तळेगावचा ४५० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

तळेगावचा ४५० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

Published on

तळेगाव दाभाडे, ता. २७ : नगरपरिषदेच्या २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठीच्या विकासाभिमुख व लोककल्याणकारी अर्थसंकल्पास विशेष अर्थसंकल्पीय सभेत मंजुरी मिळाली. सुमारे ४५० कोटी रुपयांचा आणि ९ लाख ८० हजार ३०३ रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. उपनगराध्यक्ष गणेश काकडे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, विरोधी पक्षनेते संतोष भेगडे, गटनेत्या हेमलता खळदे, इंदरमल ओसवाल, पक्षप्रतोद सत्यम खांडगे तसेच नगरसेवक व अधिकारी यावेळी उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते संतोष भेगडे यांनी चालू वर्षात लेखाशिर्ष अंतर्गत १६२ कोटी रुपये प्रत्यक्षात प्राप्त झाले नसूनही २०२६-२७ मध्ये २५९ कोटींचे अनुदान अपेक्षित दाखविण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. नगरसेवकांना विश्वासात न घेता अर्थसंकल्प सादर केल्याची टीका त्यांनी केली. शहराचा विकास करताना सर्वांना सोबत घेऊन चर्चा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. अनेक नगरसेवकांनीही प्रश्न उपस्थित केले.
नगरपरिषदेने पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, शिक्षण, आरोग्य व नागरी सुविधा यांना प्राधान्य देत दीर्घकालीन नियोजनावर भर दिला आहे. प्रशासनाच्या मते, हा अर्थसंकल्प शहराच्या वाढत्या गरजा आणि भविष्यातील विकास लक्षात घेऊन तयार केला आहे. सभेच्या शेवटी सूचनांची नोंद घेण्यात आली. त्या विचारात घेण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिले.

---

दृष्टिक्षेपात
प्रारंभिक शिल्लक : २५,४८,०७,९०८
महसुली जमा : ११६,४६,८५,१७३
भांडवली जमा : ३१६,७६,९९,५२८
एकूण जमा : ४५८,७१,९२,६०९
महसुली खर्च : ९८,६७,२५,८०६
भांडवली खर्च : ३५९,९४,८६,५००
एकूण खर्च : ४५८,६२,१२,३०६
अखेरची शिल्लक : ९,८०,३०३

---
प्रमुख वैशिष्ट्ये
शिक्षण विभाग ः
- आदर्श शाळा डिजिटल शाळांमध्ये रूपांतरित करणे,
- आकार फाउंड्रीमागील शाळा व उमाबाई दाभाडे शाळेचे बांधकाम
- पीएम श्री अंतर्गत ‘गुलाबी शाळा’ विकसित करणे
- ई-लायब्ररी (डिजिटल ग्रंथालय) सुरू करणे
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे योजना राबविणे

कर विभाग
- सौरऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग व सॉलिड वेस्ट प्रोसेसिंग एकत्रित राबविणाऱ्या सहकारी गृहरचना संस्था व वैयक्तिक घरांना ४ टक्के करसूट
- पाणीपट्टी १८०० वरून २१००
- करयोग्य मूल्यामध्ये १ टक्का वाढ

बांधकाम विभाग
- मलनिस्सारण योजनेचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल
- मुख्य चौकांचे सुशोभीकरण
- मामा साहेब खांडगे क्रीडा संकुल विकसित करणे
- बनेश्वर स्मशानभूमी विकसित करणे
- बेलाडोर येथे रुग्णालय बांधकाम

इतर महत्त्वाच्या योजना
- ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणे
- प्रत्येक प्रभागात एक आदर्श रस्ता
- आद्रा थरण पाणीपुरवठा योजना राबविणे
प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी
- सोलर सिटी संकल्पना - तलावाशेजारी एक मेगावॉट सौर प्रकल्प
- सर्व नगरपरिषद मालमत्तांवर सौर प्रकल्प
- नमो उद्यान उभारणे
- डोळसनाथ मंदिर काम पूर्ण करणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com