आरएमसी प्लान्ट ठरलेत प्रदूषणाचा स्रोत
अश्विनी पवार
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २३ ः पिंपरी चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता ढासळण्यासाठी येथील वाढलेले बांधकाम व त्यातून उडणारी ‘धूळ’ सर्वाधिक कारणीभूत आहे. आरएमसी अर्थात रेडी मिक्स काँक्रिट प्लान्टमधून उडणारी धूळ व त्यातून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने नियमावली जारी करण्यात आलेली आहे. मात्र, शहरात आरएमसी प्लान्ट चालक नियम धाब्यावर बसवत आहेत.
पिंपरी चिंचवड परिसराच्या भोवताली असणाऱ्या हिंजवडी, मारुंजी, मोशी, वाकड, ताथवडे, पुनावळे या भागात अनधिकृत आरएमसी प्लान्टचेही पेव फुटलेले आहे. परिणामी, येथील हवेची गुणवत्ता खालावत आहे. या भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) हा सतत ३०० च्या पुढे नोंदविला जात आहे.
आरएमसी प्लान्टचे दुष्परिणाम
- पीएम २.५ व पीएम १० या प्रदूषकांची निर्मिती
- शहरातील हवेची गुणवत्ता ढासळण्यास पीएम २.५ व पीएम १० दोन घटक जबाबदार
- बांधकाम आस्थापने, आरएमसी, आरएमसी मिक्सर व बांधकाम साहित्य वाहणारी अवजड वाहने हे प्रदूषण निर्मितीतील महत्त्वाचे घटक
- अत्यंत सूक्ष्म असल्याने हे घटक श्वासावाटे नाका-तोंडात जातात.
- रक्तप्रवाहात मिसळून ह्रदयरोग, फुप्फुस व मेंदूचे विकार जडण्यास कारणीभूत
पीएम २.५ व पीएम १० मुळे होणारे विकार
- सतत सर्दी खोकला
- धाप लागणे
- अंतर्गत जंतुसंसर्ग होऊन फुप्फुसाला क्षमता कमी होणे
- न्युमोनिया, ब्रॉन्कायटिस, दमा यासारखे श्वसनाचे आजार
- फुप्फुसाचा कर्करोग व इतर गंभीर आजार होण्याची शक्यता
- हे धूलिकण डोळ्यांमध्ये जाऊन डोळ्यांची जळजळ, डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे यांसारखे आजार
---
आरएमसी प्लान्टमधील प्रदूषण रोखण्यासाठी नियमावली
- शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, न्यायालये यांच्यापासून किमान २०० मीटरच्या अंतरावर असावेत
- मानवी वस्ती पासून किमान ५० मीटर अंतरावर असावेत
- सर्व बाजूंनी पूर्णपणे अच्छादित असावा
- कच्च्या मालाची हाताळणी होत असलेले क्षेत्रही आच्छादित असावे
- धूळ नियंत्रण प्रणाली बसविणे गरजेचे
- प्लान्टच्या परिघावर वृक्षारोपण करावे
- प्लान्टच्या आत व बाहेर पडण्याच्या ठिकाणी टायर धुण्याची सुविधा व सीसीटीव्ही कॅमेरे असावेत
- बाहेर पडणारी सर्व वाहने स्वच्छ असतील याची खातरजमा करणे आवश्यक
- धूळ निर्माण करणाऱ्या सर्व स्रोतांवर पाण्याची फॉगिंग प्रणाली बसवावी
- कच्चा माल हा बंदिस्त पद्धतीने साठवावा
- प्रत्येक प्लान्टमध्ये पीएम २.५ व पीएम १० घटक मोजणारी प्रणाली असावी
- वापरलेल्या पाण्यावर विल्हेवाट लावण्याआधी प्रक्रिया करावी
- ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी नियम २००० मधील तरतुदींचे पालन करावे
-----

