पीएमपीएमएलचे डिजिटल फलक बंद

पीएमपीएमएलचे डिजिटल फलक बंद

Published on

पिंपरी, ता. २१ : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या बहुतांश बसवरील डिजिटल रूट बोर्ड (मार्गदर्शक फलक) बंद अवस्थेत असल्याचे चित्र दिसत आहे. काही बसवरील लोखंडी मार्गफलकांचा रंग उडाल्याने ते स्पष्ट वाचता येत नाहीत. परिणामी, प्रवाशांना बस नंबर व मार्ग समजत नसल्याने इच्छितस्थळी पोहोचताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पीएमपीएमएल प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पीएमपीएमएलकडून पुणे, पिंपरी-चिंचवड शहर तसेच पीएमआरडीए हद्दीत एकूण ३८८ मार्गांवर बससेवा दिली जाते. दररोज सुमारे दहा लाखांहून अधिक प्रवासी या बससेवेचा लाभ घेतात. महामंडळाच्या ताफ्यात सुमारे दोन हजार ४५ बस असून, त्यामध्ये ई-बस, सीएनजी आणि डिझेल बसचा समावेश आहे. प्रवाशांना लांबूनही बसचा क्रमांक व मार्ग स्पष्ट दिसावा यासाठी ई-बस व सीएनजी बसमध्ये डिजिटल फलक बसविण्यात आले आहेत, तर डिझेल बसमध्ये लोखंडी फलकांची व्यवस्था आहे. मात्र, अनेक वेळा डिजिटल फलक बंद असतात किंवा मार्ग अद्ययावत केलेले नसतात. परिणामी, ‘वेलकम टू पीएमपीएमएल’ असा संदेशच झळकत राहतो. बसच्या पुढील व मागील बाजूस असलेले लोखंडी फलकही अनेकदा बदललेले नसतात. काही बसमध्ये मागील दरवाज्याजवळ मार्गदर्शक फलकच नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे बस नेमकी कुठे जाणार याची माहिती प्रवाशांना मिळत नाही. अनेकदा प्रवासी चुकीच्या बसमध्ये बसल्याचे वाहकांकडून सांगितले जाते. यात वेळ वाया जात असून, प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. मार्गदर्शक फलक तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

‘‘पीएमपीएमएल बसला कधी मार्गाची पाटी नसते, तर कधी पाटी बदललेली नसते. त्यामुळे बस नेमकी कुठे जाणार हेच कळत नाही. सेवा दिवसेंदिवस ढासळत चालली आहे.
- अमित शिंदे, प्रवासी

‘‘डेपोतून बस सोडताना आयटीएमएस सुविधा तपासूनच डिजिटल बोर्ड कार्यरत करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. चालक व वाहकांनी पुढील आणि मागील बाजूचे मार्गदर्शक फलक योग्यरीत्या लावूनच बस मार्गस्थ करावी.
- यशवंत हिंगे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com