निवडणुकीत प्रादेशिक पक्षांना भोपळा फोडता आला नाही
निवडणुकीत प्रादेशिक पक्षाचा प्रभाव ‘शून्य’
पिंपरी, ता. १७ ः प्रादेशिक पक्षांचे शहरातील अस्तित्व हे काही भागापुरते मर्यादित, सक्षम नेतृत्वाचा अभाव, पक्षातील अंतर्गत गटबाजीचा फटका महापालिका निवडणुकीत प्रादेशिक पक्षांना बसला. प्रादेशिक पक्ष नगरसेवकांपासून ‘वचिंत’ राहिले.
शहरात ३२ प्रभागांत १२८ जागांसाठी गुरुवारी (ता. १५) निवडणूक झाली. शुक्रवारी (ता. १६) निकाल जाहीर झाला. निवडणुकीत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), वंचित, मनसे, आम आदमी पार्टी या प्रादेशिक पक्षांनी निवडणूक लढवली होती. रिपब्लिकन पक्ष (आठवले) पाच, आम आदमी पक्षाने ३२, वचिंतने ३६ आणि रासपने दोन ठिकाणी निवडणूक लढवली होती. रासपने शिवसेना-ठाकरे पक्षाबरोबर युती केली होती. आम आदमी पक्ष आणि वचिंतने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. एकही प्रादेशिक पक्षांनी सर्व १२८ जागांवर उमेदवार देता आले नव्हते.
आंबेडकर यांच्या आरोपांकडे नागरिकांचे दुर्लक्ष
वंचितचे २६ उमेदवार महापालिका निवडणुकीत रिंगणात होते. वंचितसाठी सुजात आंबेडकर यांनी दापोडीत, प्रकाश आंबेडकर यांनी पिंपरीत सभा घेतली होती. तसेच सेक्टर २२ येथे बैठक आणि पत्रकार परिषद घेतली होती. आंबेकर यांनी स्थानिकांच्या जिव्हाळ्याच्या एसआरए घोटाळ्यावर टीका केली होती. केंद्र आणि राज्य शासनावर निशाणा सावळा होता. मात्र राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांनी शहराध्यक्ष नितीन गवळी यांना विचारात न घेता एबी फॉर्मचे वाटप केले होते. अनेक आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्याने स्थानिक कार्यकर्त्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. त्यामुळे गटबाजी उफाळून आली. त्याचा फटका बसला. आंबेडकर यांच्या केंद्र आणि राज्य सरकारवरील टीकेला नागरिकांना गाभीर्यांने घेतले नाही, असे निकालावरून दिसून येत आहे.
-----
आम आदमी पक्षाला खाते उघडता आले नाही..
आम आदमी पक्षाने यंदा प्रथमच महापालिका निवडणुका लढवल्या. पक्षाचे ३२ उमेदवार रिंगणात होते. मात्र पक्षाचे संघटन मजबूत नाही. त्यात निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी एकही राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरचे नेते आले नव्हते. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आक्रमक प्रचार करण्यात अपयश, पक्षाची शहर कार्यकर्त्यांची फळी मजबूत नसल्याने निवडणुकीत अपेक्षित मतदान झाले नाही. बहुतांश जागांवर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
----------
आरपीआयला दोन जागांवर विजयी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) १५ जागांवर उमेदवार लढविण्याच्या तयारी दर्शवली होती. सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही ‘पूर्ण ताकदीने कामाला लागा’ अशा सूचना दिल्या होत्या. पण, भाजपने आरपीआयला शेवटच्या क्षणी केवळ पाच जागा दिल्या. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष आणि भाजप यांनी युतीत निवडणूक लढवली असली तरी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांनी भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावर पाच जागांवर निवडणूक लढवली होती. त्यांच्यासाठी रामदास आठवले यांनी वाकडमध्ये सभा घेतली होती. भाजप आणि आरपीआय (आठवले) यांच्यात आलबेल नसल्याचे चित्र होते. परंतु, त्यानंतर त्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. तेथे सर्व आलबेल असल्याचे सांगितले. २०१७ महापालिका निवडणुकीत आरपीआयच्या दोन जागा निवडून आल्या होत्या. यावेळीही त्यांच्या दोन जागा निवडून आल्या आहेत. वाकड-ताथवडे-पुनावळे (प्रभाग क्रमांक २५) येथून रिपब्लिकन पक्ष (आठवले) शहराध्यक्ष कुणाल व्हावळकर आणि रावेत-किवळे-मामुर्डी (प्रभाग १६) धर्मपाल तंतरपाळे विजयी झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

