गृन्हे वृत्त
पैसे न दिल्याने रिक्षाचालकावर हल्ला
पिंपरी ः चाकणमधील तळेगाव चौक परिसरात एका रिक्षाचालकावर आणि त्याच्या भावावर दगडाने हल्ला करण्यात आला.
या प्रकरणी योगेश मुंगडे (वय २०, नाणेकरवाडी, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. त्याप्रमाणे नामदेव नाईक (वय २४, भुजबळ आळी, चाकण), लोकेश खंडाळे (वय २७), दिप्तेश खंडाळे (वय २५, रा. दोघेही कोंढवा, चाकण) या तिघांना अटक केली आहे.
योगेश आणि त्यांचा भाऊ हनुमंत हे चहाच्या टपरी समोर उभे असताना आरोपींनी तिथे येऊन त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी दोघांना मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी योगेश यांना जीवे मारण्याची धमकी देत दगडाने मारण्याचा प्रयत्न केला.
व्यवसायाचे आमिष दाखवून २५ लाखांची फसवणूक
नवीन व्यवसाय सुरू करून देण्याचे आणि स्वस्त दरात प्लॉट देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची आणि तिच्या पतीची २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी प्रियांका पोटे (वय ३४, महात्मा फुलेनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलीप औताडे, शुभम औताडे (रा. निर्मलनगर, शेवगाव, अहिल्यानगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीचे वडील आणि भाऊ असलेल्या आरोपींनी नवीन व्यवसाय सुरु करून देण्याचे आश्वासन दिले, तसेच २५ लाख रुपये भरल्यास एक गुंठा प्लॉट मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीच्या पतीने २३ लाख रुपये आणि भावाच्या खात्यात २ लाख रुपये असे एकूण २५ लाख रुपये जमा केले. पैसे घेऊनही आरोपींनी व्यवसाय किंवा प्लॉट नावावर केला नाही. यावरून त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
शैक्षणिक प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक
चऱ्होली परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची मुलीला महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली पाच लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी बिरनारायण सिंग (वय ४६, ड्रीम्स कार्निवल सोसायटी, चऱ्होली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शरणगौड बिरादार (देवरहिप्परगी, सिंदगी, बिजापूर, कर्नाटक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने मुलीला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून देतो असे सांगितले. त्यासाठी त्याने फिर्यादीकडून ५ लाख ४५ हजार रुपये घेतले. मात्र, पैसे घेऊनही मुलीला प्रवेश मिळवून दिला नाही. फिर्यादीने पैसे परत मागितले असता आरोपीने पैसे देण्यास टाळाटाळ करत त्यांना शिवीगाळ केली.
जाब विचारल्याने दुकानदाराचे नाक फोडले
काळेवाडी परिसरात ‘फर्निचरचे काम अपूर्ण का ठेवले’ असे विचारल्याच्या रागातून एका व्यावसायिकाला मारहाण करून त्याचे नाक फोडण्यात आले.
या प्रकरणी बजरंगलाल बंग (वय ३५, रिचमंड पार्क, रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सलीम पंजेशा (वय ४४, नढेनगर, काळेवाडी) याला अटक केली असून त्याचा मुलगा आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी बंग हे त्यांच्या फर्निचरच्या कामाबाबत विचारपूस करण्यासाठी आरोपीच्या दुकानात गेले होते. काम पूर्ण का केले नाही, असे विचारल्यामुळे त्याने बंग यांच्या नाकावर बुक्का मारला, यामध्ये त्यांच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले. तसेच आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी बंग यांना मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली.
घरगुती गॅसची अवैध रिफिलिंग करणाऱ्यावर कारवाई
चाकणमधील खंडोबामाळ परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून बेकायदेशीरपणे लहान टाक्यांमध्ये गॅस भरणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी कारवाई केली.
या प्रकरणी राजू रजपूत (वय ३०, खंडेश्वर कॉलनी, चाकण) याला अटक केली आहे.
आरोपीने फायद्यासाठी एका पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना घरगुती वापराचे गॅस सिलिंडर साठवले होते. तिथून तो छोट्या टाक्यांमध्ये गॅस भरत असताना पोलिसांनी छापा टाकला. त्याच्याकडून १६ हजार १०० रुपये किमतीचा गॅस जप्त करण्यात आला आहे.
गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक
पिंपळे सौदागर येथील एका व्यक्तीची स्टॉक मार्केटमध्ये जास्तीचा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून १४ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी नितीन सिन्हा (वय ३७, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नेहा अय्यर, प्राजक्त सामंत आणि एका ग्रुपच्या ॲडमीनसह बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करून नोमुरा नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. फिर्यादीने वेळोवेळी एकूण १४ लाख २९ हजार ९० रुपये गुंतवले. मात्र, गुंतवणूक केल्यानंतर त्यांना परतावा मिळाला नाही आणि त्यांची मुद्दल रक्कमही परत मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली.
ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक
चिंचवडमध्ये एका व्यक्तीला शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४२ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी महेश सगरे (वय ५१, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिताली मिश्रा आणि विविध बँक खातेधारका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी फिर्यादीला एका ग्रुपमध्ये समाविष्ट केले व एका ॲपद्वारे फिर्यादीला वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास प्रवृत्त करण्यात आले. ॲपवर त्यांना खोटा नफा दाखवण्यात आला, परंतु तो नफा काढण्यासाठी पुन्हा टॅक्सच्या नावाखाली पैसे भरण्यास सांगण्यात आले. अशा प्रकारे फिर्यादीकडून एकूण ४२ लाख ४८ हजार ९०० रुपये उकळून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
जुना भांडणातून मारहाण
भोसरी येथील बालाजीनगर परिसरात जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाला मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी श्रावण गव्हाणे (वय ३०, सदगुरुनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भरत मोहीते आणि नरेश विटकर (दोघेही रा. बालाजीनगर, भोसरी) यांना नोटीस देऊन कारवाई करण्यात आली.
आरोपीने फिर्यादीला घरी बोलावून ‘तू मला शिवीगाळ का केली’ अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपीने गव्हाणे यांना मारहाण केली, तर दुसऱ्या आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात, गालावर आणि छातीवर वार करून त्यांना जखमी केले.
अश्लील हावभाव करणाऱ्या महिलेवर कारवाई
दिघी येथील आळंदी रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसायासाठी इशारा करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी ४३ वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. दिघीतील योगीराज चौक परिसरात सार्वजनिक रस्त्याच्या कडेला आरोपी महिला वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने लोकांना अश्लील हावभाव करत होती. तिच्या या कृत्यामुळे सार्वजनिक शिष्टाचाराचा आणि सभ्यतेचा भंग झाला, तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांसाठी अडथळा निर्माण झाला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

