राजस्थानमधील भीषण अपघात पिंपरी चिंचवडच्या तिघांचा मृत्यू
वाकड/पिंपरी, ता. १८ : पर्यटनासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवडमधील तीन तरुणांचा राजस्थानामधील भीषण अपघातात मृत्यू झाला. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर कोटा जिल्ह्यातील कैथून पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (ता. १८) सकाळी साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला.
सिद्धांत रमेश आल्हाट (वय. २१ रा. वाकड), कुणाल चोरडिया (वय २५, रा. चिंचवड) आणि मयुरेश पाडाळे (वय २३, रा. म्हाळुंगे) अशी मृतांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, २६ फेब्रुवारीदरम्यान १२ तरुण तीन मोटारींमधून जम्मू-काश्मीर, लेह-लडाखला गेले होते. कारगिलमधील बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद झाल्याने ते पाच दिवस एके ठिकाणी अडकले. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) मदतीमुळे ते बाहेर पडू शकले. त्यानंतर ते दिल्लीला गेले. तेथून मंगळवारी (ता. १७) निघाल्यानंतर चालकाला डुलकी लागल्याने फॉर्च्युनर दुभाजकाला धडकली आणि सुमारे ३० फूट उंच पुलावरून खाली कोसळली. यात त्यातील तिन्ही तरुण गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात हलवले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर तिघांचेही मृतदेह गुरुवारी (ता. १९) सकाळी शहरात आणण्यात येतील, असे चोरडिया यांच्या नातेवाइकांनी सांगितले.
सिद्धांत हा वाकडमधील उद्योजक रमेश आल्हाट यांचा चिरंजीव, तर प्रसिद्ध उद्योजक भरत आल्हाट यांचा पुतण्या आहे. त्याने नुकतेच महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केले होते. त्याला एक मोठा भाऊ आहे.
एकजण परतल्याने बचावला
अपघात झालेल्या मोटारीतील चौथा मित्र (नाव समजू शकले नाही) अचानक महत्त्वाचे काम आल्याने आदल्या रात्री मंगळवारी (ता. १७) रात्री विमानाने पुण्यात परतला होता. त्यामुळे तो बचावला.
खासदार बारणे यांची मदत
खासदार श्रीरंग बारणे यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. त्यांनी सांगितले की, बर्फवृष्टीत अडकल्यानंतर आठ दिवसांपूर्वी या तरुणांनी माझ्याशी संपर्क साधला. तेव्हा मी त्यांना मदत केली होती. अपघात झालेले ठिकाण लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मतदारसंघात येते. त्यांच्या सचिवाशी माझी चर्चा झाली. तिघांचे मृतदेह एअर ॲम्बुलन्सद्वारे पिंपरी चिंचवडमध्ये आणण्यात येणार आहेत.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

