वाहनचालक चाचणी आता शनिवारीही

वाहनचालक चाचणी आता शनिवारीही

Published on

पिंपरी, ता. २१ ः वाहनचालक अनुज्ञप्ती (ड्रायव्हिंग लायसन्स) चाचणीसाठी एक-एक महिना अपॉइंटमेंट मिळत नसल्यामुळे पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) आता शनिवारीदेखील वाहनचालक अनुज्ञप्ती चाचणी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
मोटर वाहन कायद्यानुसार सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी वाहन परवाना घेणे आवश्यक आहे. तत्पूर्वी नागरिकांना दुचाकी किंवा चारचाकीसाठी पक्के वाहन परवाना काढायचे असेल तर अनुज्ञप्ती चाचणी द्यावी लागते. यासाठी अर्जदाराला ऑनलाइन नोंदणी करावी लागते. नंतर आरटीओने ठरवून दिलेल्या तारखेला अर्जदारास नियोजित ठिकाणी उपस्थित राहून परीक्षा द्यावी लागते. पिंपरी चिंचवड आरटीओत दररोज शिकाऊ आणि नूतनीकरण असे दोन्ही मिळून सरासरी चारशेहून अधिक वाहन चालक अनुज्ञप्ती चाचणीसाठी ऑनलाइन अर्ज करतात. पण, गेल्या काही दिवसांपासून वाहन परवाना काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र अपॉइंटमेंट कोटा फक्त सोमवार ते शुक्रवार दरम्यान उपलब्ध करून देण्यात येत होता. त्यामुळे वाहन चालकांना अनुज्ञप्ती चाचणीसाठी एक-एक महिना अपॉइंटमेंटची तारीख मिळत नसल्यामुळे गैरसोय होत आहे. या पार्श्‍वभूमीवर आरटीओने आता शनिवारी वाहनचालक अनुज्ञप्ती चाचणी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून अपॉइंटमेंट कोटा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. वाहन चालकांनी भोसरी येथील ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेत (आयडीटीआर) चाचणीकरिता उपस्थित राहावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी केले.
---

Marathi News Esakal
www.esakal.com