गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

Published on

नेपाळ सहलीच्या नावाखाली हजारो रूपयांची फसवणूक

पिंपरी : टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी असल्याचे सांगून नेपाळ सहलीचे आमिष दाखवत बावधन येथे एका व्यक्तीची ७३ हजारांची आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीने बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार महेश फालक नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने फिर्यादीच्या मोबाईलवर संपर्क साधून ट्रॅव्हल्स कंपनी असल्याचे सांगितले. नेपाळ सहलीची सविस्तर माहिती देत त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीने ७३ हजार ५०० रुपये आरोपीला पाठविले. मात्र, नंतर कोणतीही सेवा न देता आरोपीने फिर्यादीची फसवणूक केली.


फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा
पिंपरी : बांधकाम कामासाठी लागणारे स्टील वेळेत न देता एका व्यावसायिकाची आठ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार बावधन, उत्तमनगर येथे घडला.
या प्रकरणी प्रशांत कदम (रा. बावधन बुद्रुक, मुळशी) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जावेद तांबोळी (रा. हडपसर, पुणे) आणि एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांनी २० टन स्टीलसाठी १० लाख ६६ हजार १८९ रुपये आरटीजीएस द्वारे दिले होते. आरोपीने केवळ पाच टन स्टील पाठवून उर्वरित १५ टन स्टील दिले नाही. पैशांची मागणी केली असता आरोपीने टाळाटाळ केली, व फिर्यादीची फसवणूक झाली.


जुगार प्रकरणी १९ जणांवर कारवाई

पिंपरी : वाकडमधील सोळा नंबर बस थांब्यासमोर एका किराणा दुकानाजवळ सुरू असलेल्या जुगाराच्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून १९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
कुमार सखाराम लोहार (रा. थेरगाव), आनंद साहेबराव चितापल्ले (रा. बालेवाडी), नारायण हरिभाऊ जाधव (रा. भोसरी), उदय अनंत मुळे (रा. पिंपरी), संतोष प्रल्हाद जगताप, सचिन ज्ञानोबा काळे (दोघेही रा. चिंचवड), रामकिशन प्रल्हाद गायकवाड (रा. रहाटणी), दिनेश पितांबर कांबळे (रा. पिंपरी), रामू सटवा धोत्रे, सचिन मोहन शिंदे (दोघेही रा. वाकड), अभिषेक रमेश बंचकर, कल्पेश रामराव इकले (दोघेही रा. थेरगाव), सुरेश रामदास भराटे (रा. रहाटणी), सोनू नवीन थोरात (रा. पिंपरी), समाधान शिवाजी पवार (रा. थेरगाव), अविनाश नरहरी वावळे (रा. वाकड), अंकुश राजाराम अडसूळ, नवशाद अबरार सय्यद, शुभम दिलीप टाकसांडे (तिघेही रा. थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या कारवाईत १९ हजार २२० रुपयांची रोकड, व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.


शालेय बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

पिंपरी : चिंचवडमधील छत्रपती संभाजीनगर येथे एका शालेय बसने पाठीमागून धडक दिल्याने एका ६६ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला.
रमेश जोशी (वय ६६) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी निगडी पोलिसांनी पवन देवकर (रा. अजंठानगर, निगडी) या बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे. रमेश जोशी हे रस्त्याने पायी जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील बसने त्यांना पाठीमागून धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने जोशी यांचा मृत्यू झाला.

भोसरीत लाखोंचा गांजा जप्त; दोघांना अटक

पिंपरी : भोसरीतील देवकर वस्ती येथे विक्रीसाठी गांजा जवळ बाळगणाऱ्या दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून आठ लाख ८० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला.
विशाल मोहिते, गणेश थोरात (दोघेही रा. यमाईनगर, साई पार्क, दिघी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १६ किलो १२० ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

चिखलीत मेफेड्रॉन जप्त ; एकाला अटक

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने चिखली येथे कारवाई करून १६३ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले. जाधववाडी येथील वडाचा मळा येथे केलेल्या या कारवाईत एकाला अटक केली आहे.
फैजान झहीर अहमद शेख (रा.चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. शेख याच्याकडे अमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली असता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १६३ ग्रॅम एमडी, एक मोटारसायकल, दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १७ लाख ९१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. प्राथमिक चौकशीत त्याने हे मेफेड्रॉन इतर दोन साथीदारांकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com