क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संस्था
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संस्थेच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने ‘सावित्रीबाई फुले जयंती’ साजरी करण्यात आली. याप्रसंगी सल्लागार ज्योती लोहिया, संस्थेच्या अध्यक्षा जयश्री निंबारकर, प्राथमिकचे मुख्याध्यापक आयुष निंबारकर, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका स्नेहल पारखे उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. पाचवीमधील संस्कृती दनाने हिने ‘मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय’ हे एकपात्री नाटक सादर केले. तसेच सहावी व सातवीमधील विद्यार्थिनींनी अंधश्रद्धेला बळी पडू नका यावर आधारित एक ‘लघुनाटिका’ सादर केली. यासाठी उपशिक्षिका विठा कोळेकर यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका स्नेहल पारखे यांनी नियोजन केले. गजानन शिंदे यांनी सूत्रसंचलन केले. विठा कोळेकर यांनी आभार मांडले.
एम. एम. विद्यालय
थेरगाव येथील एम. एम. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा पार पडला. यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे उद्घाटन ‘सकाळ’च्या बातमीदार मीनाक्षी गुरव व जलतरणपटू साध्वी धुरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. भाऊसाहेब जाधव, संस्था समन्वयक तेज निवळीकर, संस्था सदस्य संजय सूर्यवंशी, प्रा. सुजाता शेणई, संस्था शिक्षणाधिकारी अंकुश काळखैरे, मुख्याध्यापिका विजयश्री काजळे उपस्थित होते. मुख्याध्यापिका काजळे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून शाळेचा वार्षिक प्रगती अहवाल सादर केला. स्नेहसंमेलनात स्वागतगीत, गणेश वंदना, महाराष्ट्रातील लोकनृत्य, एकांकिका, प्रबोधनपर पाणी वाचवा, बॉलिवूड गीते या नृत्य प्रकारांचा समावेश होता. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. सूत्रसंचालन सावकार येवले व योगिता सात्रस यांनी केले.
सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय
आकुर्डी येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिन साजरा केला. अध्यक्षस्थानी नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक सचिव डॉ. गोविंद दाभाडे होते. आदित्य शेळवणे यांनी श्रीनिवासन रामानुजन यांचा जीवनपट सांगितला. याप्रसंगी प्राचार्या संगीता गुरव, उपप्राचार्य विजय बच्चे, संजय कांबळे उपस्थित होते.
एस. एस. इंटरनॅशनल स्कूल
चऱ्होली बुद्रूक येथील एस. एस. इंटरनॅशनलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. ‘नेचर्स सिंफनी’ या संकल्पनेवर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. बालकलाकारांनी विविध मराठी, हिंदी गाण्यांच्या तालावर ठेका धरत नृत्य सादर केले. या वेळी विविध स्पर्धेतील बक्षिसप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. माजी महापौर नितीन काळजे, माजी नगरसेवक सचिन तापकीर, माजी नगरसेवक अजित बुर्डे, सुनील काटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी शाळेचे अध्यक्ष लक्ष्मण देवकर, संदीप देवकर, शैलेश देवकर व पालक उपस्थित होते.
श्री सयाजीनाथ महाराज विद्यालय
वडमुखवाडी येथील श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयात राष्ट्रीय गणित दिन साजरा केला. मुख्याध्यापक राजकुमार गायकवाड यांच्या हस्ते गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या वेळी विभाग प्रमुख नितीन वारखडे, विभाग प्रमुख नीलम नाईक, राणी पालेकर, राहुल ननवरे उपस्थित होते. गणित दिनाचे औचित्य साधून विद्यालयात गणित रांगोळी स्पर्धा, पाढे पाठांतर स्पर्धा, गणित प्रोजेक्ट प्रदर्शन, प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आल्या. गणित दिनानिमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार रामभाऊ मोझे, संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे, सदस्या अलका पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय
निगडी-प्राधिकरण सिंधुनगर येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नववर्ष शुभेच्छा व मकर संक्रांत समारंभाचा कार्यक्रम पार पडले. अध्यक्षस्थानी नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक सचिव प्रा. डॉ. गोविंद दाभाडे उपस्थित होते. तसेच प्रभारी मुख्याध्यापिका संगीता गुरव, श्री स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंत अभोणकर, सरस्वती विद्यालयाचे उपप्राचार्य विजय बच्चे, संजय कांबळे उपस्थित होते. पोंदे यांनी नवीन वर्ष व मकर संक्रांतीची सखोल माहिती शुभेच्छापर मनोगतातून व्यक्त केली. प्रास्ताविक मनिषा जाधव यांनी केले.
