कामगाराकडून २२ लाखांच्या सोन्याचा अपहार

कामगाराकडून २२ लाखांच्या सोन्याचा अपहार

Published on

पिंपरी : मालकाने त्यांच्या कामगाराकडे सोने वितळवण्यासाठी दिले असता कामगाराने २२ लाख ५ हजार रुपये किमतीच्या सोन्याचा अपहार केला. ही घटना चिंचवडगाव गांधी पेठ येथील प्रियांका ज्वेलर्स येथे घडली. या प्रकरणी देवेश कैलाश वर्मा (रा. भूमकर चौक, वाकड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी श्रीमंता संतोष समांता (रा. चिंचवडगाव, मूळ- पश्चिम बंगाल) याला अटक केली आहे. फिर्यादी हे त्यांच्या दुकानातील दागिने वितळविण्याचे काम त्यांचा कामगार असलेल्या आरोपीकडे देत. फिर्यादी यांनी आरोपीला सोने वितळवण्यासाठी दिले असता त्यातील २२ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोने स्वतःच्या फायद्यासाठी काढून घेत फिर्यादीची फसवणूक केली.

बांधकाम साइटवरून पडल्याने मजुराचा मृत्यू
पिंपरी : एका बांधकाम साइटवर काम करीत असताना दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाला. कामगारांच्या सुरक्षेबाबत काळजी न घेतल्याने बांधकाम व्यावसायिक आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रावेत येथील श्रीकृष्ण रेसिडेन्सी येथे घडली. चंद्रकांत तेजु जाधव (वय ३६) असे या घटनेत मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नी सुमन चंद्रकांत जाधव (रा. मामुर्डी, हवेली, मूळ रा. काळमंदरगी गुतीतांडा, कर्नाटक) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी श्रीकृष्ण रेसिडेंसीचे बिल्डर प्रवीण यल्लमार (रा. कृष्णानगर, पुणे) व कॉन्ट्रॅक्टर तेजस लखानी (रा. इंद्रायणी नगर, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांचे पती चंद्रकांत जाधव हे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर वीट बांधकाम करत असताना खाली पडल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या बांधकाम साइटवर कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना न केल्याने दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : गांजा बाळगणाऱ्या एकाला निगडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई निगडीतील ट्रान्स्पोर्ट नगर येथे करण्यात आली. सुनील संपत म्हस्के (रा. बालाजीनगर, भोसरी, मूळ- रा. केसापुरी कॅम्प, माजलगाव, बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ट्रान्स्पोर्ट नगरमधील इमारतीजवळ एका शेडच्या बाजूला आरोपी संशयास्पद रित्या थांबला होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ११ हजार ६०० रुपये किमतीचा गांजा सापडला.

जुगारप्रकरणी पाच जणांवर कारवाई
पिंपरी : मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई चिंचवड, अजंठानगर येथे करण्यात आली. भीमा दत्ता कांबळे (रा. मिलींदनगर, निगडी), हनुमंत महादेव जाधव (रा. ओटास्कीम, निगडी), भागवत मारुती शिंदे (रा. प्रेरणा सोसायटी, निगडी), संदेश लिंबाजी खोपे (रा. ओटास्कीम, निगडी) आणि अक्षय विजय येकाळे (रा. तळवडे) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी जुगाराचे साहित्य आणि २ हजार २८० रुपये रोकड जप्त केली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com