महापालिका विषय समिती सदस्यांची निवड

महापालिका विषय समिती सदस्यांची निवड

Published on

पिंपरी, ता. २० ः महापालिकेत स्थायी समितीला विशेष महत्त्व आहे. कारण, सर्व आर्थिक निर्णय स्थायी समिती घेत असते. मात्र, त्यांसह विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, शिक्षण आणि क्रीडा- कला-साहित्य व सांस्कृतिक या विषय समित्याही महापालिकेत आहेत. त्यांच्या सदस्यांची निवड शुक्रवारी (ता. २०) सर्वसाधारण सभेत करण्यात आली. पुढील आठवड्यात सर्व समित्यांच्या अध्यक्षांची निवड होईल.
पीठासन अधिकारी महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा सुरू झाली. आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसचिव मुकेश कोळप व्यासपीठावर उपस्थित होते. पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी भाजपच्या तर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व विषय समिती सदस्यांची नावे बंद लखोट्यात विषय समित्या अनुक्रमानुसार टप्प्याटप्प्याने पीठासीन अधिकारी रवी लांडगे यांच्याकडे दिली. उपायुक्त अण्णा बोदडे यांनी दोन्ही पक्षांच्या सदस्यांची नावे वाचून जाहीर केली. तत्पूर्वी पीठासन अधिकारी कोळप यांनी विषय समिती सदस्य निवड प्रक्रिया समजावून सांगितली. निवड झालेल्या सर्व समिती सदस्यांचा महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते सत्कार केला. उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

विषय समित्यांत शिवसेना नाही
महापालिकेत विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, शिक्षण आणि क्रीडा- कला-साहित्य व सांस्कृतिक या विषय समित्या आहेत. स्थायी समितीत १६ सदस्य आहेत. त्यात भाजप ११, राष्ट्रवादी ४ व शिवसेनेचा एक सदस्य आहे. विषय समिती सदस्यांची संख्या प्रत्येकी ९ आहे. यात सभागृहातील संख्या बळानुसार पक्षीय कोटा ठरतो. म्हणजेच १२८ मधील १४.२२ सदस्यांमागे एक विषय समिती सदस्य असा कोटा आहे. त्यानुसार एक अपक्ष पुरस्कृतसह भाजपच्या ८५ सदस्यांमागे प्रत्येक विषय समितीत ५.९७ म्हणजे पूर्णांकात ६ आणि राष्ट्रवादीच्या ३७ सदस्यांमागे २.६० म्हणजे पूर्णांकात ३ सदस्य निश्चित झाले आहे. शिवसेनेचे सहाच नगरसेवक असल्याने त्यांना विषय समित्यांमध्ये स्थान मिळाले नाही.

नवनियुक्तांना महापौरांच्या शुभेच्छा!
महापालिका स्थायी समितीसह विधी, शहर सुधारणा, शिक्षण, महिला व बालकल्याण तसेच क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीवर सदस्यांची निवड झाली. त्यांना महापौर रवी लांडगे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. महापालिकेच्या विविध विकासात्मक, सामाजिक व प्रशासकीय कामकाजासाठी या समित्या महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. नव्याने निवड झालेल्या सदस्यांकडून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक कार्य होईल, असा विश्वास महापौर लांडगे यांनी व्यक्त केला.

विधी समिती सदस्य
भाजपचे ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, सुजाता बोराटे, श्रृती डोळस, कुशाग्र कदम; राष्ट्रवादीचे शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, तुषार सहाणे.

शहर सुधारण समिती
भाजपचे अर्चना सस्ते, विनोद नढे, कुणाल वाव्हळकर, संजय काटे, डॉ. सुहास कांबळे, उत्तम केंदळे; राष्ट्रवादीचे डॉ. वैशाली घोडेकर, अनंत कोऱ्हाळे, वैशाली काळभोर.

क्रीडा-कला-साहित्य-सांस्कृतिक
भाजपचे कैलास कुटे, श्याम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, उदय गायकवाड, योगेश लांडगे; राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर, जितेंद्र ननावरे, प्रमोद कुटे.

शिक्षण समिती
भाजपचे पल्लवी वाल्हेकर, श्रृती वाकडकर, रवीना अंघोळकर, कविता भोंगाळे, रिटा सानप, सारिका बोऱ्हाडे; राष्ट्रवादीचे प्रियंका कुदळे, योगिता बारणे, यश साने

महिला व बालकल्याण समिती
भाजपच्या पल्लवी जगताप, नीता पाडळे, रेश्मा भुजबळ, शिवानी नरळे, राणी पठारे, सुप्रिया चांदगुडे; राष्ट्रवादीच्या निकिता कदम, सारिका मासुळकर, मनीषा लांडे.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com