महापालिका स्थायी समितीसह
विषय समिती सदस्यांची निवड

महापालिका स्थायी समितीसह विषय समिती सदस्यांची निवड

Published on

पिंपरी, ता. २० ः महापालिका स्थायी समितीच्या १६ सदस्यांसह विविध विषय समिती सदस्यांची निवड शुक्रवारी (ता. २०) सर्वसाधारण सभेत झाली. सभागृहातील संख्याबळानुसार सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात एका जागेसाठी समान मतांचा कोटा शिल्लक राहिला होता. त्यामुळे त्या जागेसाठी मतदान घेण्याची वेळ आली.
भाजपने उपसूचनेद्वारे संख्याबळाचा विचार करता ती एक जागा भाजपला मिळावी, असा प्रस्ताव मांडला. त्यास राष्ट्रवादीने मूकसंमती दिली. त्यामुळे भाजपला ११, राष्ट्रवादीला चार आणि शिवसेनेला एक असे स्थायी समितीत सदस्यपद मिळाले.
भारतीय जनता पक्षाने १२८ सदस्यांच्या सभागृहात ८४ जागा मिळवल्या आहेत. याशिवाय, भाजप पुरस्कृत एका अपक्षाने त्यांच्याशी आघाडी केल्याचे पत्र विभागीय आयुक्तांना दिले आहे. त्यामुळे भाजपचे संख्याबळ ८५ झाले आहे. राष्ट्रवादीचे संख्याबळ ३७, शिवसेनेचे सहा आहे. भाजपने महापौर, उपमहापौर आणि पक्षनेते पदांवर तिघांना संधी दिली आहे. शुक्रवारी (ता. २०) स्थायीसह विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, शिक्षमण, क्रीडा- कला-साहित्य व सांस्कृतिक या विषय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. नगरसचिव मुकेश कोळप यांनी सर्व सदस्यांची निवड प्रक्रिया समजावून सांगितली.

असे आहेत स्थायी समिती सदस्य
स्थायी समिती सदस्यपदासाठी भाजपची नावे पक्षनेते प्रशांत शितोळे, राष्ट्रवादीची नावे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर व शिवसेना गटनेते विश्वजित बारणे यांनी शिवसेना सदस्यांची नावे बंद पाकिटातून पीठासीन अधिकारी महापौर रवी लांडगे यांच्याकडे सुपूर्त केली. उपायुक्त अण्णा बोदडे यांनी नावे वाचून दाखवली. यामध्ये भाजपचे अभिषेक बारणे, शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, शीतल वर्णेकर, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन; राष्ट्रवादीच्या सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने आणि शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांचा समावेश आहे.

असा ठरला कोटा
महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार स्थायी समितीत १६ सदस्य आहेत. निवडणुकीत जिंकलेल्या जागांच्या प्रमाणात पक्ष सदस्यांचा कोटा ठरवला जातो. त्यानुसार भाजपच्या वाट्याला १०.६२५, राष्ट्रवादीला ४.६२५ चार आणि शिवसेनेला ०.७५ असा कोटा मिळाला होता. त्यानुसार भाजपचे १०, राष्ट्रवादीचे चार व शिवसेनेच्या एका सदस्याची निश्चित झाली. भाजप व राष्ट्रवादीच्या वाट्यातील समसमान ०.६२५ जागेचा कोटा शिल्लक राहिला होता. त्यामुळे पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी उपसूचना मांडून सभागृहातील संख्याबळाचा विचार करून एक जागा भाजपला मिळावी, असा प्रस्ताव मांडला. त्यावर राष्ट्रवादीने आक्षेप न घेतल्याने अकरावे सदस्यपद भाजपला मिळाले. या १६ सदस्यांमधून स्थायी समिती सभापती निवडला जाईल. पक्षीय बलाबलानुसार भाजपचाच अध्यक्ष होईल, यात शंका नाही. त्यामुळे अभिषेक बारणे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com