नागरिकांच्या प्रतिक्रिया
आरोग्याला धोका असेल, तर असला विकास नकोच
पुणे, पिंपरी चिंचवड शहरांतील प्रदूषणाबाबत नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया
पिंपरी, ता. २४ : वायू प्रदूषणाबाबत ‘सकाळ’ने वृत्तमालिका सुरू केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांत ही स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याची स्थिती आहे. या गंभीर स्थितीबाबत शहरातील नागरिक आपली मते ‘सकाळ’कडे व्यक्त करत आहेत. राज्य शासन, महपालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रक महामंडळ यांच्या कामकाजावर टीका होत आहे.
ताथवडेत मी राहत असलेल्या ठिकाणी एका खासगी बांधकाम व्यावसायिकाचा प्रकल्प सुरु आहे. तिथे बांधकामासाठी आखून दिलेल्या सर्व नियमांची पायमल्ली होत आहे. बांधकामामुळे आणि रस्त्यांच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ वातावरणात मिसळते. रस्त्यावरून चालणेही कठीण होते. याबाबात मी महापालिकेकडे तक्रार दाखल केली. पण, प्रशासनाने संबंधित बांधकाम व्यावसायिकाला नोटीस देण्याव्यतिरिक्त काहीच झाले नाही. वास्तविक कठोर कारवाई केलेली नाही.
- किरण सावळे, ताथवडे
---
हवा प्रदूषण होण्यासाठी सर्वप्रथम जे बांधकामांना परवानगी देतात त्यांनाच जबाबदार धरायला पाहिजे. हवा प्रदूषण होऊ नये म्हणून जे नियम आखले आहेत ते पाळले जातात की नाही हे पाहण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची आहे. पण, हे होताना दिसत नाही. केवळ बांधकामच नाही तर जुन्या रिक्षा, ट्रक तसेच बरीच वाहने धूर सोडतात हे दिसत असले तरी देखील कडक कारवाई होताना दिसत नाही. हवा प्रदूषण होऊ नये म्हणून जी नियमावली असते ती पाळत नसतील कंपन्यांवर देखील जागीच कारवाई केली पाहिजे. प्रशासनाने कठोर कारवाई करायला सुरुवात केली तर हवा प्रदूषण रोखणे इतके अवघड नसावे. निव्वळ पाण्याच्या फवारा आणि अशा गाड्या फिरवून नक्कीच प्रदूषण कमी होणार नाही. सर्वांचे मूळ कारण कारवाई करण्यापेक्षा लोकांना शिस्त लावणे गरजेचे आहे. तेव्हाच हे शक्य होईल.
- हेमंत धांडे, चिखली
आम्ही सहा महिन्यांपूर्वी मामुर्डीतील लिटिल अर्थ येथे रहायला आलो आहे. पूर्वेकडे पाहिले तर निम्मे शहर दिसून येत नाही. बांधकामे सतत वाढत आहेत. २४ तास धूळ हवेत उडत असते. त्यामुळे लहान मुलांना खोकला, घसादुखी होतेय. प्रशासन यावर काही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.
- विठ्ठल शिरके, मामुर्डी
मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढत्या श्वसनाच्या समस्या ही एक धोक्याची घंटा आहे. अधिकाऱ्यांनी घोषणांपेक्षा पुढे जाऊन पर्यावरणीय नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करावी. ‘रिअल-टाइम’ देखरेख, उल्लंघन करणाऱ्यांसाठी कडक दंड, चांगली सार्वजनिक वाहतूक आणि मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम ही तातडीची गरज आहे. जर त्वरित आणि समन्वित कारवाई केली नाही, तर पुणे महाराष्ट्रातील सर्वात राहण्यायोग्य शहरांपैकी एक म्हणून असलेली ओळख गमावण्याचा धोका आहे.
- उमेश गवळी, चिंचवड
हवेच्या प्रदूषणात जितकी नवीन बांधकामामुळे वाढ होत आहे. तितकीच रस्त्यावर साचलेल्या धुळीमुळे होत आहे. आज कुठल्याही रस्त्यावर कडेच्या मार्गिकेत प्रचंड प्रमाणात धूळ आहे. वाहने गेल्यावर ही उडून हवेत पसरते. महापालिका प्रशासनाने सर्वप्रथम रस्त्यावर साचलेली धूळ काढून रस्ते साफ ठेवले तर प्रदूषण नियंत्रणात मोलाची भर पडेल. नुसतेच नवीन बांधकामामुळे प्रदूषण वाढते म्हणणे योग्य नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावर येऊन पाहणी केली तर त्यांना खरी परिस्थिती कळेल.
