कारभाऱ्यांचीच वाहने प्रदूषणकारी

कारभाऱ्यांचीच वाहने प्रदूषणकारी

Published on

पिंपरी, ता. ३ : पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये हवा प्रदूषणाची गंभीर स्थिती आहे. वाढत्या प्रदूषणाबाबत नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत. भविष्यातील धोक्याबाबत चिंताही व्यक्त होत आहे. प्रदूषणाचा सर्वांनाच त्रास होत आहे. प्रदूषणामुळे शहरात राहणेच अवघड झाले आहे. याबाबत ‘सकाळ’ने नुकतीच वृत्तमालिका प्रकाशित केली. प्रशासनाने ठोस उपाययोजना राबवायला हवी, वायू प्रदूषणात भर घालणाऱ्या डंपर, ट्रकच्या केबिनवर राजकारण्यांची नावे लिहिलेली असतात, म्हणजेच संबंधित वाहने ‘कारभाऱ्यांचीच’ असल्याचे स्पष्ट होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

‘‘चिंचवडमधील बिजलीनगर येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू असून, या बांधकामामुळे परिसरात धूळ पसरून हवेचे प्रदूषण होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे.
- मंगेश भोसले, बिजलीनगर, चिंचवड

चिंचवडगावातील पडवळ आळीमध्ये माझे दुकान आहे. येथे मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषणाचा त्रास होत आहे. घशामध्ये खवखवते, हवेतील धूळ श्वासावाटे घशात जाते. प्रेमलोक पार्क येथेही अशाचप्रकारे धुळीचा त्रास होत आहे. खूप जणांना खोकल्याचा त्रास जाणवतो.
- राजमल फुलचंद मुनोत, चिंचवडगाव

निघोजे रस्त्यावर अनेक आरएमसी प्लांट आहेत. येथे दिवसभर मोठ्या प्रमाणात डंपर, ट्रकची रहदारी सुरू असते. दिवसभर धूळ, वाहतूक कोंडी आणि धुळीने माखलेले रस्ते पहायला मिळतात. या डंपर, ट्रकच्या केबिनवर मोठ्या राजकारण्यांची नावे लिहिलेली आहेत.
- एक नागरिक

‘‘मी ‘सकाळ’ वृत्तपत्राचा वाचक आहे. आम्हाला भेडसावणाऱ्या समस्या तुम्ही मांडल्याबद्दल खरोखर आभारी आहे. प्रदूषणाच्या समस्येला सर्वोच्च प्राधान्य दिल्याबद्दल तुमचे कौतुक आहे. प्रदूषणाचा सर्वांनाच त्रास होत आहे, पण त्याबद्दल कोणीही बोलत नाही. तुम्ही त्यामागील सर्व वस्तुस्थिती मांडली आहे. महत्त्वाच्या सामाजिक समस्यांना योग्य दिशेने नेत आहात. दर्जेदार जीवनमानासाठी शुद्ध हवा, पाणी आवश्यक आहे.
- अविनाश पवळे, रावेत

‘सकाळ’ने इंद्रायणी नदी प्रदूषण, वाहतूक व्यवस्था तसेच हवा प्रदूषण हा विषय ताकदीने लावून धरलाय या बद्दल अभिनंदन. ही खूप मोठी समस्या असून, शहरात राहणंच अवघड झालं आहे.
- रामचंद्र दिवेकर, चोवीसावाडी, चऱ्होली

‘‘नदी प्रदूषण टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी. कचरा फेकला की दंड करावा, प्लॅस्टिक निर्मिती व वापर यावर बंदी हवी. ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ हे सतत बिंबवले पाहिजे. ओला कचरा सर्वांनी घरच्या घरी जिरवावा.
- डॉ. स्वाती दगडे, चऱ्होली

विस्तारा हौसिंग सोसायटी, नेवाळे वस्तीसमोर सुरू असलेल्या बांधकामामुळे आम्हाला धुळीचा त्रास होत आहे. आता कुठे बांधकामाला सुरुवात झाली आहे. उद्या डंपरची ये-जा सुरी झाली, तर धुळीचे प्रमाण अजून वाढेल. त्या ठिकाणी उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व श्वसनाच्या आजारांनी त्रस्त आहेत. महापालिकेने बांधकामासाठी आखून दिलेल्या खालील नियमांचे पालन होताना दिसत नाही.
- एक वाचक
---

Marathi News Esakal
www.esakal.com