पिंपरी-चिंचवड
रोझ मॅन्शन सोसायटीत मंदिराचा जीर्णोद्धार
पिंपरी, ता. २५ : पुनावळे परिसरातील रोझ मॅन्शन सोसायटीत मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा भक्तिभावात पार पडला. या वेळी हनुमान, शिवलिंग, नंदी आणि विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तसेच कलशारोहण सोहळादेखील उत्साहात झाला.
या कार्यक्रमावेळी विधिवत गणेशपूजन आणि वेदघोषात होम-हवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. परिसरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. दोन दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात सोसायटीतील सर्व सदस्यांनी सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. मूर्तींची प्रतिष्ठापना विधीपूर्वक करण्यात आली. त्यानंतर सामुदायिक महाआरतीत भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या वेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले. सायंकाळी मधुर भजनांनी वातावरण अधिकच मंगलमय केले.

