विनानंबर प्लेट वाहनांवर कारवाई कधी ?

विनानंबर प्लेट वाहनांवर कारवाई कधी ?

Published on

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २८ ः शहरात नंबरप्लेटच नसलेली असंख्य वाहने धावत आहेत. यातील अनेक वाहनांचा गुन्हेगारी कृत्यासाठी वापर होतो. नंबरप्लेटच नसल्यामुळे पोलिस ऑनलाइन दंड करू शकत नाहीत. अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आव्हान वाहतूक पोलिस तसेच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसमोर (आरटीओ) आहे. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई कधी करणार, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात नुकताच २५.५० लाख वाहन नोंदणीचा टप्पा पार झाला आहे. कोणत्याही वाहना नंबरप्लेट आणि ती सुद्धा नियमानुसार असणे गरजेचे आहे. विशेषत: काही तरुण वाहनाला फॅन्सी नंबरप्लेट लावतात. दादा, बाबा, बॉस, भाई अशा विविध नावांनुसार फॅन्सी क्रमांक लावले जातात. देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना एक एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन/नंबर प्लेट (एचएसआरपी) देणे बंधनकारक झाले आहे. एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना जानेवारी २०२५ पासून ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट लावणे बंधनकारक आहे. यानंतरही शहरात अजूनही असंख्य वाहनांवर फॅन्सी नंबरप्लेट दिसतात. विशेषतः मोशी, कुदळवाडी आणि उपनगरांत नंबरप्लेट नसलेले वाहने दिसतात. कारवाई टाळण्यासाठी काहीजणांनी टेप लावून एखादा क्रमांकच बदलू नंबरप्लेटमध्ये फेरफार केल्याचे दिसते. बऱ्याच वेळा अपघातानंतर नंबरप्लेट अभावी वाहन चालकाचा शोध घेणे पोलिसांना कठीण होते.

गुन्हेगारी कृत्यासाठी वापर
शहरात रोज वाहन चोरी, सोनसाखळी हिसकावण्याचे गुन्हे घटना घडतात. यासाठी वापर झालेल्या बहुतांश वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये फेरफार झाल्याचे किंवा किंवा नंबरप्लेटच नसल्याचे आढळते. त्यामुळे तपास करताना पोलिसांना अडचणी येतात. इतर गुन्हेगारी कृत्यांसाठीही नंबरप्लेट नसलेल्या वाहनांचा वापर होतो.

अनेक नेत्यांकडूनच उल्लंघन
शहरात काही लोकप्रतिनिधींसह विविध पक्षांच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या वाहनांना फॅन्सी नंबर प्लेट, काळी काच लावल्याचे आढळतेआहे. काही कार्यकर्त्यांच्या वाहनांवर तर ‘आमदार’, ‘खासदार’ अशी स्टीकर दिसतात. या वाहनांवर कारवाई होत नाही.

इतका होतो दंड

नियमबाह्य नंबर प्लेट असल्यावर पोलिसांनी पकडले तर पहिल्यांदा ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येतो. दुसऱ्यांदा मात्र तेच वाहन पोलिसांनी पकडले, तर दीड हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो.
------------
नंबर प्लेट कशी असावी?
केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ मध्ये २००५ साली बदल करण्यात आला. त्यानुसार वाहनाच्या नंबर प्लेटवर IND असे लिहीत, हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट असावी, असा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक वाहनांना नंबर प्लेटचा आकार वेगवेगळा असतो. दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या नंबरप्लेटचा आकार २०० बाय १०० मिमी, हल्की मोटर वाहने किंवा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची नंबर प्लेट ३४० बाय २०० मिमी किंवा ५०० बाय १२० मिमी असते. तर मध्यम आणि अवजड वाहनांच्या नंबर प्लेटचा आकार ३४० बाय २०० मिमी असतो.
----------
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्वच वाहनांवर कारवाई केली जात आहे.
- विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com