आकुर्डीतील प्राणीशास्त्रीय संग्रह केंद्रांमुळे संशोधनाला चालना

आकुर्डीतील प्राणीशास्त्रीय संग्रह केंद्रांमुळे संशोधनाला चालना

Published on

राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष

पिंपरी, ता. २७ ः झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया अर्थात भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या वतीने आकुर्डी येथे ‘पश्‍चिम घाट प्राणिशास्त्रीय संग्रह केंद्र व संग्रहालय’ उभारण्यात येणार आहे. यामुळे पश्‍चिम घाटातील जैवविविधता, प्राणीविविधता याबाबतच्या संशोधनाला चालना मिळणार आहे. या केंद्राच्या विस्तारीकरणामुळे आणि अत्याधुनिक संग्रहालयामुळे विज्ञान व संशोधन क्षेत्रामध्ये पिंपरी चिंचवडला नवी ओळख मिळणार आहे.

संस्थेचे महत्त्व
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमधील यादीत नोंद झालेला पश्‍चिम घाट हा जैवविविधतेने समृद्ध घाट आहे. या भागातून गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नव्या प्रजाती शास्त्रज्ज्ञांनी शोधल्या आहेत. येथील जैवविविधता, पर्यावरण याचे महत्त्व लक्षात घेता त्याचे जतन, संवर्धन आणि संशोधनावर भर देण्यासाठी भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या वतीने येथे अत्याधुनिक केंद्र उभारण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन पायाभरणी नुकतीच संस्थेच्या संचालिका धृती बॅनर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. विविध प्राणी गटांतील प्रतिनिधिक नमुने येथे संग्रहित केले जाणार आहेत, त्यामध्ये: कीटक, मृदुकाय प्राणी, मासे, उभयचर, सरपटणारे प्राणी, पक्षी, सस्तन प्राणी आदींचा समावेश असेल. आधुनिक जतन सुविधांसह या संग्रहसाठ्याची रचना करण्यात येणार असून मूळ नमुन्यांचे दीर्घकालीन संवर्धन केले जाईल. अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.

राज्यातील एकमेव केंद्र
भारतीय प्राणी सर्वेक्षण केंद्र ही देशातील एक अग्रगण्य संस्था मानली जाते. या संस्थेच्या आकुर्डीतील प्रादेशिक केंद्राला १९९८ मध्ये सुरुवात झाली. भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेचे देशभरात एकूण १६ केंद्र आहेत. त्यातील आकुर्डीतील केंद्र हे प्रादेशिक केंद्रापैकी एक असून राज्यातील एकमेव केंद्र आहे. येथे दीव दमण, महाराष्ट्र , गोवा आणि कर्नाटकाच्या काही भागातील संकलित केलेल्या प्राणी नमुन्यांचेही जतन व संशोधन या केंद्रात केले जाते. या ठिकाणी अगदी किड्यांपासून आफ्रिकी बिबट्यापर्यंत प्राण्यांच्या विविध प्रजाती पहायला मिळतात. जवळपास ४५०० हजार प्रजातींच्या दोन लाख हून अधिक नमुन्यांचे जतन हे केंद्रात करण्यात आले आहे. दर आठवड्याला शेकडो शालेय विद्यार्थी येथील संग्रहायलयाला भेट देतात . तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठात प्राणीशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही येथे प्रशिक्षण व ऑन जॉब ट्रेनिंग दिले जाते.

असे असणार संशोधन केंद्र
- तीन मजली इमारत
- २१४१ चौरस फुटांमध्ये विविध विभाग
- प्रयोगशाळा, सभागृह आणि मुलांसाठी विभाग
- १८ कोटींची तरतूद


संग्रहसाठ्याचे वैज्ञानिक आणि शैक्षणिक महत्त्व

- वर्गीकरणशास्त्र आणि प्रणालीबद्ध संशोधनासाठी भक्कम पाया उपलब्ध करून देणे
- जैवविविधता मूल्यांकन आणि संवर्धन धोरण निर्मितीसाठी संदर्भ केंद्र
- दुर्मिळ, स्थानिक आणि संकटग्रस्त प्रजातींचे वैज्ञानिक दस्तावेजीकरण
- प्राणी जैवविविधतेची माहिती जागतिक स्तरावर उपलब्ध व्हावी यासाठी सर्वसमावेशक डिजिटल डेटाबेस
-विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी शैक्षणिक व प्रदर्शन सुविधा उपलब्ध करणे; संग्रहालयातील नमुन्यांच्या माध्यमातून विज्ञान प्रसार, जनजागृती आणि जैवविविधता संवर्धनाला चालना देणे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com