परीक्षा सुरू होऊनही मानधन मिळेना

परीक्षा सुरू होऊनही मानधन मिळेना

Published on

पिंपरी, ता. २१ ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा सुरू केली. बारावीची परीक्षा संपण्याची वेळ आली आहे. यानंतरही परीक्षा केंद्रावर जबाबदारीचे काम करणारे केंद्रसंचालक आणि कर्मचारी हक्काच्या मानधनाच्या प्रतिक्षेत आहेत. मंडळाच्या ‘लेट लतीफ कारभारामुळे केंद्रसंचालक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

नेमका प्रकार काय?
दरवर्षी मंडळाच्या परीक्षांसाठी हजारो केंद्रसंचालक, उपकेंद्रसंचालक आणि मदतनिसांची नियुक्ती केली जाते. परीक्षा कालावधीत प्रश्‍नपत्रिकांची गोपनीयता राखणे, बैठक व्यवस्था करणे आणि गैरप्रकार रोखणे अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असते. परीक्षेच्या अगोदर काही दिवसांतच हे मानधन संबंधितांच्या खात्यावर जमा होणे नियमानुसार अपेक्षित असते. प्रत्यक्षात दरवर्षीप्रमाणे यंदाही बोर्डाकडून निधीचे वितरण झालेले नाही. त्यामुळे ‘कामे करून घ्यायची अन् पैसे द्यायला टाळाटाळ करायची’ अशा शब्दांत बोर्डाच्या कारभारावर टीका होत आहे.

केंद्र संचालकांच्या तक्रारी

- परीक्षा केंद्रावरील किरकोळ खर्च, स्टेशनरी आणि पिण्याच्या पाणी व्यवस्था स्वतःच्या खिशातून केलेल्या केंद्रसंचालकांवर आर्थिक भार
- बोर्डाची प्रशासकीय दिरंगाई, ढिसाळ नियोजनामुळे मानधनाचा प्रश्‍न अद्याप प्रलंबित
- मुळातच तुटपुंजे असलेले मानधन मिळण्यासही किमान महिनाभराचा विलंब
- मेहनतीनंतरही मोबदला न मिळाल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे.

---
‘बहिष्काराचा विचार...’
एक संतप्त केंद्रसंचालकाने नाव गोपनीय राखण्याच्या टीवर सांगितले की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा केंद्रांवर काम करणाऱ्या केंद्रसंचालकांसाठी ही एक चिंतेची बाब आहे. आम्ही चोख कर्तव्य बजावूनही बोर्डाला आमच्या कष्टाची जाणीव नाही का? दरवर्षी मानधनासाठी आम्हाला पाठपुरावा करावा लागतो, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. मानधन लवकर मिळाले नाही, तर आगामी कामांवर बहिष्कार घालण्याचा विचार करावा लागेल.

मोघम आश्वासन
या संदर्भात बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, तांत्रिक कारणास्तव विलंब झाल्याचे सांगून लवकरच मानधन जमा होईल, असे मोघम आश्‍वासन देण्यात आले. मात्र, पैसे प्रत्यक्षात कधी मिळणार, हे केंद्रसंचालक, कर्मचाऱ्यांना पडलेले कोडे कायम आहे. दरम्यान, बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव गोपनीय राखण्‍याच्या अटीवर सांगितले की, सोलापुर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील केंद्रसंचालक आणि कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात आरटीजीएस पद्धतीने अग्रिम रक्कम आणि मानधन जमा केले आहे. आता पुणे जिल्ह्यातील केंद्र संचालक आणि कर्मचाऱ्यांच्‍या खात्यात येत्या सोमवारी रक्कम जमा करण्यात येईल.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com