प्रशासक कामकाजाला ४६ महिन्यांनी पूर्णविराम
पिंपरी, ता. १८ ः महापालिकेत २०१७ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १३ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला. तेव्हापासून महापालिका आयुक्तांकडे प्रशासक म्हणून कामकाज आहे. आता निवडणूक झाली असून, तीन वर्षे आणि दहा महिन्यांनी अर्थात तब्बल ४६ महिन्यांनी नगरसेवक, नगरसेविका सभागृहात पाऊल ठेवणार आहेत.
ओबीसी आरक्षणाचा न्यायप्रविष्ट मुद्द्यासह विविध कारणांनी महापालिका निवडणूक विहित कालावधीत होऊ शकली नाही. लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपताच महापालिका प्रशासक नियुक्त करण्यात आले. या काळात राजेश पाटील, शेखर सिंह या आयुक्तांनी महापालिकेचे प्रशासक म्हणून कारभार पाहिला आहे. सध्या श्रावण हर्डीकर प्रशासक आहेत. लोकप्रतिनिधी नसल्याने शहराच्या विकासावर, निधीवाटपावर आणि स्थानिक प्रश्नांवर सर्व निर्णय प्रशासक घेत होते. मात्र, लोकप्रतिनिधींचा अभाव सतत जाणवत होता. त्यामुळे महापालिका निवडणूक कधी लागणार याचीच आतुरता अनेकांना होती. अखेर त्यांची आतुरता संपली असून, निवडणूक प्रक्रियेत १५ जानेवारीला मतदान होऊन १६ जानेवारीला निकाल लागला आहे. नव्याने निवडून आलेले १२८ नगरसेवक महापालिकेत दिसणार आहेत. यामध्ये ६४ पुरुष आणि ६४ महिला असतील.
---

