गुन्‍हे वृत्‍त

गुन्‍हे वृत्‍त
Published on

बनावट पत्राद्वारे ज्येष्ठाची १५ लाखांची फसवणूक
पिंपरी ः पोलिस अधिकारी असल्याचे भासवून बनावट पत्राद्वारे मनी लॉन्ड्रिंग आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गुन्हा दाखल असल्याची भीती दाखवत ज्येष्ठ नागरिकाची १५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. पिंपळे गुरव परिसरात हा प्रकार उघडकीस आला. विष्णू घारे (७१, रा. गजानननगर, पिंपळे गुरव) यांनी याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विविध मोबाईल क्रमांकांचा वापर करणाऱ्या व्यक्ती, बँक खातेधारक आणि इतर अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकाचा वापर दहशतवादी कारवायांसाठी झाल्याचे सांगून मालमत्ता व बँक खाते जप्त करण्याची भीती घातली. त्यानंतर कारवाई टाळण्यासाठी १५ लाख रुपये भरण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली.

गुंतवणुकीच्या आमिषाने ९ लाखांचा गंडा
पिंपरी : शेअर बाजारात गुंतवणूक करून नफा मिळविण्याचे आमिष दाखवत आयटी क्षेत्रातील तरुणाची ९ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केली. शुभम जोशी (वय ३१, रा. भोसरी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनल नाईक यांच्यासह अन्य सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीला शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी व्हॉट्सॲपवरील ग्रुपमध्ये जोडले. त्‍यानंतर विविध बँकमध्‍ये ९ लाख ३८ हजार रुपये गुंतविण्यास सांगितले. नफा मिळाल्याचे दाखवून तो काढता येत नसल्‍याने फिर्यादी यांनी संपर्क साधला. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पार्क केलेली दुचाकी चोरीला
पिंपरी ः देसाई हॉस्पिटलजवळ पार्क केलेली दुचाकी चोराने चोरून नेली. मंगळवारी (ता. १८) रात्री दोन ते सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. अश्विनी दिलीप बंसल यांनी याबाबत संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोराविरुद्ध दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेगवेगळ्या दोन कारवायांत अमली पदार्थांसह दोघे ताब्यात
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अमली पदार्थविरोधी मोहीम राबवत, शहरात दोन वेगवेगळ्या कारवाया करून दोघांना ताब्यात घेतले. हिंजवडी आणि चिंचवड परिसरात पोलिसांनी हे छापे टाकले. हिंजवडी पोलिसांनी जगदीशकुमार बिष्णोई (वय ३८, रा. विरावा, राजस्थान) याला अटक केली. त्‍याच्‍याकडून ४१ ग्रॅम मेफेड्रोन पावडर (पार्टी ड्रग्ज) जप्त करण्यात आली.
तसेच, चिंचवड पोलिसांनी संजय कांबळे (वय ५८, रा. मोरया कॉलनी, वाल्‍हेकरवाडी) याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून सुमारे ३४६ ग्रॅम गांजा व एक मोबाईल, असा एकूण सुमारे १८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुलाने हा गांजा आणून दिल्‍याचे त्याने पोलिसांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com