‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी

‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी

Published on

पिंपरी, ता. २५ : पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपद चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सदस्यालाच मिळणार, हे निश्चित होते. यात संदीप कस्पटे आणि अभिजित बारणे यांची नावे आघाडीवर होती. कोअर कमिटीने बहुमताने कस्पटे यांचे नाव निश्चित केले. पण, काही स्थानिक कारभाऱ्यांची मुंबई वारी, प्रदेश नेतृत्वाची मनधरणी आणि गेल्या दोन दिवसांतील नाट्यमय घडामोडींनंतर बारणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. बुधवारी (ता.२५) त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असून, शनिवारी (ता. २८) त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.
‘महापालिकेच्या तिजोरीची चावी’ अशी स्थायी समिती ओळखली जाते. तिच्या १६ सदस्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे ११, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि शिवसेनेचा एक सदस्य आहे. संख्याबळानुसार भाजपचाच अध्यक्ष होणार, हे निश्चित होते. पण, हे पद पिंपरी, चिंचवड की भोसरी विधानसभा मतदारसंघातील सदस्याला जाणार, याबाबत उत्सुकता होती. परंतु, महापौर भोसरी मतदारसंघातील, उपमहापौर पिंपरी मतदारसंघातील, पक्षनेता चिंचवड मतदारसंघातील असे भाजपचे अंतर्गत चित्र होते. स्थायीचे अध्यक्षपदही चिंचवडमधील सदस्यालाच मिळणार, हेही निश्चित झाले. त्यासाठी कस्पटे आणि बारणे यांची नावे चर्चेत होती. यांत कोण बाजी मारतो? याकडे नागरिकांचे लक्ष होते. अखेर बारणे यांच्य नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांच्यासह सर्व विषय समिती अध्यक्षपदाचे अर्ज दाखल करताना आमदार शंकर जगताप, उपमहापौर शैलजा बाबर, सभागृह नेते प्रशांत शितोळे, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आदी उपस्थित होते.

अशा घडल्या घडामोडी
भाजप कोअर कमिटीने प्रदेश अध्यक्षांकडे स्थायी समिती अध्यक्षपदाचे नाव द्यायचे होते. त्यानुसार कोअर कमिटीने बहुमताने संदीप कस्पटे यांच्या नावाची शिफारस केली. मात्र, भोसरीचे आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार शंकर जगताप, पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मुंबईत मंगळवारी (ता.२४) भेट घेतली आणि बारणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. बुधवारी (ता.२५) केवळ बारणे यांचा उमेदवारी अर्ज नगरसचिव मुकेश कोळप यांच्याकडे सादर करण्यात आला. निर्धारित वेळेत त्यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण, विरोध पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज दाखल केला नाही.

अशी होणार निवड
महापालिका स्थायी समिती  अध्यक्षपदासाठी शनिवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता महापालिका मुख्यालयात निवडणूक प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी स्थायी समितीच्या विशेष सभेचे आयोजन केले आहे. पीठासीन अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांची नेमणूक विभागीय आयुक्तांनी केली आहे. दाखल अर्जांची छाननी करून वैध-अवैध ठरविले जाईल. वैध अर्ज ठरल्यास अध्यक्षपदी अभिषेक बारणे यांच्या नावाची घोषणा होईल.

महापालिका तिजोरी रिकामी
‘‘महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. कर्जरोखे उभारून विकासकामे सुरू आहेत. एकेकाळी श्रीमंत असलेल्या महापालिकेवर गेल्या चार वर्षांच्या प्रशासकीय कार्यकाळात ही परिस्थिती ओढवली आहे,’’ अशा स्वरुपाचे ताशेरे शुक्रवारच्या (ता.२०) सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनावर ओढले होते. प्रशासकीय काळातील निर्णयावर श्वेतपत्रिका काढून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यामुळे ‘तिजोरीच्या चाव्या’ असलेल्या स्थायी समितीचा कारभार कसा हाकायचा? असा प्रश्‍न नव्या पदाधिकाऱ्यांसमोर असेल.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com