सिद्धिविनायक पब्लिक स्कूल
चिखलीतील मोरेवस्ती येथील सिद्धिविनायक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे १६वे वार्षिक स्नेहसंमेलन टाउन हॉल येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या भव्य सादरीकरणाने जल्लोषात पार पडले. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष कसबे, भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू साजिद तांबोळी, अॅड. अजित बोराडे, संस्थेचे सचिव मारुती जाधव, अध्यक्षा निर्मला जाधव आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेली भक्तिगीते, लोककला, लावणी, देशभक्तीपर गीतांवरील नृत्य, भावगीत तसेच हिंदी गाण्यांवरील आकर्षक नृत्यप्रकारांनी कार्यक्रमात रंगत आणली. तब्बल १५०० विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनात सहभाग नोंदवून नृत्य, संगीत व लोककलेतून आपली कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक शाळा
हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांद्वारे बालिका दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेतून चौथीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील प्रसंगांचे नाट्यीकरण करून दाखविले. शहनाझ हेब्बाळकर यांनी नाटकाचे लेखन केले होते. यासाठी सावित्रीबाईंच्या वेशभूषेत स्वरा टाकळकर व महात्मा फुले यांच्या वेशभूषेत हार्दिक नाईक आले होते. अवनी चवले हिने बालिका दिनाची माहिती सांगितली. रक्षा अंबाडे हिने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील गाणे गायले. तसेच चौथीच्या शिक्षिका राजश्री भालेराव यांनी ‘मी सावित्री बोलते.....’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. गीतमंचाच्या अनिता येनगुल, अनघा कडू व समीक्षा इसवे यांनी सावित्रीबाईंवरील समीक्षा इसवे यांनी लिहिलेले गाणे सादर केले. ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे, डॉ. विठ्ठल मोरे यांनी मार्गदर्शन केले. शहनाझ हेब्बाळकर यांनी सूत्रसंचालन केले.
सेंट एन्स फन फेअर
त्रिवेणी नगर येथील सेंट एन्स फन फेअरमध्ये ९०० विद्यार्थी सहभागी झाले. फूड फेस्टिव्हल आणि क्रिसमस सेलिब्रेशन आयोजन केले होते. मिकी माउस, कार रेस, लकी डिप्स, आकाश पाळणा, मेरी गो राउंड, गण शूट, गॅस फुगे, ट्रॅपोलोन अशा विविध खेळाचा आनंद मुलांनी घेतला. तर खाद्य महोत्सवात फ्रेंच राईस, आईस्क्रीम बनाना कष्टर्ड, पाणी पुरी, वडापाव, लिंबू सरबत, कॉफी भेळ, सॅन्डविच, गुलाबजाम आदी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. याप्रसंगी सी. जे फ्रान्सिस, ऐनी फ्रान्सीस, मुख्याध्यापिका करुणा विश्वकर्मा उपस्थित होते.
कै. विष्णुपंत ताम्हाणे विद्यालय
कै. विष्णुपंत ताम्हाणे विद्यालय आणि विश्वरत्न इंग्लिश मीडियममध्ये सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या वेळी प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्नेहा घोडे हिने मी ‘सावित्री बोलतेय’ विषयावर मनोगतातून सावित्रीबाईंच्या कार्यावर प्रकाश टाकला. तसेच माधुरी धोत्रे यांनी एकपात्री प्रयोग सादर केला. सावित्रीबाईंचा संपूर्ण जीवनपट मांडला. या वेळी शाळेचे संस्थापक व्यंकट वाघमोडे, मुख्याध्यापिका रंजना आव्हाड, सई पांचाळ उपस्थित होते.
विलू पुनावाला हायस्कूल
विलू पुनावाला हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडला. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, उद्योजक रामदास काकडे, संस्थेचे कार्यकारी सचिव मनीषा बडदाळ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. दरम्यान, विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गुणगौरव करण्यात आला. शिक्षक किरण थोरात यांचा संस्थेतर्फे गौरव करून त्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी दशावतार संगीत नृत्य कलाकृती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. मुख्याध्यापक आशा धेंडे यांनी अहवाल वाचन केले. अनिल भांड यांनी प्रास्ताविक केले. दया आंबेकर व राजेंद्र खेडकर यांनी बक्षिसपात्र विद्यार्थ्यांचे वाचन केले. माजी विद्यार्थी हितेश कुलकर्णी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले.
एच. ए. स्कूल
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांच्या जयंतीनिमित्त एच. ए. स्कूल माध्यमिक विभाग, पिंपरी येथे संत तुकाराम नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोरख कुंभार व त्यांचे सहकारी यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांची आणि शिक्षकांची आज्ञा पाळावी, नियमांचे पालन करावे, कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राखावी तसेच विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच आपले ध्येय ठरवून त्यादृष्टीने वाटचाल करावी, यासंदर्भात समुपदेशन केले. सुषमा निगुडकर यांनी प्रास्तविक केले. शिल्पा राशिनकर यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षिका मनीषा कदम यांनी आभार केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

