पिंपरी गुन्हे वृत्त
चाकणमध्ये तरुणाचा खून
पिंपरी ः पूर्वीच्या भांडणातून तरुणाच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर मारून खून केला. ही घटना चाकणमधील नेहरू चौकाजवळ शिवसेना कार्यालयामागील बोळात शनिवारी (ता. १४) दुपारी ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रथमेश शशिकांत माने असे खून झालेल्याचे नाव आहे. वैभव संजय शिंदे (रा. माणिक चौक, श्रीराम सोसायटी, चाकण), अनुज संदीप परदेशी (रा. माळ आळी, चाकण), मयूर तरडे (रा. शेवकरी वाड्याजवळ, महात्मा फुले चौक, चाकण) व एक अल्पवयीन मुलगा यांच्याविरुद्ध गुन्हा आहे. शशिकांत दाजी माने (वय ४८, रा. कमल पार्क सोसायटी, निघोजे, ता. खेड) यांनी चाकण उत्तर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी प्रथमेशच्या छातीवर स्क्रू ड्रायव्हरने वार करून फरशी डोक्यात मारली. त्यात त्याचा मृत्यू झाला. वैभव शिंदेला अटक झाली आहे.
मोटारीच्या व्यवहारात १८ लाखांना गंडा
पिंपरी ः मोटार खरेदी व्यवहारात १८ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याची घटना भोसरी एमआयडीसीत घडली. अनिल अशोक चौधरी (वय ३२, रा. पारगाव, जि. अहिल्यानगर) याच्यावर फसवणुकीचा आरोप आहे. अश्विनी अनंता गडकरी (वय २५, रा. मनिषा हाउसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २४ नाेव्हेंबर २०२५ रोजी रात्री आठच्या सुमारास स्पाइन सिटी मॉल, एमआयडीसी भोसरी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरीने टाटा नेक्सॉन मोटार खरेदी करताना हप्ते भरण्याचे व कर्ज स्वतःच्या नावे करण्याचे आश्वासन दिले. मात्र, मोटार घेऊन पैसे न देता १८ लाखाहून अधिक रकमेची फसवणूक केली.
सराफाची तीन लाखांची फसवणूक
पिंपरी ः वर्धमान ज्वेलर्समध्ये तीन लाख सात हजार रुपयांचे दागिने खरेदी केले. त्यासाठी सराफाला बंद खात्याचा धनादेश देत फसवणूक केल्याची घटना चऱ्होली फाटा येथे घडली. सतीश ज्ञानदेव वालशिंग (वय ४५, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. नीलेश हिरालाल चोपडा (वय ५०, रा. उद्योगनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे चऱ्होली फाटा येथे वर्धमान ज्वेलर्स आहे. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास सतीश वालशिंग याने दागिने खरेदी केले. त्यासाठी आयडीएफसी बँकेच्या बंद खात्याचा धनादेश देऊन विश्वास संपादन केला. धनादेश वटल्याचे सांगत दागिने घेऊन फरार झाला.
कर्ज हप्त्यांच्या रकमेचा अपहार
पिंपरी ः फायनान्स कार्यालयात कर्ज हप्त्यांच्या सुमारे साडेआठ लाख रुपये रकमेचा अपहार केल्याप्रकरणी कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. ही घटना आकुर्डीत घडली. अक्षय विश्वनाथ वाघमारे (वय २४, रा. आकुर्डी, मूळगाव यशवंतनगर, अकलूज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. अमोल जालिंदर औसरमल (वय ३२, रा. चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयने कर्जदारांकडून आठ लाख ४९ हजार २२२ रुपये रोख स्वीकारून बनावट पावत्या दिल्या. मात्र, ती रक्कम स्वतः वापरून फायनान्स कंपनीची फसवणूक केली.
शेअर मार्केटमध्ये ४४ लाखांची फसवणूक
पिंपरी ः ऑनलाईन ॲपद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत ४३ लाख ८७ हजारांची फसवणूक झाल्याची घटना सांगवीत घडली. स्वाती वर्मा व आर. के. जैन (पूर्ण पत्ता उपलब्ध नाही) व इतर बँक खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. एका महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना १५ डिसेंबर २०२५ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत फिर्यादीच्या घरी ऑनलाइन पद्धतीने घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडून घेतले. त्यानंतर ॲपद्वारे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता अतिरिक्त पैसे मागितले.
देहूत गांजा विक्री; एकाला अटक
पिंपरी ः देहूरोड पोलिसांनी येलवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर इंद्रायणी नदीच्या पुलाजवळ कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले. अंकुश अनंत गाडे (वय ५१, मराठी शाळेमागे, येलवाडी, ता. खेड) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून २९ हजार ८५० रुपये किमतीचा ५९७ ग्रॅम गांजा जप्त केला. पोलिस शिपाई किरण खेडकर यांनी फिर्याद दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

