उपाययोजना तोकड्या; आरोग्यावर कुरघोड्या
पीतांबर लोहार : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २७ : पिंपरी चिंचवडमधील पाणी, हवा आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना राबवत आहे. यामध्ये यंत्राद्वारे रस्ते सफाई, हवेतील धुलिकण कमी करण्यासाठी पाण्याचा वापर, धुलिकण शोषण यंत्रणा उभारली आहे. पाणी वापरून रस्ते सफाई केली जात आहे. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले आहे. तरीही, शहरातील हवा, नद्यांतील पाणी आणि मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत आहे. त्याचा दुष्परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे प्रभावी व कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
घनकचरा व्यवस्थापन
- मोशी कचरा डेपोत गांडूळखत व बायोगॅस निर्मिती
- ओल्या कचऱ्यावर १०० टक्के, तर सुक्या कचऱ्यावर ९० टक्के प्रक्रिया
- बांधकामाच्या राडारोड्यावर १०० टक्के प्रक्रिया
- रस्त्यांच्या कडेला व मोकळ्या जागांमध्ये राडारोडा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
- क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडियाकडून २० ऑगस्ट २०२३ रोजी हागणदारीमुक्त शहर घोषित
- दररोज ५२० वाहनांद्वारे सरासरी १४५० टन घनकचरा संकलित करून विल्हेवाट
- मोशी कचरा डेपोत १००० मेट्रिक टन क्षमतेचे मटेरिअल रिकव्हरी फॅसिलिटी व कंपोस्ट प्लॅन्ट
- ओल्या कचऱ्यासाठी ५०० टन प्रतिदिन क्षमतेचा मेकॅनिकल कंपोस्टिंग प्लॅन्ट
- प्लॅस्टिक कचऱ्यापासून प्रतिदिन पाच टन क्षमतेचा इंधन निर्मिती
- हॉटेलमध्ये उरलेल्या अन्नपदार्थांपासून बायोगॅस निर्मिती
- १६ ठिकाणी घनकचरा स्थानांतरण केंद्र; कासारवाडी, गवळीमाथा, काळेवाडी केंद्रांची क्षमता प्रतिदिन २०० मेट्रिक टन
- मोशी येथे वेस्ट टू एनर्जी (कचऱ्यापासून वीज निर्मिती) प्रकल्प; प्रतितास १४ मेगावॅट वीज निर्मिती
- जुन्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने (बायोमायनिंग) विल्हेवाट लावली जात आहे
- बांधकाम राडारोड्याचा पुनर्वापर प्रकल्प
- वायसीएम रुग्णालयाच्या आवारातील प्रकल्पात जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट
महापालिकेचे म्हणणे...
महापालिकेच्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालात नमूद आहे की, ‘‘शहराचे क्षेत्रफळ व लोकसंख्येचे प्रमाण व्यस्त आहे. त्यामुळे राहण्याच्या जागेचा अभाव, दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या, अपुरी मलनिःसारण सुविधा, घनकचरा साठवण्याचा जागेचा प्रश्न व वाढणाऱ्या झोपडपट्ट्या यामुळे शहरातील वायू प्रदूषण गंभीर स्वरूप धारण करीत आहे. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे शहरातील तरंगणारे धुलिकण (पीएम १०, पीएम २.५), नायट्रोजन ऑक्साइड यांचे प्रमाण वाढत आहे. विविध विकासकामे, बांधकाम व उद्योगधंदे यातून निर्माण होणारी धूळ हवेत पसरत असल्याने धुलिकणांच्या वाढीमुळे हवा प्रदूषित होत आहे.’’
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी...
