गृन्हे वृत्त
भोसरीत १६ किलो गांजा जप्त, दोघे अटकेत
पिंपरी ः भोसरी परिसरात मोठ्या प्रमाणात गांजाची साठवणूक करून तो विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (ता. १७) रात्री गोविंद गार्डनजवळ, देवकर वस्ती, भोसरी येथे करण्यात आली.
विशाल रावण मोहिते (वय २४, यमाईनगर, साई पार्क, दिघी गाव) आणि गणेश बाबुराव थोरात (वय २४, यमाईनगर, साई पार्क, दिघी गाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस शिपाई अशोक माने यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विक्रीसाठी १६ किलो १२० ग्रॅम वजनाचा गांजा बेकायदेशीरपणे जवळ बाळगला होता. पोलिसांनी धाड टाकून त्यांच्याकडून ८ लाख ८० हजार रुपये किमतीचा हा मुद्देमाल जप्त केला.
भाटनगरला गांजा विक्रेता ताब्यात
पिंपरी ः पिंपरीतील भाटनगर परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मंगळवारी (ता. १७) दुपारी भाटनगर, इमारत क्रमांक ६ जवळ करण्यात आली.
सनी धर्मासिंग माचरेकर (वय २१, भाटनगर, पिंपरी. मूळ रा.- श्रमिकनगर, ओझर मिग, नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई विष्णू भारती यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सनी माचरेकर हा भाटनगर येथील रस्त्याच्या कडेला गांजाची विक्री करण्यासाठी थांबला होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १४ हजार ५०० रुपये किंमतीचा २९६ ग्रॅम गांजा मिळून आला.
महिलांकडून गांजाची तस्करी, मुद्देमाल जप्त
पिंपरी ः अमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपरीतील भाटनगर परिसरात कारवाई करत गांजाची विक्री करणाऱ्या महिला टोळीचा कारनामा उघडकीस आणला. ही कारवाई मंगळवारी (ता. १७) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास भाटनगर येथील इमारत क्रमांक ५ समोरील सार्वजनिक जागेत करण्यात आली.
याप्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस शिपाई गणेश कर्पे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात तीन महिला आरोपींचा समावेश असून त्यातील एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आरोपीकडे ८९ हजार ६०० रुपये किंमतीचा १ किलो ५९२ ग्रॅम गांजा आणि मोबाईल मिळून आला. चौकशी दरम्यान तिने हा गांजा एका महिला साथीदाराकडून घेतल्याचे आणि दुसऱ्या एका महिलेला विक्रीसाठी देणार असल्याचे सांगितले.
महाळुंगे येथे गांजा जप्त, एकाला अटक
बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत मजुरांच्या वस्तीत गांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (ता. १७) सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास साहिल प्रॉपर्टीज लेबर कॅम्प, व्हीटीपी अर्थवन, महाळुंगे येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलिस शिपाई दत्तात्रेय शिंदे यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहम्मद सरफुद्दीन खालीद (वय ३२, महाळुंगे, पुणे; मूळ रा. आझमनगर, कठियार, बिहार) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपी मोहम्मद खालिद याने त्याच्या ताब्यात ६१ हजार २५० रुपये किमतीचा गांजा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे बाळगला होता.
पोल्ट्रीमधून कोंबड्या, खाद्य लंपास
पिंपरी ः खेड तालुक्यातील चिंचोशी येथे एका पोल्ट्री फार्मवरील दोघा कामगारांनी कोंबड्या आणि खाद्य चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २४ सप्टेंबर २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान चिंचोशी येथील पोल्ट्री फार्मवर घडली. याप्रकरणी अनिल बाबुराव मांजरे (वय ३५, रा. शिरोली, खेड) यांनी चाकण उत्तर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुकाराम भाऊराव राऊत (वय ३४, मूळ- पांघुळघर खरशेत, त्रंबकेश्वर, नाशिक) आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादीच्या पोल्ट्री फार्मवर कामगार म्हणून काम करत होते. त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून ७५ हजार रुपये किंमतीच्या ३७० जिवंत बॉयलर कोंबड्या आणि १ लाख ३२ हजार रुपये किंमतीची कोंबडी खाद्याची ६० पोती, असा एकूण २ लाख ७ हजार रुपयांचा माल चोरून नेला.
लोखंडी पाईपची चोरी; दोघांना अटक
पिंपरी ः बांधकामाचे साहित्य ठेवलेल्या गोदामातून लोखंडी पाईप चोरून नेणाऱ्या टोळीवर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. ही घटना सोमवारी (ता. १६) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव बुद्रूक येथे घडली. या प्रकरणात समर सुधाकर पाचारणे (वय २७, रा.राक्षेवाडी, खेड) यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बाळू सीताराम लोंढे (वय ४५, रा. कोरेगाव, खेड) आणि टेम्पो चालक आसिफ चौधरी (वय २३, रा. कुदळवाडी, हवेली) यांना अटक केली आहे. त्यांच्यासह रवींद्र प्रल्हाद कांबळे आणि आयाज खान यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भाड्याच्या खोलीतून आरोपींनी ६० हजार रुपये किंमतीचे लोखंडी पाईप टेम्पोमध्ये भरून चोरून नेण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीच्या मजुराने पाठलाग करून टेम्पो चालकाला पकडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

