

निवृत्तीचा धर्म जागो।
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्र संस्कृतीचा मुख्य प्रवाह आहे. येथील देव, धर्म, भाषा, आहार-विहार, राजकारण इत्यादी गोष्टींवर निर्णायक परिणाम वारकरी संतांनी घडवून आणला. मराठी जनमानसाची बोधपातळी वाढवण्याचे काम ‘ज्ञानोबा-तुकाराम’ या संतपरंपरेने केले. त्याची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम संत निवृत्तीनाथ महाराजांनी केले.
- सचिन महाराज पवार, पुणे
तेराव्या शतकात धर्मांतर्गत कर्मकांड आणि अनाचाराने जोर धरला होता आणि बाहेरच्या बाजूने परकीयांची आक्रमणे होत होती. खऱ्या धर्माला आतून आणि बाहेरूनही संकट होते. अशा पेचप्रसंगाच्या काळात संत श्री निवृत्तिनाथांनी तोडगा काढला. त्यामुळे महाराष्ट्राचे आत्मभान अबाधित राहिले. भागवतधर्माचा विस्तार झाला.
वारकरी पंथाचा पूर्वेतिहास म्हणून गोरखनाथ व गहिनीनाथ या सत्पुरुषांच्या चरित्र, तत्त्वज्ञान आणि शिकवणीचा गंभीरपणे अभ्यास करायला हवा. ओशो रजनीश यांचा तत्त्वज्ञान विषयातील अधिकार निर्विवादपणे सर्वांना मान्य आहे. भारतीय धर्म अवकाशातील सर्वांत तेजस्वी चार दार्शनिक कोण? असा प्रश्न कवी सुमित्रानंदन पंत यांनी ओशो यांना केला होता. ओशोंनी श्रीकृष्ण, बुद्ध, पतंजली आणि गोरख या चारजणांचा भारतीय विचारपरंपरेतील सर्वात तेजस्वी तारे म्हणून उल्लेख केला आहे. या यादीत गोरक्षनाथांचा समावेश आहे, इतके महत्त्वाचे कार्य त्यांनी करून ठेवले आहे. समाजातील शेवटच्या घटकांशी नाळ जोडलेल्या या सत्पुरुषांना समाजावरील संकटाचा आणि त्यावर द्याव्या लागणाऱ्या उत्तरांचा अंदाज होता. धर्म, समाज, लोकव्यवहार आणि राजकीय परिस्थिती या सर्वांचे व्यापक आकलन त्यांना होते. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना श्री कृष्णमंत्राचा उपदेश केला. श्रीकृष्णभक्तीची परंपरेने आलेली सूत्रे विशद केली व तोच कृष्ण विठ्ठल रूपाने पंढरपुरात अवतीर्ण झाला, हेही सांगितले. ‘निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज । गयनीराजे मज सांगितले ॥’ त्याच श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेचे भाष्य ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्या शिष्याकरवी म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांकडून करवून घेतले. भगवान शिवशंकर- मच्छिंद्रनाथ - गोरक्षनाथ- गहिनीनाथ या परंपरेतून आलेला तत्त्वबोध आणि श्रीकृष्णाचे गीतेतील तत्त्वज्ञान यांची एकवाक्यता निवृत्तीनाथांच्या प्रयत्नाने सिद्ध झाली.
गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना उपदेश करणे आणि ज्ञानदेवांनी त्या प्रेरणेने ज्ञानेश्वरी सांगणे, हा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने ‘टर्निंग पॉइंट’ होता. ‘श्रीनिवृत्तीनाथ हे नाथपंथाचे पिकलेले फळ असून, वारकरी संप्रदायाचे बीज आहे.’ जगन्नाथ महाराज पवार यांनी निवृत्तीनाथांचे असे केलेले वर्णन अगदी योग्य आहे. वारकरी संप्रदाय हा गहिनीनाथांचा प्रसाद आहे. तो निवृत्तीनाथांनी दिलेला धर्म आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ‘निवृत्तीचा धर्म जागो ।’ असे आवाहन करत त्याच्या प्रचार-प्रसाराची जबाबदारी खांद्यावर घेतली होती.
पंढरीची वाट सोपी
नाथपंथाची पार्श्वभूमी असतांनाही निवृत्तिनाथांनी पंढरीची वाट सोपी केली. योगमुद्रेपेक्षा प्रेममुद्रेला महत्त्व दिले. एक गुरू-एक शिष्य असा संकुचित पारमार्थिक व्यवहार नाकारून पारमार्थिक ज्ञानाचे सार्वत्रिकरण करण्याची मुहूर्तमेढ रोवली. भक्तितत्त्वज्ञानाचे ज्ञानेश्वरीच्या रूपाने सिद्धान्तीकरण करवून घेतले.
‘गहिनीनाथे मज सांगितले सार ।
केली ज्ञानेश्वरे व्याख्या त्याची ॥’
बोधाचा हा सारा प्रसाद महाराष्ट्राच्या झोळीत टाकला. श्री ज्ञानेश्वर महाराज ही श्रीनिवृत्तीनाथांनी आपल्या सर्वांना दिलेली सर्वोच्च देणगी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत मातोश्री जिजाऊंची जी भूमिका होती, तीच भूमिका श्री ज्ञानोबारायांच्या जडणघडणीत निवृत्तीनाथ महाराजांची आहे.
शैव-वैष्णव वाद संपवत नाथ-भागवत पंथ यांचा अपूर्व संगम श्रीनिवृत्तीनाथ महाराजांनी घडवून आणला. मराठी भाषेत भक्तीचे तत्त्वज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी आग्रह धरला.
‘‘तीरे संस्कृताची गहने ।
तोडोनिया मराठी शब्दसोपाने ।
रचिले धर्मनिधाने ।
श्री निवृत्तीदेवे ॥’’
संस्कृताची गहन तीरे तोडून मराठीत धर्मनिधान रचण्याचे श्रेय श्रीनिवृत्तीनाथांचे असल्याचे ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत सांगितले आहे. श्री निवृत्तीनाथांचे संपूर्ण कार्य हे एका व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नतीपुरते मर्यादित नाही; ते संपूर्ण मराठी समाजाच्या आध्यात्मिक पुनर्जागरणाचे कार्य आहे. त्यांनी घडविलेल्या गुरू-शिष्य परंपरेतून संत ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यासारखी तेजस्वी संतमालिका महाराष्ट्राला लाभली.
ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला. परंतु त्या पायाची वैचारिक आखणी, तात्त्विक अधिष्ठान आणि आध्यात्मिक दिशा श्रीनिवृत्तीनाथांनी निश्चित केली. म्हणूनच वारकरी परंपरेचा इतिहास समजून घ्यायचा असेल, तर ‘ज्ञानोबा-तुकाराम’ या प्रवाहामागे उभ्या असलेल्या ‘निवृत्तीचा धर्म’ या मूळ तत्त्वदृष्टीचा अभ्यास अपरिहार्य ठरतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.