नामांकित शाळांपासून विद्यार्थी दूरच
पिंपरी, ता.१९ : शिक्षण हक्क कायदा अर्थात ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश प्रक्रियेत प्रशासनाने यंदा बदल केले आहेत. यात २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी शाळेच्या तीन व पाच किलोमीटर अंतराची अट कमी करण्यात आली आहे. तर, आता केवळ एक किलोमीटर अंतराच्या आतील शाळेत विद्यार्थी ‘आरटीई’ प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. परिणामी, नामांकित शाळांमध्ये प्रवेशापासून गरजू विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे.
इंग्रजी शाळांना एकूण पटसंख्येच्या २५ टक्के जागा ‘आरटीई’ कायद्यानुसार विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या प्रवेशासाठी शाळेपासून विद्यार्थ्यांच्या घरापर्यंतच्या अंतराची अट आहे. यापूर्वी अंतरासाठी एक, तीन व पाच किलोमीटर असे तीन टप्पे होते. प्राधान्याने कमी अंतरातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात होते. मात्र, यंदा यात मोठा बदल करण्यात आला आहे. तीन व पाच किलोमीटरचे टप्पे काढून टाकण्यात आले आहेत. शाळेपासून एक किलोमीटर अंतरात किती विद्यार्थी असणार आहेत, ग्रामीण भागातील विद्यार्थी तर ‘आरटीई’ प्रवेशापासून वंचित राहणार आहेतच पण, शहरातील विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळणे कठीण होणार आहे.
पालकांच्या मागण्या
- सरकारने ‘आरटीई’ कायद्यांतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी सध्याचे एक किलोमीटर परिघापर्यंत अंतराचा नियमद्द्द करून पूर्वीचाच तीन किलोमीटर अंतराचा नियम लागू करावा.
- शुल्क प्रतिपूर्ती तातडीने करून त्यांनी ‘आरटीई’अंतर्गत त्वरीत नोंदणी करून घ्यावी. यामुळे ‘आरटीई’अंतर्गत विद्यार्थी प्रवेश संख्या आणखी वाढेल
- ‘आरटीई’अंतर्गत येणाऱ्या शाळांची आजपर्यंतची शुल्क प्रतिपूर्ती त्वरीत करण्यात यावी.
आरटीई कायद्यांतर्गत, विद्यार्थी त्यांच्या घरापासून तीन किलोमीटरच्या परिसरात असलेल्या कोणत्याही इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत आणि ‘आरटीई’अंतर्गत असलेल्या शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करू शकत होते, परंतु सरकारने अन्यायकारकपणे हे अंतर एक किलोमीटरच्या परिघापर्यंत कमी केले आहे. ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी शालेय पर्याय उपलब्ध आहेत.
- ॲड. अश्विनी कांबळे, अध्यक्ष, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले विचार समता मंच
हक्काचे शिक्षण घेत असताना बालक व पालकांवरती अन्याय होत आहे. एक ते तीन किलोमीटर अंतरातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सरसकट एक लॉटरी काढावी. एक किलोमीटरचे अंतर ग्राह्य धरण्याचा नियम हा अन्यायकारक होणार आहे.
- हेमंत मोरे, अध्यक्ष, ‘आरटीई’ पालक संघ
शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशानुसार ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसारच प्रवेश देण्यात येतील. एक किलोमीटर अंतराच्या शाळेत प्रवेश देण्यात येतील.
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