- उल्हास घुगरदरे, पुनावळे
-----
पुण्यातील हवेत दर तासाला सहा टन सिमेंट मिसळत असेल, तर कोणता गुणवत्तापूर्ण विकास होत आहे आणि कोणासाठी? मानवी आरोग्य धोक्यात येत असेल तर असला विकास काय कामाचा? आता किमान पाच वर्षे तरी सर्व बांधकामे बंद ठेवली पाहिजेत. यासाठी पुणेकरांनी आवाज उठवलाच पाहिजे. आम्ही पुनावळे परिसरात राहत आहोत. घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. रस्ते कधी पूर्ण आणि स्वच्छ होतील, कधी इमारत बांधकाम बंद होईल असे झाले आहे. शासनाने प्रदूषण नियंत्रणासंदर्भात योग्य भूमिका घेऊन नागरिकांना निसर्गाने दिलेल्या स्वच्छ हवेत आनंदाने जगू द्या. इमारतीपेक्षा गार्डन आणि निसर्गरम्य पार्क उभारण्यात शासनाने पुढाकार घ्यावा. ‘सकाळ’ने अतिशय चांगला उपक्रम हाती घेतल्याबद्दल धन्यवाद.
- डॉ. जिभाऊ बच्छाव, सेवानिवृत्त प्राचार्य, पुनावळे
माती, सिमेंट, आरसीसी वाहून नेणारे ट्रकचालक, ओव्हरलोड वाहतूक काळजीपूर्वक न केल्यामुळे सिमेंट, माती रस्त्यावर पडते. रस्त्याकडेची माती, राडारोडा कोणी दररोज उचलत नाहीत. त्यामुळे हवा प्रदूषित होत आहे.
- राजेंद्र घोलप, रहिवासी, पिंपरी
मी पुनावळे येथील विष्णुदेवनगर येथे सप्टेंबर २०२१ पासून राहतो. सोसायटीला लागूनच पालिकेचे उद्यान आहे. मागील काही दिवसांपासून मला बागेत खूप धुळीचे वातावरण जाणवत आहे. मी आता मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे. पहाटे ४ वाजल्यापासूनच बांधकामांना सुरुवात होते. त्याचा प्रचंड आवाज सुरू होतो. सर्व झाडांच्या पानांवर आणि फांद्या पांढऱ्या धुळीचा थर जमा झालेला दिसतो. पालिकेला बिल्डर/फ्लॅट खरेदीदारांकडून करापोटी पैसे मिळतात. सरकारला जीएसटी आणि नोंदणीतूनही पैसे मिळत आहेत. पण हवेच्या गुणवत्तेबद्दल काय ? आता मला माझे कुटुंब चांगले हवामानासाठी इतर ठिकाणी न्यावेसे वाटत आहे. पुणे, पिंपरी चिंचवड ही शहरे आरोग्यासाठी खूपच धोकादायक आहे.
- एक नागरिक
सर्व प्रकल्प बंद करून फक्त पावसाळ्यातच त्यांना परवानगी देण्याची गरज आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व काळजी घेऊन फक्त पाच-दहा टक्के बांधकामांनाच काम करण्याची परवानगी दिली पाहिजे. अन्यथा एक दिवस नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागेल.
- एक नागरिक
प्रदूषणाचा खूप त्रास आहे. सरकार, महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे झोपले आहे. करू शकणारी कामे करत नाही अणि सर्वसामान्य लोकांच्या जिवाशी खेळत आहे. आपण सर्व हे सगळं ठीक करून एक उत्तम उदाहरण ठेवू शकतो. उपाय हे तात्पुरते नसावेत. पूर्ण भविष्याचा विचार केला गेला पाहिजे.
- एक वाचक
-------------
वाचक म्हणतात..
नियमांचे पालन होईना
विस्तारा हौसिंग सोसायटी, नेवाळे वस्तीसमोरील डी. वाय. पाटील मॅनेजमेंट कॉलेजजवळ नवीन बांधकाम सुरू करण्यात आले आहे. तेथे महापालिकेने बांधकामासाठी आखून दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. बांधकामाच्या जागेभोवती चारही बाजूंनी उंच पत्र्यांची तात्पुरती भिंत उभारणे, हिरव्या जाळीचा (ग्रीन नेट) वापर करणे व बांधकामाच्या जागेवर पाण्याचा मारा नियमित करून धूळ नियंत्रण करणे आदी नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे परिसरातील प्रदूषण वाढत आहे. त्या ठिकाणी उडणाऱ्या मोठ्या प्रमाणातील धुळीमुळे परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व श्वसनाच्या आजारांनी त्रस्त व्यक्तींना त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिका प्रशासनाने संबंधित बांधकाम व्यावसायिकास आवश्यक त्या सूचना द्याव्यात व योग्य ती कारवाई करावी.
