बंधुभाव, प्रेमाचा संदेश देत होळीचा सण साजरा

बंधुभाव, प्रेमाचा संदेश देत होळीचा सण साजरा

Published on

पिंपरी, ता. ३ : बंधूभाव आणि प्रेमाचे प्रतीक असणारा होळीचा सण पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवारी सायंकाळी (ता.३) ठिकठिकाणी गोवऱ्या व लाकड्याची होळी रचण्यात आली. नागरिकांनी मोठ्या उत्साहात आणि परंपरेनुसार होळीची पूजा केली. स्वतःमधील अहंकार, द्वेष, मोह, मत्सर व क्रोध नष्ट होऊ दे, अशी प्रार्थना करण्यात आली.

होळी सणानिमित्त नागरिकांनी सकाळपासूनच एकमेकांना शुभेच्छा दिल्या. होळीच्या तयारीसाठी सकाळपासूनच बाजारात गोवऱ्या, ऊस, विड्याची पाने, फुले, हार व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सायंकाळी घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य करण्यात आला. त्यानंतर घरोघरी, सोसायट्यांमध्ये व मंदिरांपुढे होळी पेटविण्यात आली होती. सायंकाळनंतर पारंपारिक गाण्‍यांवर आबालवृद्धांनी होळीभोवती ठेका धरला. तसेच महिला वर्गाने होळीची गीते सादर केली. त्यानंतर पूजन करून दहन करण्यात आले.


होळीनिमित्त पुरणाची पोळीदान
समाजातील गरजू, दुर्बल कुटुंबांसाठी ‘पोळीदान’ उपक्रम राबविण्यात आला. प्रगती जैन महिला सोशल ग्रुप व दक्षिण भारत महिला परिषदेच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर पोळ्या संकलित करून त्या गरजू नागरिकांना वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमात जयश्री कासार, सुजाता नवले, भाग्यश्री पाटील, सायली गाजी, विजया कांते, विजया गुंडे, अर्चना मगदुम, शैलजा वाडकर, साधना सवाने आणि स्वप्ननगरी सोसायटी उद्यमनगर येथील संजय शिंदे (चेअरमन) सुरेश शिंदे (सेक्रेटरी) यांनी सहकार्य केले.


‘होळी करा लहान, पोळी करा दान’
पर्यावरणपूरक होळी साजरी केली जावी, म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ हा उपक्रम यंदाही राबवला गेला. ‘होळीची पोळी करू दान, बाळगू विवेकाचे भान’ लिहिलेले फलक घेऊन आणि समोर बॉक्स ठेऊन पिंपरी चिंचवड शाखेचे कार्यकर्ते विविध ठिकाणी भाविकांना पोळी होळीत अर्पण करण्याऐवजी दान करण्याचे तसेच होळी लहान करण्याचे आवाहन करत होते. त्यास चांगलाच प्रतिसाद मिळाला. अंनिसचे कार्यकर्ते भावना फुलझेले, ज्ञानेश महाजन, विकास सूर्यवंशी, राजकुमार माळी, बाळासाहेब घस्ते, मनोहर पाटील, संजय बारी, उत्तम जोगदंड यांनी या पोळ्या गोळा करून पवळे पूल, भक्ती-शक्ती चौक परिसरातील नागरिकांना वाटल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com