प्रदूषणास कारणीभूत ठरणारे कारवाईच्या रडारवर

प्रदूषणास कारणीभूत ठरणारे कारवाईच्या रडारवर

Published on

पिंपरी, ता. १ : शहरातील हवा आणि जल प्रदूषणाबाबत पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय कारभारी ‘ॲक्शन मोड’वर आले आहेत. नदी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी अशा कंपन्यांची यादी तयार करण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. तसेच हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे बसविण्याचे नियोजन सुरू आहे. ध्वनी प्रदूषणास जबाबदार वाहनचालक, फटाके उडवणारे कार्यकर्ते, डीजे मालक-चालक आदींवर कठोर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात काही निष्क्रीय अधिकारीही कारभाऱ्यांच्या रडारवर आले आहेत.

पुणे, पिंपरी चिंचवड शहर परिसरातील वायू, ध्वनी आणि जल प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. त्याकडे ‘सकाळ’ने ‘गुदरमतोय श्वास’ या वृत्तमालिकेच्या माध्यमातून प्रशासनातील विविध विभाग व अधिकाऱ्यांसह खासदार, आमदार यांच्या पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही महापालिकांतील लोकनियुक्त कारभारी यांचे लक्ष वेधले. सामान्य नागरिकांसह विविध क्षेत्रातील सजग नागरिकांनीही प्रशासनासह प्रदूषणास कारणीभूत घटकांवर संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे लोकनियुक्त कारभारीही आता ॲक्शन मोडवर आले असून प्रशासनाला जाब विचारत आहेत. त्यांची नेमकी भूमिका ‘सकाळ’ने जाणून घेतली.

प्रदूषणाकडे महापालिकेतील यंत्रणागांभिर्याने पाहत नाही. निष्क्रिय यंत्रणा केवळ निविदा प्रक्रियेत गुंतलेली आहे. एक दिवस अशी परिस्थिती निर्माण होईल, की प्रदूषणाच्या मुद्द्यावरून लोक रस्त्यावर उतरतील. संताप व्यक्त करतील. त्याला जबाबदार महापालिका प्रशासन असेल. हवा, पाणी व ध्वनी प्रदूषणाबाबतीत महापालिकेने गांभिर्याने विचार करून ठोस उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.
- श्रीरंग बारणे, खासदार

किती बांधकामांना परवानगी दिली जाते? त्यांच्याकडून प्रदूषण रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्या जातात का? याकडे कोणाचेही लक्ष नाही. प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई केल्याचेही ऐकिवात नाही. हवा गुणवत्ता निर्देशांक सातत्याने घसरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. पण, या सर्वांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. येणाऱ्या अधिवेशनात यावर संसदेत प्रश्‍न उपस्थित करणार आहे.
- डॉ. अमोल कोल्हे, खासदार, शिरूर

वरवरची उपाययोजना न करता प्रदूषणाच्या मूळ कारणांवर घाव घालणे व औद्योगिक उत्सर्जनावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. वाढत्या वाहनांमुळे प्रदूषण रोखण्यासाठी सक्षम वाहतूक नियोजनावर विशेष भर देणे गरजेचे आहे. राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये पारदर्शकता व कामाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेकडून लेखा परीक्षण करावे. उपाययोजनांमुळे हवेच्या गुणवत्तेतील सुधारणीचे ‘इम्पॅक्ट असेसमेंट’ अनिवार्य करावे.
- अमित गोरखे, आमदार, विधान परिषद

पर्यावरणवर माझे काम सुरू आहे. शहरातील मुळा, पवना, इंद्रायणी नद्यांमध्ये रसायनयुक्त सांडपाणी सोडले जात आहे. अशा कंपन्यांची यादी महापालिका प्रशासनाकडून मागितली आहे. दोषी कंपनी मालकांवर कारवाई केली जाईल. वायू प्रदूषण रोखण्यासाठी चौकांमध्ये सेन्सर यंत्रणा बसवली जाईल. प्रदूषणास जबाबदार बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई केली जाईल.
- रवी लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड

शहराच्या विकासासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी दिलेले कोट्यवधी रुपयांचा निधी धुळीत मिळत असेल, तर अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. प्रदूषणावर घोषणा करून चालणार नाही, तर ठोस आणि पारदर्शक अंबलबजावणी आवश्यक आहे. हलगर्जीपणा, भ्रष्टाचार, दुर्लक्ष आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. पर्यावरण विषयक निर्णयांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवला जाईल.
- शर्मिला बाबर, उपमहापौर, महापालिका

शहरातील हवा प्रदूषणाकडे प्रशासनाचे लक्ष नाही. नागरिकांना श्वास घ्यायला त्रास होत आहे. पुढील काही दिवसांत आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. याला जबाबदार कोण? प्रदूषणावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. येथे विरोधक किंवा सत्ताधारी हा मुद्दा नसून मानवता हाच मुख्य मुद्दा आहे. हा शहराचा प्रश्न आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रदूषणावर मात करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते, महापालिका

बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन महापालिकेचे पथक तपासणी करेल. संबंधित व्यावसायिक नियमांचे पालन करतात का? हे तपासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. बांधकाम साहित्य वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी पथक तैनात करण्यात येईल. प्रदूषण रोखण्यासाठी नियमावली तयार करून काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या जातील.
- अभिषेक बारणे, अध्यक्ष, स्थायी समिती, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com