महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाचे वेध
पिंपरी, ता. २३ ः महापालिका स्थायी समिती सदस्यांची निवड शुक्रवारी (ता. २०) झाली आहे. आता अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. संख्याबळानुसार भाजपचाच अध्यक्ष होईल, हे स्पष्ट असले तरी पिंपरी, चिंचवड की भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसदस्याला संधी मिळणार, याची उत्सुकता आहे. विशेषतः सत्तेचा समतोल साधण्यासाठी चिंचवड मतदारसंघाकडे अध्यक्षपद जाणार, असल्याचे संकेत आहेत.
‘महापालिका तिजोरीच्या चाव्या’ अशी स्थायी समितीची ओळख आहे. तिच्या १६ सदस्यांसह विविध विषय समित्यांसाठी प्रत्येकी नऊ सदस्यांची निवड शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत झाली. आता स्थायीसह प्रत्येक विषय समिती अध्यक्षांची निवड त्या-त्या समिती सभेत होईल. संख्याबळानुसार सर्वच समित्यांवर भाजपच्याच नगरसदस्यांची वर्णी लागणार हे निश्चित आहे. कारण, स्थायीच्या १६ सदस्यांमध्ये भाजपचे ११, राष्ट्रवादीचे चार आणि शिवसेनेचा एक असे संख्याबळ आहे. सर्वच विषय समित्यांमध्ये भाजपचे प्रत्येकी सहा आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी तीन सदस्य आहेत. महापालिका सभागृहातील पुरेशा संख्याबळाअभावी विषय समित्यांमध्ये शिवसेनेला प्रतिनिधित्व मिळालेले नाही. यामध्ये विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, शिक्षण आणि क्रीडा- कला-साहित्य व सांस्कृतिक या समित्यांचा समावेश आहे.
भाजपचे सदस्य
स्थायी समिती सदस्यपदासाठी भाजपने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अभिषेक बारणे, शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, संदीप कस्पटे, बाबासाहेब त्रिभुवन भोसरी विधानसभा मतदारसंघातील सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, शीतल वर्णेकर, अर्चना करांडे व मधुरा शिंदे यांना संधी दिली आहे.
‘चिंचवड’ला संधी
स्थायी समितीत भाजपच्या ११ सदस्यांमध्ये सात महिला व चार पुरुष सदस्य आहेत. भाजपने महापौरपद भोसरी विधानसभा मतदारसंघातील तर उपमहापौरपद पिंपरी मतदारसंघातील सदस्याला दिले आहे. त्यामुळे सर्वार्थाने महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षपद चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सदस्याला देण्याची चर्चा असून केवळ घोषणा बाकी असल्याचे कळते.
अध्यक्षपदाचे सूत्र
स्थायी समितीच्या ११ सदस्यांमधील चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या शालिनी गुजर व मनीषा चिंचवडे पहिल्यांदा निवडून आल्या आहेत. अभिषेक बारणे, संदीप कस्पटे व बाबासाहेब त्रिभुवन दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. यातील अभिषेक बारणे व संदीप कस्पटे यांची नावे स्थायीच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. त्यांत कोणाला संधी मिळते याकडे लक्ष आहे.
जमेच्या बाजू काय?
अभिषेक बारणे हे थेरगाव प्रभाग २३ मधून तर संदीप कस्पटे हे पिंपळे निलख-वाकड प्रभाग २६ मधून निवडून आले आहेत. २०१७ च्या निवडणुकीनंतर भाजपने प्रभाग २६ मधील नगरसेविकेला पहिल्यांदा स्थायी अध्यक्षपदाची संधी दिली होती. त्याची पुनरावृत्ती पुन्हा करणार? की बारणे कुटुंबातील सदस्याला आणि थेरगाव गावठाण प्रभागाला प्राधान्य मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
---
महापालिका स्थायी समिती सदस्य निवड झाली आहे. आता अध्यक्ष निवडीबाबतचे पत्र नगरसचिव कार्यालयाकडून विभागीय आयुक्तांना सोमवारी पाठविण्यात आले आहे. त्यांच्याकडून अध्यक्ष निवडणूक कार्यक्रम कळविण्यात येईल. त्यानुसार अध्यक्ष निवडीची प्रक्रिया केली जाईल.
- मुकेश कोळप, नगरसचिव, महापालिका
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