- जीवाश्म इंधनाचा वापर कमी करून त्याच्या गुणवत्तेत वाढ करणे, पर्यायी इंधन स्वीकारणे
- वाहन तंत्रज्ञानात सुधारणा करणे, वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या व्यवस्थेत शिस्तबद्धता आणणे
- वाहनांची नियमित तपासणी व देखभाल करणे
- जुनी वाहने वापरातून बाद करणे, वाहन उत्सर्जन मापदंडात सुधारणा करणे
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सशक्त करून वापरासाठी प्रोत्साहन देणे
- नैसर्गिक ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देणे
- शहरातील वाढते वायू प्रदूषण कमी करणे
- बीआरटी मार्गांचा विकास करणे
- वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्ता रुंदीकरण प्रस्तावित
- सायकल ट्रॅक तयार करून सायकलचा वापर वाढविण्यास प्रोत्साहन देणे
- दोन ठिकाणी वायू तपासणी केंद्र कार्यान्वित, आणखी एक प्रस्तावित
- वृक्षारोपणावर भर
- विविध ठिकाणी मुव्हेबल फॉग कॅनन सप्रेशन सिस्टिम यंत्रणा कार्यान्वित
महापालिकेच्या सूचना
- बांधकामाच्या ठिकाणी सतत पाण्याचा फवारा मारणे
- बांधकाम ठिकाणीच वाहनांची चाके धुणे
- वाहनांची पीयूसी ठराविक वेळापत्रकानुसार करणे
वायू शुद्धीकरण प्रणाली (एअर प्युरिफिकेशन सिस्टिम)
पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी चौक, चिंचवड स्टेशन, पिंपरी चौक, नाशिक फाटा चौक, कस्पटे वस्ती चौक वाकड, भोसरीगाव, भूमकर चौक एक व दोन, शगून चौक पिंपरी अशा नऊ ठिकाणी वायू शुद्धीकरण प्रणाली बसवली आहे. त्यामध्ये सभोवतालच्या हवेचे ऑनलाइन निरीक्षण करण्याची सुविधा आहे. या प्रणालीद्वारे ५० मीटर त्रिज्येमधील वायू प्रदूषण कमी केले जाते. यामुळे हवेतील धुलिकण, पारा, झिंक, कोबाल्ट असे कण कमी करण्यास मदत होते.
‘ड्राय मिस्ट’ आधारित फाउंटन प्रणाली
पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी चौक, मोहननगर, चिंचवड विसर्जन घाट, होळकर चौक, कोकणे चौक, तळवडे चौक, मोशी गोदाम चौक, नाशिक फाटा, चिंचवडगाव, नेहरूनगर, धर्मराज चौक, ताथवडे बीआरटी रस्ता, पिंपळे निलख, निगडी प्राधिकरण, पिंपळे गुरव, केएसबी चौक, थरमॅक्स चौक, मॅगझीन चौक, चिखली आरटीओ चौक, भोंडवे कॉर्नर रावेत, मोरया चौक चिंचवड, जगताप डेअरी चौक, डांगे चौक अशा २१ ठिकाणी ‘ड्राय मिस्ट’ आधारित फाउंटन प्रणाली उभारली आहे. याद्वारे उच्चदाब पंप व विशेष नोझल वापरून धुके तयार करणे व हवेतील धुलिकण जड बनवून जमिनीवर आणले जाते. वातावरण थंड राहण्यास मदत होते.
स्टेशनरी फॉग कॅनॉन
धूळ आणि गंध नियंत्रणासाठी स्टेशनरी फॉग कॅनॉनचा वापर केला जात आहे. सध्या आठ यंत्र मोशी कचरा डेपोत कार्यान्वित आहेत. यामुळे हवेतील धूळ कमी होऊन अग्निशमनासाठीही वापरले जाते. त्याला चाके असल्याने वापरण्यास सुलभ आहे.
ट्रक माउंटेड ‘फॉग कॅनॉन’
रस्त्यावरील चौक, बांधकाम पाडणे, कचरा कुंड्या येथील धूळ नियंत्रित करण्यासाठी ट्रक माउंटेड फॉग कॅनॉन यंत्राचा वापर केला जातो. अशी आठ वाहने महापालिकेकडे असून १२ मीटरपेक्षा अधिक रुंद रस्त्यांवर ती वापरले जात आहे. हे यंत्र वाहनांवर फिरते असून धूळ नियंत्रणासाठी वापरले जात आहे.
रोड वॉशर प्रणाली
शहरातील १२ मीटरपेक्षा रुंदी रस्त्यांवर पाण्याचा वापर करून साफसफाई केली जात आहे. एका शिफ्टमध्ये ४० किलोमीटर लांबीच्या रस्त्याची साफसफाई केली जाते. अशी आठ वाहने कार्यान्वित आहेत.
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी....
निवासी, व्यावसायिक, औद्योगिक व शांतता अशा चार क्षेत्रात शहराचे विभाजन केले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने या भागांतील दिवस व रात्रीची ध्वनी पातळी निश्चित केली आहे. न्यायालये, रुग्णालये, शैक्षणिक संस्थांचा शंभर मीटर परिघ क्षेत्र शांतता क्षेत्र घोषित केले आहे. शहरातील ३४ ठिकाणी ध्वनी प्रदूषण मोजले आहे. त्यानुसार २०२४-२५ मध्ये काही भागात ध्वनी प्रदूषण पातळी मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळले आहे. विशेषतः सण, उत्सव काळात अधिक ध्वनी प्रदूषण झाले आहे.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

