पिंपरी अर्थसंकल्प जोड
पाणीपुरवठा सुधारणा प्रकल्प
समन्याय पद्धतीने पाणी वितरणासाठी २५ नोव्हेंबर २०१९ पासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहरातील बांधकामे, पर्यायाने लोकसंख्या आणि त्यामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. यासाठी आंद्रा आणि भामा-आसखेड या धरणांतून अनुक्रमे १०० व १६७ एमएलडी (दशलक्ष) लिटर पाणी मिळणे प्रस्तावित होते. मात्र, दोन्ही प्रकल्पांतून थेट पाणी अद्याप मिळालेले नाही. आंद्रा धरणातील पाणी इंद्रायणी नदीतील निघोजे बंधाऱ्यातून उचलले जात आहे. भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी जॅकवेल व जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, वेळोवेळी मुदतवाढ देऊन काम प्रलंबित राहिल्याने ठेकेदाराचे काम थांबविले आहे. नवीन ठेकेदार नियुक्त करून काम पूर्ण केले जाणार आहे. यांसह पाणीपुरवठा सुधारणा प्रकल्प अर्थसंकल्पात सूचविले आहेत.
१) भामा आसखेड जॅकवेल ः भामा आसखेड धरणातील जॅकवेलचे काम पूर्णत्वाकडे आहे. त्यासाठी १५३ कोटी ३६ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. काम वेळेत न झाल्याने सुधारित खर्च १७६ कोटी ४२ लाख रुपयांवर गेला आहे.
२) चिखली जलशुद्धीकरण केंद्र ः आंद्रा व भामा आसखेड पाणी योजने अंतर्गत चिखली येथे प्रतिदिन २०० दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधणे आहे. त्याच्या बांधकामासाठी ७० कोटी ७१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
३) जलउपसा केंद्र ः भासा आसखेड धरणाजवळ वाकी तर्फे वाडा गावाजवळ जलउपसा केंद्र बांधण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कामे केली जाणार आहे. त्यासाठी १२० कोटी २१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
४) जलशुद्धीकरण केंद्र क्षमता वाढ ः पाणी पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून उपसा करून निगडी सेक्टर २३ मध्ये जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. त्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी ४५ कोटी ९० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
५) अनधिकृत नळजोड शोधणे ः शहरात सुमारे ४० टक्के पाणी चोरी व गळतीचे प्रमाण आहे. ते कमी करण्यासाठी अनधिकृत नळजोड शोधून अधिकृत करण्याची आणि मीटर बसविण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी ३७ कोटी १७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
पंतप्रधान आवास योजना
केंद्र व राज्य सरकार आणि महापालिकेचा निधी व लाभार्थी हिस्सा असे मिळून सहा ठिकाणी पंतप्रधान आवास योजना प्रकल्प सुरू आहेत. त्यातील बहुतांश प्रकल्पातील इमारतींचे काम पूर्ण झाले असून लाभार्थींना ताबाही दिला आहे. आणखी काही इमारतींची कामे सुरू आहेत. हे सर्व प्रकल्प चऱ्होली, डुडुळगाव, बोऱ्हाडेवाडी, पिंपरी आणि आकुर्डी येथील आहेत. सर्व मिळून १४ हजार ८५८ सदनिका असतील.
नदी पुनरुज्जीवन
मुळा नदी पुनरुज्जीवनासाठी ७५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचे काम सुरू आहे. तसेच, इंद्रायणी नदी प्रकल्पासाठी ५२६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. शासनाच्या ‘अमृत’ योजनेअंतर्गत ही कामे केली जाणार आहेत. पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पही राबविला जाणार आहे.
इतर प्रकल्पांसाठी अपेक्षित खर्च
- नवीन प्रशासकीय इमारतीचे कामे ८० टक्के झाले असून त्यासाठी सुमारे ३१२ कोटी रुपये
- मोशीतील ७०० खाटा क्षमतेच्या रुग्णालयाचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून ४३३.४८ कोटी रुपये
- थेरगावमध्ये सार्वजनिक भागिदारी तत्त्वावर कर्करोग रुग्णालय उभारण्याचे काम सुरू असून १४३ कोटी रुपये
- अग्निशमन प्रबोधिनी सुरू केली जाणार आहे, त्यासाठी इमारत उभारली जात असून १५० कोटी ९१ लाख रुपये
- मदनलाल धिंग्रा मैदानात नवीन क्रीडा संकुल विकसित करण्यासाठी २३ कोटी ४० लाख रुपये
- वाकड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्टचे ८० टक्के काम झाले असून त्यासाठी २० कोटी ७७ लाख रुपये
- तळवडेत बायोडायव्हर्सिटी पार्क उभारण्याचे ८० टक्के काम झाले असून ७४ कोटी ५३ लाख रुपये
- विविध ठिकाणी टाकाऊतून टिकाऊ कलाकृती निर्मितीचे ८० टक्के काम झाले असून ११ कोटी नऊ लाख रुपये
- मोशी कचरा डेपोत जुन्या कचऱ्याच्या बायोमायनिंगसाठी ७२ कोटी रुपये
- कचऱ्यापासून विजनिर्मिती प्रकल्पास ७० कोटी रुपये अनुदान मिळणार
- मैलाशुद्धीकरण केंद्रात आवश्यक सुधारणा प्रस्तावित आहेत
सांडपाणी पुनर्चक्रीकरण-पुनर्वापर
महापालिकेने सांडपाणी पुनर्चक्रीकरण आणि पुनर्वापर प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामध्ये शेती व औद्योगिक वापरासाठी १०० एमएलडी आणि निवासी भागातील पिण्याव्यतिरिक्त वापरासाठी १० एमएलडी क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यांतर्गत २५० किलोमीटर अंतर्गत पाणी वितरणासाठी जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत.
‘सखी आंगण’ सामाजिक उपक्रम
महिलांना स्वावलंबी करून त्यांच्या प्रगतीसाठी महापालिका ‘सखी आंगण’ उपक्रम राबवित आहे. त्याअंतर्गत आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ ४९ गाळे बांधले आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून खाद्य पदार्थ निर्मिती व विक्री केली जात आहे. ‘स्वावलंबनातून आत्मविकास’ असे ब्रीद या उपक्रमाचे आहे. पदार्थ निर्मिती, प्रक्रिया व विक्री आदी प्रशिक्षण दिले जाते.
‘जल्लोष शिक्षणाचा’
जल्लोष शिक्षणाचा उपक्रमांतर्गत नावीन्यपूर्ण योजनांसाठी सात आणि उपक्रम खर्चासाठी अडीच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य खरेदीसाठी २० कोटी खर्च अपेक्षित आहे. शिवाय, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी भारत दर्शन यात्रा, काला घोडा महोत्सवात सहभाग आणि शिक्षकांचे लडाख येथे शैक्षणिक भेट व प्रशिक्षणासाठीही तरतूद आहे.
--
फोटो : ९९८४९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

