महाराष्ट्र सर्वात स्वच्छ हवेचे राज्य बनवा
पिंपरी, ता. २८ ः राज्यातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम अंतर्गत मिळालेल्या निधीचा प्रभावी वापर करण्याबाबत आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत राज्य सरकारचे लक्ष वेधले. राज्याला देशातील ‘सर्वाधिक स्वच्छ हवेचे राज्य’ बनवण्यासाठी त्यांनी काही महत्त्वपूर्ण सुधारणा आणि उपाययोजना सुचवल्या आहेत.
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील १७ प्रमुख शहरांना दिलेल्या निधीतून रस्ते स्वच्छता आणि धुळीचे नियंत्रण यांसारखी प्राथमिक कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, केवळ वरवरची उपाययोजना न करता प्रदूषणाच्या मूळ कारणांवर घाव घालणे आवश्यक असल्याचे गोरखे यांनी नमूद केले. ते म्हणाले, ‘‘वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी औद्योगिक उत्सर्जनावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. त्यासाठी निधीचा वापर करून कायमस्वरूपी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करावे. तसेच, वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी सक्षम वाहतूक नियोजनावर विशेष भर देणे गरजेचे आहे. सर्व प्रकल्पांमध्ये पारदर्शकता आणि कामाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करावे. उपाययोजनांमुळे हवेच्या गुणवत्तेत नेमका किती सुधार झाला, याचे ‘इम्पॅक्ट असेसमेंट’करणे अनिवार्य करावे.
महाराष्ट्र रोल मॉडेलचा मानस
केंद्र सरकारच्या मदतीने प्राथमिक टप्प्यातील कामे मार्गी लावली आहेत, पण आता आपल्याला पुढचे पाऊल टाकावे लागेल. तांत्रिक सुधारणा आणि पारदर्शक अंमलबजावणीच्या जोरावर महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक स्वच्छ हवा असलेले राज्य बनवणे हे आपले ध्येय असायला हवे, याकडेही आमदार अमित गोरखे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
---

