गुणवत्ता मूल्यांकनात फक्त सहा शाळा उत्तीर्ण

गुणवत्ता मूल्यांकनात फक्त सहा शाळा उत्तीर्ण

Published on

पिंपरी, ता. २३ : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शाळांना सुधारण्यासाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्‍वासन आराखडा (SQAAF) तयार केला आहे. यात सर्व शाळांचे स्वयं मूल्यांकन व त्यानंतर बाह्य मूल्यांकन करण्यात आले. यात शहरातील ६८५ शाळांपैकी फक्त सहा शाळांनी ‘अ+’ श्रेणी पटकावली आहे. परिणामी, उर्वरित ६७९ शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्य भरातून स्वयं मुल्यांकन करणाऱ्या शाळांची संख्या एक लाख दोन हजार ६७५ अशी होती. त्यातील दहा हजार ७१२ शाळा बाह्य मूल्यांकनासाठी निवडण्यात आल्या. यात राज्यभरातून ४२९ शाळांना अ+ श्रेणी प्राप्त झाली आहे.
या मूल्यांकनासाठी परिषदेने महाराष्ट्र राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्‍वासन आराखड्याची निर्मिती करण्यात आलेली आहे.


शहरातील ‘अ+’ श्रेणी प्राप्त शाळा
- एच. ए. स्कूल माध्यमिक विभाग पिंपरी
- श्री म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डी
- ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी
- विस्डम वर्ल्ड स्कूल,वाकड
- प्रतिभा ज्यु. कॉलेज चिंचवड
- एस.बी. पाटील पब्लिक स्कूल, रावेत


शहरातील सहा शाळांनी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्‍वासन आराखड्यात यश मिळवले. प्रत्येक शाळांची व्यवस्थित तपासणी केली. आराखड्यानुसार शाळांचे निकष तपासण्‍यात आले. पारदर्शकतेमुळे मूल्‍यांकन व्यवस्थित केले आहे.
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग

या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि सर्वांगीण विकासावर शिक्कामोर्तब झाले आहे. शासनाच्या ‘स्कॉफ’ मानांकनामध्ये शाळेचे शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा, नावीन्यपूर्ण उपक्रम, तंत्रज्ञानाचा वापर, सहशालेय उपक्रम तसेच शालेय प्रशासन यांचे सखोल मूल्यमापन करण्यात आले.
- भानुदास मालुसरे, प्राचार्य श्री म्हाळसाकांत विद्यालय आकुर्डी

शाळा कला, क्रीडा, संगीत, नाट्य आणि खेळ यामध्ये कायमच जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली आहे. शाळेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मागील पाच वर्षापासून शाळेत व्यवसाय शिक्षण विभाग उत्तम पद्धतीने सुरू आहे. मूल्यांकनात अ+ श्रेणी प्राप्त झाल्यामुळे आनंदाचे आणि कौतुकाचे वातावरण आहे.
- दर्शना कोरके, शाळाप्रमुख, हिंदुस्तान अँटिबायोटिक्स माध्यमिक विभाग

विद्यालयामध्ये राबविले जाणारे नवोपक्रम, आधुनिक शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थी-केंद्रित अध्यापन, व्यक्तिमत्व विकासासाठी अशा विविध विभागांद्वारे होणारे कौशल्य विकास उपक्रम यामुळेच शाळेचे हे यश आहे. या सर्व निकषांवर विद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
- मनोज देवळेकर, केंद्रप्रमुख, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी

Marathi News Esakal
www.esakal.com