..तब्बल १४ तास चालली पालिका सर्वसाधारण सभा

..तब्बल १४ तास चालली पालिका सर्वसाधारण सभा
Published on

पिंपरी, ता. २५ ः महापालिकेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा जवळपास १४ तास चालली. मंगळवारी (ता. २४) सकाळी अकरा वाजता सुरू झालेली सभा बुधवारी (ता.२५) मध्यरात्री एक वाजता संपली. विशेष म्हणजे नवोदितांसह काही महिला सदस्याही शेवटपर्यंत उपस्थित होत्या.
गेल्या महिन्यात महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्तांनी स्थायी समितीकडे सादर केला होता. स्थायी समितीने त्यात उपसूचनांद्वारे ४१४ कोटी रुपयांची कामे सुचवून तो मंगळवारी सर्वसाधारण सभेकडे सादर केला. स्थायीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी त्याची मांडणी केली. वेगवेगळ्या घटकांना आणि कामांना निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच वेगवेगळे लेखाशीर्ष खुले केले. त्यामुळे त्यांच्यावर स्वपक्षीय नगरसेवकांसह विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना सदस्यांनीही कौतुकांचा वर्षाव केला. सकाळी ११ वाजता अपेक्षित असलेली सभा २० मिनिटे उशिराने सुरू झाली. भोंदूबाबा अशोक खरातचा निषेध करून आणि निधन झालेल्या शहरातील नागरिकांना श्रद्धांजली वाहून सभा अर्ध्या तासासाठी तहकूब केली होती. त्यानंतर दुपारी १२ वाजता सुरू झालेली सभा मध्यरात्री एक वाजेपर्यंत चालली. महापौर रवी लांडगे पीठासीन अधिकारी होते. दरम्यानच्या काळात उपमहापौर शर्मिला बाबर यांनीही सभा संचलन केले. मध्यरात्री बारानंतर पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी बाजू मांडली. त्यानंतर स्थायी अध्यक्ष बारणे यांनी उपसूचनांसह अर्थसंकल्प मंजूर करण्याची विनंती केली. ती स्वीकारून महापौर लांडगे यांनी उपसूचनांद्वारे सुचवलेल्या उल्लेखनीय कामांचा गोषवारा घेत अर्थसंकल्प मंजूर केल्याचे जाहीर केले. त्यानंतर आयुक्तांनी सर्वांचे आभार मानून शहराच्या विकासासाठी काम करण्याची ग्वाही दिली.

नवखे मुद्देसूद, जुनेजाणते रटाळवाणे
सर्वसाधारण सभेत जवळपास सर्वच नगरसदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला. यात नव्याने सभागृहात आलेल्या सदस्यांसह दोनपेक्षा अधिक वेळा नेतृत्व करणाऱ्यांचाही समावेश होता. काहींनी आमदार, खासदारांकडून आलेली ‘स्क्रिप्ट’ वाचून दाखवली, तर काहींनी अर्थसंकल्पाव्यतिरिक्त अन्य विषय, समस्यांवर मत मांडले. अर्चना सस्ते, धर्मपाल तंतरपाळे यांसारख्या नवख्यांनी मुद्देसूदपणे आपले म्हणणे मांडले. तर, काही ज्येष्ठांचे भाषण रटाळवाणे झाले. यात महापौर, उपमहापौरांसह विविध समित्यांचे अध्यक्षपद भूषविलेल्यांचाही समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com