, संपूर्ण निवडणूक कालावधीत एकही नेता शहरात फिरकला नाही. ना रॅली, ना सभा अशी स्थिती होती. उमेदवार स्वतःच खिंड लढवीत होते.
===============================
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

