दहावीची परीक्षा सुरू

दहावीची परीक्षा सुरू
Published on

पिंपरी, ता. २० ः महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावीची परीक्षा शुक्रवारपासून (ता.२०) सुरू झाली असून, पहिला पेपर मराठी विषयाचा होता. शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांचे औक्षण करून, गुलाब, खडीसाखर देत स्वागत करण्यात आले. सकाळपासूनच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची लगबग आणि उत्साह पाहायला मिळाला. मात्र, पेपर सुटल्यानंतर व्याकरण विभागाने अतिशय सोपे आणि नेमके प्रश्‍न विचारल्याने भाषेचा पेपर सोपा गेल्याची प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
दहावी परीक्षेसाठी शहरातील ५१ केंद्रांवर २५ हजार ७७९ विद्यार्थी बसले आहेत. सकाळी दहापासूनच पालकांसह विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर दाखल होत होते. वर्गात जाईपर्यंत पालक परीक्षेच्या टिप्स देत होते. साडेदहाची घंटा वाजल्यानंतर कडक तपासणी करून विद्यार्थ्यांची परीक्षागृहात सोडण्यात आले. आज मराठी भाषेचा पहिलाच पेपर असल्याने आपला मुलगा, मुलगी वेळेवर पोहोचावा यासाठी पालकांनी आपल्या मुलांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी गर्दी केली होती.

शाळांच्या प्रवेशद्वारावर रांगोळी
परीक्षेचा ताण हलका करण्यासाठी अनेक शाळांच्या प्रवेशद्वारावर रांगोळी काढण्यात आली होती. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन आणि त्यांचे औक्षण करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. ‘विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता आत्मविश्वासाने पेपर लिहावा,’ असा संदेश शिक्षकांनी दिला.

कडक पोलिस बंदोबस्त
परीक्षा काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह परीक्षेची शिस्त राखण्यासाठी प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सतत देखरेख करण्यात आली.

झेरॉक्स सेंटर बंद
परीक्षा केंद्रावर कॉपी रोखण्यासाठी आणि परीक्षा पारदर्शक करण्यासाठी, राज्य मंडळाच्या निर्देशानुसार परीक्षा कालावधीत केंद्राच्या ५०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात आली होती. हा निर्णय प्रश्‍नपत्रिका फुटणे, अनधिकृत साहित्य उपलब्ध होणे रोखण्यासाठी आणि परीक्षेची शिस्तबद्धता राखण्यासाठी घेतला. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यापूर्वी तपासणी केली जात होती. परीक्षेशी संबंधित पर्यवेक्षक,‎ बोर्ड, शिक्षण अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणालाही परीक्षा केंद्रावर प्रवेश करण्यास प्रतिबंध घालण्यात आला‎ होता.

‘स्वमत’ विभागातील प्रश्‍न
आजच्या मराठी भाषेच्या ‘स्वमत’ विभागातील प्रश्‍नांनी विद्यार्थ्यांना विचार करायला लावले. पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन स्वतःचे विचार मांडताना आज खऱ्या अर्थाने मराठी भाषेची गोडी वाटल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.

‘‘दहावीचा मराठी विषयाचा पेपर होता. शाळेतील सर्वच शिक्षकांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले, मी घरी खूप सेल्फ स्टडी केला होता. मराठीचा पेपर खूपच चांगला गेला. शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि मी केलेल्या सेल्फ स्टडीमुळे पुढील पेपरही मला खूप चांगले जाण्याची खात्री आहे.’’
- आम्रपाली देठे, विद्यार्थिनी एच. ए. स्कूल माध्यमिक विभाग पिंपरी

‘‘पहिलाच पेपर मराठीचा होता, त्यामुळे थोडी धाकधूक होती; पण कृतीपत्रिका हातात पडली आणि साऱ्या शंका मिटल्या. पेपर अगदी मनासारखा गेला. व्याकरण विभागाने अतिशय सोपे आणि नेमके प्रश्‍न असल्याने तिथे पैकीच्या पैकी गुण मिळतील याची खात्री आहे.
- श्रावणी काळे, विद्यार्थिनी श्री टागोर माध्यमिक विद्यालय भोसरी

‘‘पेपर लिहिताना मला खूप सोपा गेला. त्यामागे आमचा अभ्यास आणि शिक्षकांचे आहेत. मला मराठीचा सोपा गेला.’’
- आर्या जामदार, मॉर्डन हायस्कूल यमुनानगर निगडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com