महापालिकेच्या तीन रुग्णालयांत ‘डायलिसिस’ची प्रतीक्षा
पिंपरी, ता. १७ : मूत्रपिंड निकामी झाल्यास कमी खर्चात ‘डायलिसिस’ करता यावे, यासाठी महापालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह पाच ठिकाणी डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आले. त्यामुळे रुग्णांची सोय झाली असली, तरी येथे येणाऱ्यांची संख्या पाहता अन्य ठिकाणीही डायलिसिस सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.
मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर किंवा त्याची कार्यक्षमता कमी झाल्यानंतर त्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. मात्र, ज्या रुग्णांना दाता मिळत नाही किंवा शस्त्रक्रिया शक्य नसते अशांना आठवड्याला किमान एकदा तरी डायलिसिसचे उपचार घ्यावे लागतात. याचा खर्च खासगी रुग्णालयांमध्ये हजारोंच्या घरात असतो. त्यामुळे दर आठवड्याला हे उपचार घेणे शहरातील रुग्णांना शक्य होत नाही.
खासगी रुग्णालयांमध्ये एका डायलिसिससाठी साधारणतः १५०० पासून ते ३,५०० रुपयांपर्यंत खर्च येतो. तिथे महापालिका रुग्णालयांमध्ये याच उपचारासाठी ३०० रुपये आकारण्यात येतात. तर, साठ वर्षे वयोगटाच्या पुढील व पिवळी शिधापत्रिका असलेल्यांना हे उपचार मोफत दिले जातात. या सुविधांमुळे येथे येणाऱ्या रुग्णांची मोठी सोय होत आहे. ‘वायसीएम’सह महापालिकेच्या जिजामाता रुग्णालय, चिंचवड येथील तालेरा रुग्णालय, आकुर्डीतील कुटे रुग्णालय, थेरगाव रुग्णालय या ठिकाणी डायलिसिसची सोय आहे. मात्र, तीनही रुग्णालये जवळपासच्याच परिसरात असल्याने शहराच्या पूर्व भागातील येणाऱ्या रुग्णांना मात्र याचा लाभ घेण्यासाठी पिंपरी, चिंचवड व आकुर्डीत यावे लागते. त्यामुळे शहरातील भोसरी, सांगवी आणि यमुनानगर येथील रुग्णालयांमध्येही ही सुविधा सुरू व्हावी, अशी मागणी पुढे येत आहे.
डायलिसिसची गरज केव्हा भासते
- मूत्रपिंड निकामी झाल्यावर रक्तामध्ये युरिया, क्रिएटिनिन आणि इतर विषारी घटक साचल्याने रक्त अशुद्ध होत असल्यास
- शरीरातील जास्तीचे पाणी मूत्रविसर्जनाद्वारे बाहेर पडत नसल्यास
- रक्तातील खनिजांची पातळी सुरक्षित मर्यादेत ठेवण्यास
- रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास
कोणत्या रुग्णालयात कधी सेवा
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय : येथील डायलिसिस विभाग सर्वांत जुना आहे. २००२ मध्ये हा विभाग सुरू झाला.
तालेरा रुग्णालय, चिंचवड : ऑगस्ट २०२५ मध्ये आठ मशिनचे डायलिसिस केंद्र सुरू
थेरगाव रुग्णालय, थेरगाव : ऑक्टोबर २०२२ पासून मशिनसह डायलिसिस सुविधा सुरू
कुटे रुग्णालय, आकुर्डी : चार महिन्यांपूर्वी दोन मशिनसह डायलिसिस कक्ष सुरू
जिजामाता रुग्णालय, पिंपरी : सहा महिन्यांपासून चार मशिनचा डायलिसिस विभाग सुरू
जिथे डायलिसिस विभाग असतो, तिथे अतिदक्षता विभाग असणेही गरजेचे असते. यमुनानगर, भोसरी आणि सांगवी येथील रुग्णालये अतिशय लहान आहेत. तिथे डायलिसिस युनिट सुरू करण्यासाठी जागा नाही. मात्र, नव्याने होणाऱ्या मोशी येथील रुग्णालयात मात्र ही सुविधा आम्ही देणार आहोत.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका
PNE26V96430
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

