गाडी खरेदीच्या शक्ती प्रदर्शनाचा नवा ‘ट्रेंड’
पिंपरी, ता. २४ : नवीन गाडी खरेदी केल्यानंतर तिचे ‘शक्ती प्रदर्शन’ करण्याचा ‘ट्रेंड’ वेगाने वाढताना दिसत आहे. शोरूममधून वाहनाची डिलिव्हरी घेतल्यानंतर मित्र-नातेवाईकांसह ताफा तयार करून मिरवणूक काढण्याचे प्रकार वाढले आहेत. काही ठिकाणी दहा ते पंधरा वाहनांचा ताफा, बाऊन्सर, डीजे साऊंड सिस्टीम, गुलाल उधळण आणि आतषबाजीसह जल्लोष साजरा केला जातो. सोशल मीडियावर रील्स आणि व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी हे प्रकार जाणीवपूर्वक भडक पद्धतीने केले जात असल्याचे चित्र आहे. पिंपरी चिंचवड शहर व परिसरात असे चित्र ठिकठिकाणी पहायला मिळते.
रस्त्यावरच जल्लोष; वाहतुकीची कोंडी
मुख्य रस्ते, चौक आणि सिग्नल परिसरात गाड्या आडव्या-तिडव्या उभ्या करून फोटोशूट केले जाते. काहीजण नव्या गाडीसमोर केक कापतात, फटाके फोडतात, तर काहीजण डान्स करत रस्ता अडवतात. परिणामी, वाहतूक कोंडी निर्माण होते. रुग्णवाहिका, शाळेच्या बस किंवा अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही याचा फटका बसतो.
अपघाताचा धोका
वाहतूक नियमांनुसार सार्वजनिक रस्त्यावर परवानगीशिवाय मिरवणूक काढणे, ध्वनिक्षेपकांचा वापर करणे किंवा फटाके फोडणे नियमबाह्य आहे. सनरूफमधून उभे राहून स्टंट करणे असे प्रकार धोकादायक ठरू शकतात. यामुळे अपघाताचा धोका वाढतो आणि कायदेशीर कारवाईची शक्यता निर्माण होते.
प्रदूषणात भर
आतषबाजीमुळे वायुप्रदूषण वाढते, तर डीजेच्या मोठ्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषण होते. निवासी भागात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या जल्लोषामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि रुग्ण त्रस्त होतात.
या भागांत दिसतात मिरवणुका
शहरातील चिंचवड, थरमॅक्स चौक, केएसबी चौक, भोसरी, कासारवाडी, बाणेर, ताथवडे, वाकड, हिंजवडी या भागांत विविध वाहन कंपन्यांचे शोरूम आहेत. त्यामुळे येथून नवीन वाहनांची खरेदी होत असते. शोरूममधून वाहन खरेदी केल्यानंतर येथूनच मिरवणूक सुरू होते.
सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न?
समाजात प्रतिष्ठा दाखवण्यासाठी किंवा सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवण्यासाठी हा ‘ट्रेंड’ वाढत असल्याचे दिसून येते. मात्र, आनंद साजरा करताना इतरांच्या सुरक्षिततेचा आणि सोयीचा विचार करणे गरजेचे आहे.
‘‘नवीन वाहन ही कुटुंबासाठी आनंदाची बाब असली तरी, तो आनंद इतरांसाठी त्रासदायक ठरू नये. नियमांचे पालन करून आनंद साजरा करायला हवा. खरेदीचा आनंद घरगुती किंवा सुरक्षित ठिकाणी साजरा करणे, वाहतुकीला अडथळा न आणणे आणि नियमांचे पालन करणे ही जबाबदार नागरिकांची ओळख ठरते.
- तेजस गरुड, नागरिक
PNE26V98544
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