---
पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे
पिंपरी येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. पण, या ठिकाणी बांधकामाच्या जागेभोवती चारही बाजूंनी उंच पत्रे लावणे, हिरव्या जाळीचा (ग्रीन नेट) वापर करून सर्व परिसर अच्छादित करून घेणे, बांधकामाच्या ठिकाणी जमिनीवर कायम पाण्याचा मारा करणे, हवा प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी सेन्सर बसविणे आदी नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे.
---
सिमेंटच्या धुळीचा त्रास
मी विशालनगर पिंपळे निलख येथे रहातो. नदी पलीकडे असलेल्या बालेवाडी गावातील आरएमसी प्लान्टमुळे मला सिमेंटच्या धुळीचा खूपच त्रास होत आहे. संसर्गामुळे डोळे व आसपासची त्वचा खूपच खराब झाली आहे. गोळ्या, मलम आणि इतर औषधे घ्यावी लागत आहेत.
---
हितसंबंध असल्याचा संशय
उद्योगनगरीमध्ये प्रदूषण नियंत्रण नियम धाब्यावर बसवून पर्यावरणाला धोका पोहोचेल अशी कृत्ये बिल्डर आणि उद्योगपतींकडून सर्रास सुरू आहेत. सर्वसामान्य नागरिकांचा श्वास गुदमरत आहे. ही वस्तुस्थिती आहे. रुपीनगर वंदे मातरम् चौक येथे गेल्या आठ महिन्यांपासून पाच मजली इमारतीचे काम सुरू आहे. तेथे कोणत्याही नियमाचे पालन होताना दिसून येत नाही. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना खूप त्रास होत आहे. वेळोवेळी सांगूनही बाजूने पत्र लावले जात नाहीत अथवा सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे दिसते. महापालिका प्रशासन पर्यावरण विभाग कोणतीही कारवाई करत नाही. यामुळे महापालिका, पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे बिल्डरसोबत हितसंबंध असल्याचा संशय येत आहे.
---
रात्री उशिरापर्यंत बांधकामे सुरूच
मी डी. वाय, पाटील कॉलेज, रावेत येथे राहतो. येथे चारही बाजूला बांधकामांचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या ठिकाणी कुठेही सुरक्षाभिंत किंवा हिरवी जाळी (ग्रीन नेट) लावलेला दिसत नाही. त्यामुळे हवेत मोठ्या प्रमाणात धूळ असते. बांधकामांची वेळही निश्चित नाही. सकाळी सात वाजल्यापासूनच बांधकाम सुरू होते. ते रात्री दहा वाजून गेले तरी सुरू असते.
---
शहराचा विस्तार हे प्रगतीचे लक्षण आहे हे बरोबर आहे. यात नियोजित काम करता येऊ शकते, पण याची कमतरता आहे. शहरात मेट्रो, उड्डाणपुलाचे कामे सुरू आहे. सेवा रस्त्याची अवस्था भयंकर आहे. हा रस्ता खराब असल्याने वाहने हळू न्यावी लागतात. वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यात चोहोबाजूंनी सुरू असलेली प्रचंड बांधकामे, यामुळे हवेत धुलिकणांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. जुन्या पुण्याची थंड हवा आता फक्त आठवणीत उरली आहे.
------
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्कृष्ट करावी
आजही लोक खासगी वाहनांना प्राधान्य देतात. याचे मुख्य कारण म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजूनही सक्षम झालेली नाही. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडीमुळे वाहने तास न् तास सुरू राहतात. ज्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढून हवेचा दर्जा खालावतोय. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. यासाठी प्रशासनाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्कृष्ट करावी व नागरिकांनीही त्याचा वापर करावा. वृक्षारोपण आणि संवर्धन ही प्रत्येकाचीच जबाबदारी. प्रशासनानेही असे भरपूर कार्यक्रम राबवावेत. जास्तीत जास्त झाडे लावून शहर हिरवेगार करावे तरच प्रदूषण कमी होईल. स्थानिक नगरसेवकांनी आपल्या परिसरामध्ये असलेल्या झाडांकडे लक्ष द्यावे, नवनवीन झाडे लावावीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

