निर्भय कन्या अभियान
(मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, मोशी)
पीईएस मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी मोशी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या सहकार्याने निर्भय कन्या अभियान राबविले. मुलींमध्ये कायदेविषयक जागरुकता, आरोग्याविषयी मार्गदर्शन आणि आत्मसंरक्षण कौशल्ये विकसित करणे हा उद्देश होता. मॉडर्न लॉ महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. अनन्या बिबवे (महिलांचे हक्क व संरक्षणासंबंधी कायदे), डॉ. प्रेरणा गोळेकर-गोपाले (बदलती जीवनशैली आणि पीसीओडी व थायरॉईड), शिर्के स्पोर्ट्स अकॅडमीच्या गौरी शिर्के व सचिन शिर्के (आत्मसंरक्षण) आदी विषयांवर मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. एस. एन. ढोले व उपप्राचार्या डॉ. वृषाली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास अधिकारी स्नेहा पाटील व डॉ. एस. एस. फरांदे यांनी समन्वय साधला. श्रुती भगवत, सानिका डबडे आणि जान्हवी सावरकर या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले.
---
जॉब फेअरमधून रोजगार
(राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिरिंग, ताथवडे)
जेएसपीएम राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ताथवडे येथील ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल व बोर्ड ऑफ अँप्रेन्टेनशिप ट्रेनी मुंबई यांच्यातर्फे उद्योग व शिक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आणि विद्यार्थ्यांमधील रोजगारक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने जॉब फेअरचे आयोजन केले होते. आयटी, कोअर इंजिनिरिंग, सेवा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील ७५ हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट तांत्रिक सहाय्य, डेटा सेवा, डिजिटल ऑपरेशन्स ट्रेनी पदांसाठी मुलाखती झाल्या. विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. उद्योगांच्या सध्याच्या गरजा समजून घेण्यासाठी आणि विविध करिअरच्या संधी शोधण्यासाठी एक मौल्यवान व्यासपीठ मिळाले. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना सर्वाधिक अनुकूल असलेल्या पदांसाठी अर्ज करणे शक्य झाले. कंपन्यांनी अभियोग्यता चाचण्या, तांत्रिक मुलाखती आणि एचआर संवाद फेऱ्या घेतल्या. प्रशिक्षक आणि प्लेसमेंट समन्वयकांनी विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या तयारीसाठी मदत केली. अनेक विद्यार्थ्यांची भरती प्रक्रियेसाठी निवड झाली. महाविद्यालयाचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिष्ठाता डॉ. सौरभ तायडे यांनी संयोजन केले. संस्थेचे संकुल संचालक डॉ. सुधीर भिलारे, संस्थेचे संस्थापक डॉ. प्रा. टी. जे. सावंत यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. अविनाश बडदे, संचालक डॉ. रवी जोशी, अनिल भोसले, एन. एन. वडोदे (उपसंचालक, बोर्ड ऑफ अप्रेंटेन्शिप ट्रेनी) यांचे सहकार्य लाभले.
आंतरराष्ट्रीयविषयक व्याख्याने
(मराठवाडा मित्रमंडळाचे पॉलिटेक्निक, काळेवाडी)
मराठवाडा मित्रमंडळ पॉलिटेक्निकमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास’ विषयावर युनायटेड किंगडम येथील सार्वजनिक सुरक्षा क्षेत्रातील प्रमुख व्यवसाय विश्लेषक केविन फोगार्टी यांचे व्याख्यान झाले. त्यांनी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पीएच.डी. केली आहे. विविध देशांमधील सॉफ्टवेअर डोमेनमध्ये त्यांचा अनुभव आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना, व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व, व्यावसायिक जीवनात आवश्यक कौशल्ये, संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, आंतरराष्ट्रीय स्तरावर करिअरच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. जागतिक स्तरावर काम करताना येणाऱ्या आव्हानांचा सामना कसा करावा? तांत्रिक ज्ञानाबरोबरच सॉफ्ट स्किल्स कशा प्रकारे विकसित कराव्यात? यावर भर दिला. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व त्यांना जागतिक दृष्टिकोन प्राप्त होतो, असे प्राचार्या गीता जोशी यांनी सांगितले. एआयएमएल विभाग प्रमुख रूपाली पोहकर, स्वप्नाली पाटील उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी माहितीपूर्ण, प्रेरक आणि प्रेरणादायी संवादात्मक सत्रात सक्रिय सहभाग घेतला.
(95791)
---
प्रा. बारीन शेख यांना पीएच. डी
(एमआयटी महाविद्यालय, आळंदी)
आळंदीतील एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील प्रा. बारीन शेख यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यापीठ, इंदूर (मध्य प्रदेश) यांनी संगणकशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान केली. त्यांनी ‘बिग डेटामध्ये फेअर शेड्युलरचे लोड बॅलेंसिंग परफॉर्मन्स सुधारण्यासाठी पार्टिकल स्वॉर्म ऑप्टिमायझेशन दृष्टिकोन’ या विषयावर संशोधन केले. या संशोधनासाठी बिग डेटा फेअर शेड्युलरच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी निसर्ग-प्रेरित अल्गोरिदम पार्टिकल स्वॉर्म ऑप्टिमायझेशनचा वापर केला आहे. त्यांचा संशोधन विषय बिग डेटा प्रणालींमध्ये वापरल्या जाणाऱ्या फेअर शेड्युलर या तंत्राच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यावर आधारित आहे. मोठ्या प्रमाणावर डेटा प्रक्रिया करताना विविध कामांमध्ये संसाधनांचे योग्य वाटप (लोड बॅलन्सिंग) होणे अत्यंत महत्त्वाचे असते. या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी पार्टिकल स्वॉर्म ऑप्टिमायझेशन या निसर्ग-प्रेरित अल्गोरिदमचा वापर केला. या संशोधनात पीएसओ पद्धतीच्या साहाय्याने शेड्युलरची कार्यक्षमता, गती आणि संसाधनांचा वापर अधिक संतुलित करण्याचा प्रयत्न केला. या दृष्टिकोनामुळे बिग डेटा प्रोसेसिंग अधिक जलद, अचूक आणि परिणामकारक होऊ शकते, ज्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर डेटा हाताळणाऱ्या उद्योग, संशोधन संस्था आणि क्लाऊड कम्प्युटिंग प्रणालींना होऊ शकतो. त्यांना डॉ. दीपिका पाठक यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यापीठाचे कुलगुरू व महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांनी, ‘‘हे संशोधन देशातील तंत्रज्ञान विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल,’ असा विश्वास व्यक्त केला.
(95790)
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

