ताथवडे घाटावर ‘ब्राह्मणी बदक’ जोडीचे दर्शन
पिंपरी, ता. २५ ः सध्या बदलत्या वातावरणामुळे शहरात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. ताथवडे घाटावर परिसरात पक्षी अभ्यासकांना ‘ब्राह्मणी बदक’ (रुडी शेलडक/चक्रवाक) हा स्थलांतरित पक्षी आढळला आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींचा उत्साह आणि घाटांचे सौंदर्य वाढले आहे. अनुकूल वातावरण आणि हवे असलेल्या अन्नाची उपलब्धता लक्षात घेऊन हे पक्षी प्रवास करीत असतात. या दुर्मिळ व आकर्षक बदकाच्या जोडीने शांत पाणवठे, हिरवळ आणि कमी मानवी हस्तक्षेप असलेला ताथवडे घाट हा या पाहुण्या पक्ष्यांसाठी काही काळाचा सुरक्षित आसरा ठरत असल्याचे दिसून आले.
‘ताथवडे घाटावर बदकाच्या जोडीचे दर्शन होणे ही आनंददायी बाब असली, तरी त्यांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक नागरिकांनी व पर्यटकांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. पक्ष्यांना त्रास न देणे, आवाज, प्लास्टिक व कचरा टाळणे. नैसर्गिक अधिवास जपणे अशा स्थलांतरित पक्ष्यांचे स्वागत करून त्यांचे संरक्षण करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने ही बातमी आशेचा किरण ठरत आहे.
स्थलांतर व अधिवास
ब्राह्मणी बदक हे मुख्यतः मध्य आशिया, तिबेट, मंगोलिया, रशिया आणि युरोपातील काही भागांत आढळतात. हिवाळ्यात थंडीपासून बचावासाठी हे पक्षी भारतात स्थलांतर करतात. भारतात महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश तसेच उत्तर भारतातील जलाशय, नद्या, तलाव व ओढ्यांच्या काठावर हे दिसून येतात.
ओळख व वैशिष्ट्ये
- शरीरावर केशरी-तपकिरी रंग
- डोके फिकट पांढरे/क्रीम रंगाचे
- पंखांवर उडताना पांढरा पट्टा स्पष्ट दिसतो
- नर व मादी दिसायला जवळपास सारखे, मात्र नराच्या मानेजवळ काळसर पट्टा असू शकतो
आहार
- जलवनस्पती
- गवत व बिया
- कीटक
- लहान जलजीव
पर्यावरणीय महत्त्व
- जलपरिसंस्थेतील समतोल राखण्यास मदत
- कीटकांची संख्या नियंत्रित ठेवणे
- जैवविविधतेचे सूचक
या बदकांची जोडी सकाळी पाण्याजवळ विहार करताना दिसली. त्यांच्या केशरी-तपकिरी रंगछटा, पांढुरके डोके आणि काळी शेपटी यामुळे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अशा स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन होणे हे परिसरातील पर्यावरणीय समतोल व जैवविविधतेचे सकारात्मक द्योतक मानले जाते.
- शुभम पांडे, अध्यक्ष, वर्ल्ड फॉर नेचर

