गतिरोधक ‘सपाट’; रस्ते मात्र सुसाट
पिंपरी, ता.१७ : पिंपरी चिंचवड शहरात ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा घेण्यात आली. वेग कायम ठेवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी स्पर्धा मार्गावरील गतिरोधक काढण्यात आले होते. आता स्पर्धा संपून अनेक दिवस उलटले, तरी अद्याप येथे नवीन गतिरोधक बसवण्यात आलेले नाहीत. या परिसरात अपघाताचा धोका कमालीचा वाढला असून नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
शहरात २० ते २३ जानेवारीदरम्यान आंतरराष्ट्रीय सायकल झाली. ही स्पर्धा औंध येथील राजीव गांधी पूल, काळेवाडी फाटा, रावेतमधील बास्केट बिज, आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक, त्रिवेणीनगर चौक, दुर्गानगर चौक, इंद्रायणीनगर चौक, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटर, स्पाइन रस्ता, जुना आरटीओ रस्ता, एम्पायर इस्टेट उड्डाणपूल या मार्गांवर झाली. स्पर्धेनिमित्त महापालिकेने रस्त्यांचे डांबरीकरण केले, तसेच सायकलस्वारांचा वेग कायम ठेवण्यासाठी गतिरोधक हटवले. आता स्पर्धा संपल्यानंतर या मार्गांवरून वाहने सुसाट धावत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
तीव्र उतार असल्याने वेग
भक्ती शक्ती चौकातून अंकुश चौकाकडे येताना तीव्र उतार आहे. त्यामुळे वाहनांचा वेग वाढतो. त्याचवेळी रुपीनगरकडून निगडीकडे, तसेच यमुनानगरकडून रुपीनगरकडे जाणाऱ्यांची वर्दळ असते. या चौकातून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी वाहतूक वाहने, तसेच दिव्यांग व्यक्तीही नियमितपणे जातात. गतिरोधक नसल्यामुळे वेगात येणारी वाहने थेट चौकात प्रवेश करत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. पूर्वी पोलिसांनी येथे गतिरोधक तयार केला होता. ज्यामुळे चौकात आल्यावर वाहनांचा वेग नियंत्रित असायचा. मात्र, सायकल स्पर्धेनिमित्ताने गतिरोधक हटवण्यात आला आहे.
यमुनानगर साई मंदिर चौक ते त्रिवेणीनगर चौकादरम्यानचाा जुना गतिरोधक सायकल स्पर्धेवेळी काढण्यात आला. अद्याप येथे नवीन गतिरोधक बसवला नाहीत. यामुळे परिसरात अपघाताचा धोका वाढला आहे.
- चेतन पाटील, यमुनानगर
महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी यमुनानगर आणि त्रिवेणीनगर परिसरांतील नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून साई मंदिर चौकात तातडीने दर्जेदार गतिरोधक निर्माण करावेत.
- आदित्य चितमितवार, दुर्गानगर चौक
सायकल स्पर्धा ही शहरासाठी अभिमानाची बाब होती; मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड होता कामा नये. अंकुश चौकातील गतिरोधक तत्काळ बसवला नाही तर मोठा अपघात घडू शकतो. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी.
- राजेश जाधव, रुपीनगर
भक्ती शक्तीवरून त्रिवेणीनगर आणि तळवडे, तसेच रुपीनगरकडे जाताना मध्ये अंकुश चौक येतो. उतार असल्याने वाहनांचा वेग या चौकात खूप असतो. गतिरोधक नसल्यामुळे चौक ओलांडताना भीती वाटते.
-नितीन जाबरे, तळवडे
सायकल स्पर्धेसाठी रस्ता रिकामा करणे समजू शकतो. पण, स्पर्धेनंतर प्रशासनाने तातडीने मूळ स्थिती पूर्ववत करायला हवी होती. सध्या या चौकातून रस्ता ओलांडणे म्हणजे जीवावर बेतण्यासारखे आहे.
- प्रवीण पाटील, साईनाथनगर
शहरात सायकल स्पर्धेनिमित्त गतिरोधक काढण्यात आले होते. आता गतिरोधक बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गतिरोधक पूर्ववत करण्यात येतील.
- मकरंद निकम, मुख्य अभियंता, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

