मुकाई चौक रस्त्याचे अखेर डांबरीकरण
रावेत, ता.२४ : रावेत आणि परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाच्या मुकाई चौक परिसरातील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. त्यामुळे अखेर आम्हाला खड्डेमुक्त रस्ता मिळाला, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. डांबरीकरणाने वाहतूक कोंडीमधूनही सुटका होण्यास मदत मिळणार आहे.
मुकाई चौक हा रावेत, किवळे आणि मामुर्डी या भागांना जोडणारा मुख्य केंद्रबिंदू आहे. येथून मुंबई-पुणे द्रूतगती मार्ग आणि हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारी वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून मुकाई चौक परिसर आणि तेथील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकीचालक घसरून पडण्याचे प्रमाण वाढले होते. उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे, स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला होता.
महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाने अखेर या समस्येची दखल घेत युद्धपातळीवर डांबरीकरणाचे काम पूर्ण केले आहे. या नवीन डांबरीकरणामुळे रहदारीचा वेगही सुधारला आहे. सकाळी आणि संध्याकाळी होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.
स्थानिक नागरिकांनी या कामाचे स्वागत केले असून या मुख्य रस्त्याप्रमाणेच परिसरातील अंतर्गत रस्त्यांचेही डांबरीकरण व्हावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या वाहिनीसाठी रस्ता खोदण्यात आला होता. मात्र आता नुकतेच त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे.
- प्रवीण धुमाळ, स्थापत्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

