गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
(वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय, आंबी)
डी. वाय. पाटील एज्युकेशन ॲकॅडमी मुंबई अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन डीवायएसपीपदी निवड झालेली ऋतुजा कड यांची प्रमुख उपस्थित होती. कृषी महाविद्यालयाची ती माजी विद्यार्थिनी आहे. विद्यार्थी अभिषेक मेमाणे याची नवी दिल्लीत झालेल्या ‘मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया २०२५’ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामासाठी दिला गेला. तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या अमृता जगताप व विश्वतेज सरवळे यांचा सत्कार प्राचार्य डॉ. जाधव यांच्या हस्ते झाला. श्रद्धा पेंडसे यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन ओम नायकवडे यांनी केले. आभार गौरी वाल्हेकर यांनी मानले.
(87286)
--
राष्ट्रीय युवक दिन उत्साहात
(यशस्वी संस्था, चिंचवड)
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) संकुलात स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवक दिन उत्साहात झाला. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी चिंचवड शाखेतर्फे डॉ. नचिकेत देशमुख यांचे ‘युवकांसाठी जीवन कौशल्य’ विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, ‘‘युवकांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रातून प्रेरणा घेऊन नैतिकतेचे अधिष्ठान बाळगत अभिनव वैचारिक दृष्टिकोन विकसित करण्यावर भर द्यावा. प्रचंड वेगाने बदलणाऱ्या सध्याच्या जगात क्रमिक अभ्यासक्रमासोबतच काल सुसंगत तंत्र कौशल्य युवकांनी आत्मसात करायला हवे. एकाग्रता, निर्भयता, चारित्र्यसंपन्नता आणि सेवा या चतु:सूत्रीचा अवलंब केल्यास युवा वर्गाला सहजरित्या ध्येयप्राप्ती करता येईल.’’ आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांचे मार्गदर्शन लाभले.
(87288)
---
वाहतूक सुरक्षिततेसाठी जनजागृती
(पीसीईटीचे रावेत कॉलेज)
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स रावेत यांच्यातर्फे रावेत चौकात वाहतूक सुरक्षितता जनजागृती कार्यक्रम यशस्वी केला. वाढते अपघात, नियमांचे उल्लंघन व जीवितहानी लक्षात घेऊन समाजामध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. प्राचार्य डॉ. स्मृती पाठक यांनी मार्गदर्शन केले. प्रा. देवेंद्र देसाई, प्रा. सुप्रिया कुलकर्णी, प्रा. प्रसाद तांबे, प्रा. राजेश पाटील यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी हातात ‘वाहतूक नियम पाळा’, ‘हेल्मेट वापरा’, ‘सीट बेल्ट लावा’, ‘दारू पिऊन वाहन चालवू नका’, ‘वेग मर्यादेत ठेवा’ अशा आशयाचे फलक घेऊन जनजागृती केली. वाहनचालकांसह पादचाऱ्यांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगितले. दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे, चारचाकी वाहनचालकांनी सीट बेल्ट लावणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलवर बोलत वाहन न चालवणे याबाबत मार्गदर्शन केले. वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या व हेल्मेट घालून वाहन चालवणाऱ्या दुचाकीस्वारांचे कौतुक म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांना गुलाबपुष्प देऊन प्रोत्साहन दिले. काही विद्यार्थ्यांनी घोषणांच्या माध्यमातून वाहतूक सुरक्षिततेचे संदेश दिले. ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, उद्योजक अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
(87289)
---
सायबर जनजागृती कार्यक्रम
(मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, मोशी)
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मोशीतील मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी येथे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जागरूकता केली. भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल तानाजी बनसोडे यांनी त्यांच्या पथकासह मार्गदर्शन केले. त्यांच्या पथकात महिला पोलिस अंमलदार मोनिका वर्पे व निकिता बाड यांचा समावेश होता. बनसोडे यांनी सोशल मीडियावरील अकाउंट हॅक झाल्यास कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती दिली. व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर करताना घ्यावयाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना त्यांनी स्पष्टपणे समजावून सांगितल्या. सोशल मीडियाचा वापर करताना सर्वांनी सतर्क, जागरूक व सावध राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. प्रा. रेखा भालेराव यांनी संयोजन केले. गणेश कदम यांनी सहकार्य केले.
(87287)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

